आता राष्ट्र प्रतिष्ठेचे काम करावे लागणार
बुलंदशहरातील सभेत भगवान ‘रामा’चा उल्लेख : 2024 च्या निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ
वृत्तसंस्था /बुलंदशहर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी भगवान रामाचे नाव घेत उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर येथून लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शंखनाद केला आहे. या सभेत बोलताना मोदींनी उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचेही स्मरण केले. या भूमीने कल्याण सिंह यांच्यासारखे सुपुत्र दिले आहेत. कल्याण सिंह हे आज जेथे कुठे असतील तेथून अयोध्या धाम पाहून आनंदी होत असतील. परंतु अद्याप सशक्त राष्ट्राच्या निर्मितीचे, सामाजिक न्यायाचे स्वप्न पुढे नेण्यासाठी आम्हाला वेग वाढवावा लागणार आहे. आम्हाला मिळून काम करावे लागेल. अयोध्येत प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पार पडला आता राष्ट्र प्रतिष्ठेचे काम करावे लागणार असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
विकसित भारताची निर्मिती उत्तरप्रदेशच्या वेगवान विकासाशिवाय शक्य नाही. कृषिक्षेत्रापासून ज्ञान, विज्ञान, उद्योगापर्यंत प्रत्येक शक्तीला जागृत करावे लागणार आहे. आजचे हे आयोजन याच दिशेने आणखी एक अन् मोठे पाऊल आहे. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात विकासला काही क्षेत्रांपुरती मर्यादित ठेवण्यात आले होते. देशाचा एक मोठा हिस्सा विकासापासून वंचित राहिला. यात उत्तरप्रदेशचाही समावेश आहे. उत्तरप्रदेशात सर्वात मोठी लोकसंख्या राहत असूनही विशेष लक्ष देण्यात आले नव्हते. दीर्घकाळ येथे सरकार राहिलेल्या पक्षांनी शासकांप्रमाणे वर्तन केल्याने हे घडले होते. जनतेला अभावात ठेवून, समाजात फूट पाडून सत्ता मिळविणे हेच या पक्षांना सर्वात सोपे वाटले. याची किंमत उत्तरप्रदेशच्या अनेक पिढ्यांनी मोजली आहे. तसेच देशाचेही यामुळे मोठे नुकसान झाले असल्याचे मोदींनी म्हटले.
पश्चिम उत्तरप्रदेशात महामार्गांचे जाळे
देशातील सर्वात मोठे राज्यच कमजोर असेल तर देश शक्तिशाली कसा असू शकतो? उत्तरप्रदेशला प्रथम शक्तिशाली करावे लागणार आहे. मी उत्तरप्रदेशचा खासदार असल्याने माझी विशेष जबाबदारी आहे. आज भारतात राष्ट्रीय महामार्गांचा वेगाने विकास होत आहे. अनेक राष्ट्रीय महामार्ग पश्चिम उत्तरप्रदेशात निर्माण होत आहेत. उत्तरप्रदेशच्या प्रत्येक हिस्स्याला आम्ही आधुनिक द्रुतगती मार्गांशी जोडत आहोत असे उद्गार मोदींनी काढले आहेत.
19 हजार कोटींचे प्रकल्प
पश्चिम उत्तरप्रदेशच्या विकासासाठी 19 हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे प्रकल्प सुरू झाले आहेत. हे प्रकल्प रेल्वेमार्ग, महामार्ग, पेट्रोलियम पाइपलाइन, पाणी, सांडपाणी निचरा, वैद्यकीय महाविद्यालय आणि औद्योगिक शहराशी संबंधित आहेत. 22 रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन झाले आणि आता येथे जनता जनार्दनाचे दर्शन करण्याचे भाग्य मिळाल्याचे वक्तव्य मोदींनी केले आहे.
सर्वाधिक रोजगार देणारे केंद्र
जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाची निर्मिती पूर्ण झाल्यावर या क्षेत्राला नवी शक्ती, नवे उ•ाण मिळणार आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे आज पश्चिम उत्तरप्रदेश रोजगार देणाऱ्या प्रमुख केंद्रांपैकी एक ठरले आहे. केंद्र सरकार देशात चार नवी औद्योगिक स्मार्ट शहरे स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. यातील एक औद्योगिक स्मार्ट शहर पश्चिम उत्तरप्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये निर्माण करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण वसाहतीचे उद्घाटन करण्याचे भाग्य आज मला मिळाल्याचे मोदींनी नमूद पेले आहे.