एनएसईचा आयपीओ सप्टेंबरमध्ये होणार लाँच
30000 कोटी रुपये उभारण्याची योजना, प्रक्रिया झाली वेगवान
वृत्तसंस्था, मुंबई
एनएसई म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांचा आयपीओ सप्टेंबरमध्ये बाजारात दाखल होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या आयपीओच्या माध्यमातून एनएसई 30000 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. आयपीओ जर का यशस्वी झाला तर हुंडाईच्या आयपीओला मागे टाकण्यामध्ये एनएसईला यश येणार आहे.
देशातील सर्वात मोठा शेअर बाजार एनएसई यांचे मूल्य 5 लाख कोटी रुपये इतके आहे. या आयपीओच्या सादरीकरणापूर्वी पुढील आठवड्यात यासंदर्भातले मार्केटिंग केले जाणार आहे. अमेरिका, लंडन आणि सिंगापूरमध्ये गुंतवणूकदारांसोबत लवकरच बैठक होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
आयपीओसंदर्भात तयारी गतीमान
एनएसईने आपला अर्ज जूनमध्ये नियामकाकडे सादर केला होता. एनएसईच्या समभागधारकांमध्ये देशांतर्गत वित्तीय संस्था, विमा कंपन्या, विदेशी गुंतवणूकदार आणि व्यक्तिगत गुंतवणूकदार यांचा समावेश आहे. आयपीओ संदर्भात कंपनीची बँकांसोबत चर्चा सुरू आहे. सदरचा आयपीओ हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल अंतर्गत असणार आहे. एनएसईमधील सध्याचे समभागधारक 14.89 कोटी समभाग म्हणजेच कंपनीतील जवळपास 6 टक्के इतकी हिस्सेदारी विक्रीसाठी ठेवणार आहेत.
कोण विकू शकतं समभाग
ऑफर फॉर सेलमध्ये टेमासेक होल्डिंग्ज पीटीई, एलआयसी, एसबीआय आणि एसबीआय कॅपिटल मार्केट लिमिटेड हे समभाग विकू शकतात. एसबीआय 2.475 कोटी समभाग विकू शकतात, असेही म्हटले जात आहे. एनएसईच्या आयपीओसंदर्भात रोड शो देखील केले जाणार असल्याचे समजते. हुंडाई मोटर इंडिया यांचा आयपीओ ऑक्टोबर 2024 मध्ये लॉन्च करण्यात आला होता आणि त्यामधून कंपनीने जवळपास 27 हजार 870 कोटी रुपयांची उभारणी केली होती. एनएसईमध्ये 1.8 लाख समभागधारक आहेत.
कोणाची हिस्सेदारी अधिक
एनएसई संचालक मंडळाने 6 फेब्रुवारी रोजी आयपीओला मंजुरी दिली होती. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसी यांची सर्वाधिक 10.72 टक्के इतकी हिस्सेदारी एनएसईमध्ये आहे. भारतीय स्टेट बँक आणि त्यांचे सहकारी एसबीआय कॅपिटल मार्केट यांची संयुक्त हिस्सेदारी एनएसईमध्ये 7.5 टक्के इतकी आहे.