टाटा मोटर्सची इलेक्ट्रीक सुधारीत ‘पंच’ लवकरच होणार लाँच
20 तारखेला होऊ शकते लाँच : हिस्सेदारी वाढवण्याचा होणार प्रयत्न
मुंबई :
टाटा मोटर्स ही ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठी कंपनी आपली नवी सुधारीत पंच ही इलेक्ट्रिक कार येत्या 20 तारखेला लॉन्च करू शकते. टाटा मोटर्सची पंचची इलेक्ट्रिक वाहनाची सुधारित आवृत्ती 20 फेब्रुवारी रोजी बाजारामध्ये दाखल केली जाणार आहे.
काय म्हणाले सीईओ
टाटा मोटर्सचे प्रवासी वाहन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ शैलेश चंद्रा म्हणाले की टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांच्या स्पर्धेमध्ये उतरताना 70 ते 75 टक्के बाजार हा नव्या कार लॉन्चमुळे विस्तारित झाला आहे. गेल्या काही कालावधीमध्ये बाजारातील हिस्सेदारी काहीशी घटलेली असली तरी कंपनी आता पुन्हा फॉर्मात येणार आहे. सध्याची बाजारातील हिस्सेदारी 46 टक्के असून त्यामध्ये येत्या काळात नव्या कार लॉन्चमुळे वाढ होऊ शकते.
टाटा मोटर्स सध्याला 8 लाख ते जवळपास 30 लाख रुपये इतकी किंमत असणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांचे सादरीकरण मागणीनुसार करत आहे. या आधी सादर करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहनांचे पुन्हा नव्याने (सुधारीत आवृत्ती)सादरीकरण करण्याची मोहीम सुरूच असणार आहे.
सिएरा इलेक्ट्रीक कार येणार
बाजारामध्ये टिकून राहण्यासाठी कंपनी धोरणात आवश्यक बदलही करू शकते. याचाच एक भाग म्हणून पंचची सुधारित आवृत्ती 20 तारखेला सादर केली जाणार आहे. या व्यतिरिक्त सिएरा ही गाडी सुद्धा इलेक्ट्रीक पुढील आर्थिक वर्षांमध्ये लॉन्च करण्याचे नियोजन केले जात आहे.