10.8 अब्ज डॉलर्सची उभारणी करणार एनटीपीसी
नवी दिल्ली :
एनटीपीसी ग्रीन एनर्जी या कंपनीचा आयपीओ लवकरच येणार असून या आयपीओतून कंपनी 10.8 अब्ज डॉलर्सची उभारणी करणार आहे. यावर्षातला हा तिसरा सर्वात मोठा मूल्याचा आयपीओ असणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
कंपनीने या आयपीओसाठी 102-108 रुपये प्रतिसमभाग अशी इशु किंमत निश्चित केली आहे. ह्युंडाई मोटार इंडिया आणि स्विगी यांच्यानंतर एनटीपीसीचा तिसरा सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील या कंपनीकडून आयपीओमार्फत एकंदर 91 हजार कोटी रुपये उभारण्याचा मानस करण्यात आला आहे. या रक्कम उभारणीचा वापर कंपनी आपल्या ऊर्जा प्रकल्पांच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी करणार आहे. सोलर ऊर्जा, पवन ऊर्जा अशा क्षेत्रामध्ये कंपनी कित्येक वर्षे कार्य करते आहे. एनटीपीसीने मागच्या आर्थिक वर्षात 345 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमविला होता. सदरचा नफा हा दुप्पट नोंदविला गेला होता. आयपीओ 19 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबरपर्यंत बोलीसाठी खुला राहणार आहे.