एनएसए डोवालांची चीनच्या उपाध्यक्षांशी चर्चा
अनेक देशांच्या शिष्टमंडळांच्या प्रमुखांनाही भेटले
वृत्तसंस्था/ बीजिंग
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी चीनचे उपाध्यक्ष हान झेंग यांची भेट घेत चर्चा केली आहे. ही भेट बीजिंगमध्ये ‘ग्रेट हॉल ऑफ द पीपल’मध्ये झाली असून तेथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सुरक्षा परिषदेच्या सचिवांची 20 वी बैठक पार पडली आहे. डोवाल हे या बैठकीत सामील अन्य देशांच्या शिष्टमंडळांच्या प्रमुखांसोबत हान झेंग यांना भेटले आहेत.
सीमापार दहशतवाद फैलावणारे गुन्हेगार, कट रचणारे आणि दहशतवाद्यांना वित्तपुरवठा करणाऱ्यांना उत्तरदायी ठरविले जावे. तसेच दहशतवाद विरोधी लढाईत दुटप्पीपणा अवलंबिला जाऊ नये असे डोवाल यांनी एससीओच्या बैठकीत बोलताना म्हटले आहे.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेली कारवाई ही संघर्ष वाढविणारी नव्हती. दहशतवाद, फुटिरवाद आणि उग्रवादाचा सामना करण्यासाठी माहितीचे आदान-प्रदान करण्यात यावे असे डोवाल यांनी बैठकीत म्हटले आहे.
डोवाल यांनी तत्पूर्वी रशियन सुरक्षा परिषदेचे उपसचिव अलेक्झेंडर वेनेदिक्तोव्ह यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांनी परस्पर संबंध, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे. लवकरच रणनीतिक चर्चेच्या पुढील फेरीसाठी डोवाल यांचे रशियात स्वागत करण्यास उत्सुक आहोत असे रशियन शिष्टमंडळाने नमूद केले. तसेच दोन्ही देशांनी यावेळी विशेष रणनीतिक भागीदारीच्या आधारावर परस्पर सहकार्य वाढविण्यावर जोर दिला आहे.
चीनच्या विदेश मंत्र्यांची भेट
डोवाल यांनी सोमवारी चीनचे विदेशमंत्री वांग यी यांची भेट घेतली होती. यादरम्यान डोवाल यांनी क्षेत्रीय शांतता आणि स्थिरतेसाठी दहशतवादाचे प्रत्येक रुप आणि स्वरुपाच्या विरोधात कठोर कारवाईच्या आवश्यकतेवर जोर दिला. तसेच भारत-चीन द्विपक्षीय संबंधांची समीक्षा यावेळी करण्यात आली.