गोल्ड लोनवर आता अधिक कर्ज मिळणार
1 लाख रुपयांच्या सोन्यावर बँका 85,000 पर्यंत रक्कम देणार
वृत्तसंस्था/ .मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँकेने सुवर्ण कर्जाच्या (गोल्ड लोन) नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. रिझर्व्ह बँकेने 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या सोन्याच्या कर्जावर कर्ज-मूल्याचे (एलटीव्ही) प्रमाण 75 टक्क्यांवरून 85 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. साहजिकच आता आता 1 लाख रुपयांच्या सोन्यावर 85,000 रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येईल. पूर्वी ही मर्यादा 75,000 रुपये होती. 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या लहान गोल्ड लोनसाठी क्रेडिट मूल्यांकनाची आवश्यकता राहणार नाही, म्हणजेच कागदपत्रे कमी होतील आणि कर्ज वितरण जलद होईल. यामुळे लहान कर्जदारांना, विशेषत: ग्रामीण आणि लहान शहरी भागात राहणाऱ्यांना कर्ज मिळणे सोपे होईल. या निर्णयामुळे गोल्ड लोन देणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. या निर्णयानंतर मुथूट फायनान्स, मणप्पुरम फायनान्स आणि आयआयएफएल फायनान्सच्या शेअर्समध्ये 2 ते 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे.