एनटीपीसीच्या डीजीएमची झारखंडमध्ये हत्या
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात एनटीपीसीच्या डीजीएमची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली. मृताचे नाव कुमार गौरव असे असून त्याला एनटीपीसी कोळसा प्रकल्पाच्या केरेदारी येथे डिस्पॅच विभागाचे डीजीएम म्हणून नियुक्त करण्यात आले होते. कुमार गौरव हा बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या गाडीला घेराव घालत गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर हल्लेखोर फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलीस यंत्रणेकडून प्रयत्न सुरू आहेत.
हजारीबाग जिल्ह्यातील कटकमदग पोलीस स्टेशन परिसरातील फताहाजवळ हत्येची घटना घडल्याचे सांगण्यात आले. स्कॉर्पिओमधून प्रकल्पस्थळी जात असताना डीजीएम कुमार गौरव याच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर त्याला जखमी अवस्थेत आरोग्य रुग्णालयात नेण्यात आले. जिथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एनटीपीसीच्या डीजीएमवर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांच्या शोधासाठी विविध पथके नियुक्त करून ती ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.