9 बड्या नेत्यांच्या सुरक्षेतून एनएसजी कमांडो आऊट
पुढील महिन्यापासून सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे : केंद्र सरकारने लागू केली नवी योजना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने व्हीआयपी सुरक्षेत गुंतलेल्या एनएसजी कमांडोना हटवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील 9 अतिमहत्त्वाच्या लोकांना व्हीआयपी सुरक्षा देण्यात आली असून त्यांच्या संरक्षणात एनएसजी-ब्लॅक कॅट कमांडो तैनात आहेत. आता पुढील महिन्यापासून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे सोपवली जाणार असल्याची माहिती बुधवारी अधिकृत सूत्रांनी दिली. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) व्हीआयपी सुरक्षा कक्षात विशेष प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नवीन बटालियन जोडण्यासही गृह मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
नॅशनल सिक्मयुरिटी गार्ड (एनएसजी) च्या ब्लॅक कॅट कमांडोंकडून सध्या झेड प्लस श्रेणीतील व्हीआयपी दर्जाच्या नऊ बड्या नेत्यांना सुरक्षा पुरविली जात आहे. या नेत्यांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा अध्यक्षा मायावती, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल, भाजप नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद, नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) अध्यक्ष फाऊक अब्दुल्ला आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांचा समवेश आहे. या सर्व नेत्यांना आता ‘सीआरपीएफ’चे सुरक्षा कवच प्रदान केले जाणार आहे.
सीआरपीएफमध्ये सहा व्हीआयपी सुरक्षा बटालियन असून त्यांना या कामासाठी आणखी सातवी बटालियन सामील करण्यास सांगितल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. काही महिन्यांपूर्वीपर्यंत संसदेच्या सुरक्षेत कार्यरत असलेली ही नवी बटालियन असेल. गेल्या वषी संसदेतील सुरक्षेतील त्रुटी समोर आल्यानंतर संसदेची सुरक्षा सीआरपीएफकडून सीआयएसएफकडे सोपवण्यात आली होती.