Nrusihvadi Kshetra: 'दिगंबरा, दिगंबराच्या जयघोषात, नृसिंहवाडीत पहिला दक्षिणद्वार सोहळा, भाविकांची रीघ
कृष्णेचे पाणी मुख्य मंदिराच्या उत्तर द्वारातून आत गाभाऱ्यात आले.
By : रवींद्र केसरकर
नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे या मोसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संपन्न झाला. दरम्यान, रविवारी हा सोहळा पाणीपातळी वाढल्याने होईल अशी अपेक्षा होती. मात्र पावसाने दिलेली उघडीप धरणातील विसर्गामुळे दक्षिण द्वारापर्यंत आलेले पुराचे पाणी ओसरले. त्यामुळे दत्त भक्तांची दक्षिणद्वार स्नानाची प्रतीक्षा अपुरी राहिली.
अखेर मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास कृष्णेच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन दत्त मंदिरात पुराचे पाणी शिरले. पहाटेपासूनच पाण्याची पातळी वाढण्याची गती वाढली आहे. दुपारी एकच्या सुमारास कृष्णेचे पाणी मुख्य मंदिराच्या उत्तर द्वारातून आत गाभाऱ्यात येऊन श्रींच्या चरण कमलावरून दक्षिण दरातून बाहेर पडले व दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला.
दरम्यान, या ठिकाणी पवित्र स्नान करण्यासाठी शेकडो भाविकांनी याचा लाभ घेतला. दत्त मंदिरात पाणी आल्याने येथील सर्व साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून बुधवारी दुपारची महापूजा श्रींच्या उत्सव मूर्तीवर करण्यात आली. मुख्य पादुका पाण्याखाली गेल्याने श्रींची उत्सव मूर्ती भक्तांच्या दर्शनासाठी श्री नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आले आहे.
येथेच सर्व नित्य कार्यक्रम पार पडणार आहेत. दरम्यान, दक्षिणद्वार पवित्र स्थानासाठी दत्त देव संस्थानाने चोख व्यवस्था केली होती. 'दिगंबरा, दिगंबरा, अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त'चा जयघोष करत शेकडो भाविकांनी येथे पवित्र स्नानाचा लाभ घेतला.