रशियात अणुऊर्जेवरील क्षेपणास्त्राची चाचणी
अमर्याद पल्ल्याचा पुतिन यांचा दावा
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाने जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्र ‘बुरेव्हस्टनिक-9एम739’ची यशस्वी चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला अमर्यादित असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान या क्षेपणास्त्राच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. जगातील कोणत्याही देशाकडे असे क्षेपणास्त्र नाही. पूर्वी, असे शस्त्र विकसित करता येईल की नाही याबद्दल अनेक तज्ञांना खात्री नव्हती, परंतु आता ते वास्तवात आले आहे. कोणतीही संरक्षण प्रणाली ते थांबवू शकत नाही, असे पुतिन यांनी स्पष्ट केले.
21 ऑक्टोबर रोजी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या चाचणीदरम्यान बुरेव्हस्टनिकने सुमारे 15 तास उ•ाण करत 14,000 किलोमीटर अंतर कापले, असे रशियन लष्करप्रमुख व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांनी सांगितले. ‘बुरेव्हस्टनिक-9एम739’ हे पारंपरिक इंधन इंजिनऐवजी अणुशक्तीद्वारे चालणारे क्रूझ क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र जवळजवळ अमर्याद अंतरापर्यंत उ•ाण करण्यासोबतच शत्रूच्या क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण प्रणालींपासून वाचण्यास सक्षम असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अमेरिकेवरही हल्ला करण्यास सक्षम
‘बुरेव्हस्टनिक-9एम739’ हे क्षेपणास्त्र सेवेत दाखल झाल्यानंतर रशियाकडे 10,000 ते 20,000 किमी अंतराच्या आंतरखंडीय पल्ल्यापर्यंत मारा करण्याची क्षमता प्राप्त होईल. यामुळे रशिया जगाच्या कोणत्याही भागातून अमेरिकेवर हल्ला करू शकेल. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे सामान्यत: अशा दूर अंतरापर्यंत मारा करण्यासाठी वापरली जातात. अशा दूरवरच्या पल्ल्यापर्यंत मारा करण्यास सक्षम असलेले हे पहिले क्रूझ क्षेपणास्त्र आहे. बुरेवेस्टनिक केवळ 50-100 मीटर उंचीवरून उडताना सतत मार्ग बदलत असल्यामुळे ते रोखणे जवळजवळ अशक्य होते.