एनटीपीसी ग्रीनचा आयपीओ झाला खुला
10 हजार कोटी उभारणार : 102-108 इशु किंमत
नवी दिल्ली :
सरकारी कंपनी एनटीपीसी यांची सहकारी कंपनी एनटीपीसी ग्रीन एनजीं लिमिटेड यांचा आयपीओ 19 नोव्हेंबर रोजी खुला झाला असून 22 नोव्हेंबरपर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे. 27 नोव्हेंबर रोजी कंपनीचे समभाग शेअरबाजारात लिस्ट होणार आहेत.
सदरच्या आयपीओतून कंपनी 10 हजार कोटी रुपये उभारणार असून सध्याचे गुंतवणूकदार एकही समभाग विकणार नाहीत, अशी माहिती आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या समभागाची इशु किंमत 102-108 रुपये प्रति समभाग निश्चित केली आहे. रिटेल गुंतवणूकदारांना किमान एका लॉटसाठी म्हणजेच 138 समभागांसाठी बोली लावता येणार आहे. आयपीओ प्राइस बँड 108 रुपये प्रमाणे 1 लॉटसाठी अर्ज करायचा झाल्यास 14,904 रुपये भरावे लागणार आहेत. जास्तीत जास्त 13 लॉटसाठी म्हणजे 1794 समभागांसाठी रिटेल गुंतवणूकदारांना अर्ज करता येणार असून यासाठी गुंतवणूकदारांना 193752 रुपये द्यावे लागणार आहेत. पात्रताधारक संस्थात्मक खरेदीदारांसाठी आयपीओ 75 टक्के राखीव ठेवला असून 10 टक्के रिटेल गुंतवणूकदार आणि उर्वरीत 15 टक्के बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जी आपल्या पुनरुत्पादीत ऊर्जा प्रकल्पासाठी वरील रक्कम वापरणार आहे. सहकारी कंपनी एनटीपीसी रिन्युएबल एनर्जीचे कर्ज चुकवण्यासाठी 7500 कोटी रुपये वापरणार आहे.