इराणमध्ये आण्विक किरणोत्सर्गाचा अलर्ट
अनेक शहरे करावी लागू शकतात रिकामी : आयएईए
आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा संस्थेचे (आयएईए) प्रमुख राफेल ग्रॉसी हे इराणच्या आण्विक नियामक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत. इराणमधील सैन्यतणावामुळे आतापर्यंत या अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही. अमेरिका आणि इस्रायलने नतांज आण्विक केंद्रावर हल्ला केल्याचा आरोप इराणने केला आहे. या पार्श्वभूमीवर आयएईएने या हल्ल्यानंतर किरणोत्सर्गाचा इशारा देत अनेक मोठ्या शहरांना रिकामी करावे लागू शकते असे म्हटले आहे.
ग्रॉसीने इराण आणि अन्य संबंधित घटकांना सर्व सैन्य अभियानांमध्ये अत्यंत संयम बाळगण्याची विनंती केली आहे. संघर्ष अधिक वाढण्यापासून रोखण्यासाठी कूटनीति आणि चर्चेच्या मार्गावर परतणे हाच एकमात्र पर्याय असल्याचे ग्रॉसी यांनी म्हटले आहे.
आण्विक नियामकाशी संपर्काचा प्रयत्न
इराणच्या आण्विक नियामक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु आतापर्यंत कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाही. हा संपर्क अत्यंत आवश्यक आहे, इराणमधील स्थितीची गंभीरता समजून घेणे आणि आण्विक सुरक्षेशी निगडित प्रकरणांवर नजर ठेवण्याकरता हे गरजेचे असल्याचे ग्रॉसी म्हणाले.