Ganeshotsav 2025: नृसिंहवाडीतील अजिंक्य मंडळाची समाजप्रबोधनाची पन्नास वर्षे
याची हुरहुर या मंडळातील प्रत्येक सदस्यांच्या कुटुंबाला लागलेली असते
नृसिंहवाडी : शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे 1975 साली काही तरुणांनी एकत्र येत समाज प्रबोधन करण्याच्या दृष्टीने काहीतरी करावे, या उद्देशाने अजिंक्य मंडळाची स्थापना केली. पहिली काही वर्षे सदस्यच आपल्या घरातून मंडप उभारण्यासाठी साहित्य स्वत:हून आणत होते.
त्यानंतर त्यांनी समाज प्रबोधनपर हलते देखावे मंडळातील सदस्य स्वत: तयार करून सादर करत होते. त्यानंतर यात बदल होत हेच देखावे मंडळातील कार्यकर्ते स्वत: नाटिका तयार करून सजीव देखावे सादर करू लागले. ज्याला परिसरात चांगला प्रतिसाद मिळवला.
या मंडळाचे वैशिष्ट्या म्हणजे या अजिंक्य मंडळात असणारे सभासद हे वेगवेगळे प्रकारचे कारागीर आहेत. स्वत:ची कल्पकता राबवून हे कार्यकर्ते मंडप सजावट, स्टेज सजावट, देखावे, लायटिंगची मांडणी करत होते. मंडळाने सातत्याने आगमन व विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यातच साजरी केली.
लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण आत्मीयतेने या मंडळात होणाऱ्या सर्व उपक्रमात सहभाग घेतात. गणपती उत्सव कधी येतो आणि सकाळची नऊची आरती आणि सायंकाळची साडेसातशे आरती याचबरोबर अन्य कार्यक्रम कधीहोतात, याची हुरहुर या मंडळातील प्रत्येक सदस्यांच्या कुटुंबाला लागलेली असते.
वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिर असे सामाजिक उपक्रम राबवताना 15 वर्षांपासून सातत्याने शिवराज्याभिषेक दिनी रक्तदान शिबिर घेतले जात आहे. या मंडळाचे रक्तदाते ‘मंगेश पुजारी’ यांनी आतापर्यंत 84 वेळेला रक्तदान करून एक वेगळा विक्रम नोंदवला आहे.
याचबरोबर यापासून प्रेरणा घेऊन मंडळातील 30 ते 40 सदस्य दरवर्षी शिबिरा शिवाय अन्य वेळी गरजू रुग्णांना रक्त पाहिजे असल्यास रक्तदान करण्यास सदैव तत्पर असतात. या मंडळातील संस्थापक सदस्य साठीला पोहोचले आहेत, मात्र त्यांनी आपले कार्य पुढील युवा पिढीकडे सोपवले आहे. युवा पिढीने त्यांचा आदर्श पुढे ठेवून मंडळाच्या पन्नासाव्या वर्षी या सर्व 25 हून अधिक असणाऱ्या संस्थापक सदस्यांचा कोल्हापुरी फेटा, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन शिरोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड यांच्या हस्ते सत्कार केला आहे.
मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आगमन, विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्ये तसेच 11 दिवस विविध समाजप्रबोधनपर व्याख्यानमाला, महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, होम मिनिस्टर तसेच मैदानी खेळ, महिला लेझीम पथक असे कार्यक्रम राबवले जात आहेत.
वैशिष्ट्या म्हणजे या मंडळाचा कोणी असा एक अध्यक्ष नाही, सर्वजण कार्यकर्ते आपणच अध्यक्ष आहे, या नात्याने मंडळात पडेल ते काम करत असतात. आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत समाजप्रबोधनपर देखाव्याचे सादरीकरण केले जाते. या मंडळाचे पन्नासहून अधिक सभासद आहेत.