मिरजी कॉलेजचे एनएसएस शिबिर उत्साहात
प्रतिनिधी / बेळगाव
महावीर पी. मिरजी वाणिज्य महाविद्यालयाच्या एनएसएस विद्यार्थ्यांचे वार्षिक शिबिर हलगा येथील पार्श्वनाथ भवन येथे झाले. या कार्यक्रमाला पूज्य श्री 108 बालाचार्य श्री सिद्धसेन मुनी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेतकरी, सैनिक, साधूसंत यांच्या नि:स्वार्थ सेवेमुळे देश प्रगतीवर आहे. अशा महान व्यक्तींच्या त्यागाला जाणून अशा शिबिरांच्या माध्यमातून शिबिरार्थींमध्ये सेवाभाव वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची म्हणाले, शारीरिक आणि मानसिकरीत्या सुदृढ असणे आवश्यक आहे. यामुळे जीवनामध्ये काहीही साध्य करणे शक्य आहे. एनएसएस शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या निर्मला बी. गडाद यांनी विद्यार्थ्यांना स्वयंसेवेचे महत्त्व पटवून दिले. राष्ट्रीय सेवा योजनेची ध्येय व उद्दिष्टे त्यांनी सांगितली. यावेळी चारुकीर्ती सायबण्णावर, ग्रा. पं. उपाध्यक्ष भुजंग सालगुडे, सुकुमार हुडेद, ग्रा. पं. सदस्य सदानंद बिळगोजी, बाबू देसाई, एनएसएसचे संयोजक बी. एस. पाटील, महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. भरत अलसंदी, वाणिज्य विभागप्रमुख रवी दंडगी, कन्नड विभागप्रमुख डॉ. अनुराधा कंची आदी उपस्थित होते.