आता गुगल पे वर सोने कर्ज मिळणार
जेमिनी एआय हिंदीसह अन्य 8 भारतीय भाषांमध्ये सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगातील दिग्गज टेक कंपनी गुगलने ‘गुगल फॉर इंडिया’ इव्हेंट आयोजित केला होता. या उपक्रमाचे यंदाचे 10 वे वर्ष आहे. या कार्यक्रमात जेमिनी एआय हिंदी आणि अन्य 8 भारतीय भाषांमध्ये सादर करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच आता गुगल पे वर सोने कर्ज देखील मिळणार आहे.
देशभरातील गुगल पे वापरकर्त्यांसाठी आता गोल्ड लोन उपलब्ध होणार आहे. यासाठी गुगलने मुथूट फायनान्ससोबत भागीदारी केली आहे. कंपनीने अद्याप कर्ज प्रक्रियेची माहिती दिलेली नाही. गुगल पेनेही आपली कर्ज मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली असल्याची माहिती आहे.
अदानी समूह आणि क्लियरमॅक्ससोबत भागीदारी
गुगलने भारतातील आपले बस्तान वाढवण्यासाठी अदानी समूह आणि क्लियरमॅक्ससोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारींतर्गत, गुजरातमधील खवरा येथे 61.4 मेगावॅटचा सौर-पवन प्रकल्प, राजस्थानमध्ये 6 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प आणि कर्नाटकमध्ये 59.4 मेगावॅटचा पवन प्रकल्प स्थापित केला जाणार आहे. गुगलने 2026 पर्यंत भारतीय ग्रीडमध्ये 186 मेगावॅट नवीन स्वच्छ ऊर्जा निर्मिती क्षमता जोडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
जेमिनी लाइव्ह हिंदीमध्ये लाँच
गुगलने हिंदी भाषेत जेमिनी लाइव्ह लाँच केले आहे, जे या वर्षी ऑगस्टमध्ये पिक्सेल फोनमध्ये पहिल्यांदा सादर केले होते. यासोबतच कंपनी येत्या काही आठवड्यात जेमिनी लाइव्हमध्ये बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, तेलुगु, तामिळ आणि उर्दूसह 8 भारतीय भाषांचा समावेश केला जाईल.
गुगल इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक रोमा दत्ता चौबे यांनी भारतासाठी गुगलची 10 वी आवृत्ती 2024 लाँच केली. त्या म्हणाले, पूर्वी तास तास रांगेत थांबून रेल्वेचे तिकीट काढावे लागत होते. ते दिवस आता सरले. तसेच बिल भरण्यासाठीही थांबावे लागत होते. पण आता हीसुविधा गुगलने ग्राहकांना एका क्लिकवर उपलब्ध केलीय. गेल्या 20 वर्षात भारताने गुगलच्या बरोबरीने स्टेप बाय स्टेप प्रगती केली आहे. यूपीआयने पेमेंटमध्ये क्रांती केली आहे आणि ऑर्डर दहा मिनिटांपेक्षा कमी वेळेत वितरित केल्या जात आहेत.
युपीआय सर्कल फिचर लाँच
गुगलने आपल्या ऑनलाइन पेमेंट सेवेत गुगल पेमध्ये युपीआय सर्कल नावाचे नवीन फिचर सादर केले आहे. या सर्कलद्वारे पेमेंट करणारा वापरकर्ता यूपीआय खात्यातून आवश्यक मर्यादेसह कोणत्याही व्यक्तीसोबत व्यवहार अधिकृत करू शकतो. अलीकडेच सरकारने यूपीआय सर्कल डेलिगेटेड पेमेंट सेवा सुरू केली होती. आतापर्यंत ही सुविधा फक्त भिम अॅपमध्ये उपलब्ध होती. याद्वारे एका महिन्यात जास्तीत जास्त 15 हजार व्यवहार करता येतील.