For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता खाणींतून पाणी

06:24 AM Dec 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
आता खाणींतून पाणी
Advertisement

परंपरागत व्यवहारांपासून पर्यावरण शास्त्रापर्यंत सर्वत्र पाण्याला एक महत्त्वाचा स्त्राsत मानले जाते. पाण्याचा त्या दृष्टीने उपयोग व त्याचे महत्त्व समजून घेतानाच या क्षेत्रातील जाणकार व विषय तज्ञांनी देशांतर्गत लहान-मोठ्या आकाराच्या व मोठ्या संख्येत असणाऱ्या खाणींमध्ये उपलब्ध पाण्याचा उपयोग प्रसंगी पिण्याचे पाणी म्हणून सुद्धा होऊ शकतो असा अभ्यासपूर्ण पुढाकार घेतला असून त्यादृष्टीने प्रयत्नांना सुरूवातदेखील झाली आहे.

Advertisement

या संदर्भातील प्रमुख उल्लेखनीय मुद्दा म्हणजे रांची येथील सुप्रसिद्ध ‘सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाईन इन्स्टिट्यूट’ म्हणजेच ‘सीएमपीडीआय’ या संस्थेतील कोळसा खाणींसह देशातील सर्व खाणींचा अभ्यास करून असे स्पष्ट करण्यात आले आहे की सद्यस्थितीत सरासरी स्वरूपात देशातील 436 कोळसा खाणींमध्ये सुमारे 2700 किलोलीटर्स पाणी उपलब्ध असते व या पाण्याचा उपयोग देशातील विविध कामांसाठी होऊ शकतो.

‘सीएमपीडीआय’ च्या याच अभ्यासात नमूद केलेल्या आकडेवारीनुसार आपल्या कोळसा खाणींमध्ये दरवर्षी साठवण स्वरूपात जे पाणी शिल्लक उरते त्या पाणीसाठ्याद्वारा ऑलिंपिकच्या 11000 पोहण्याच्या टाक्यांसाठी आवश्यक पाण्याची गरज भागवली जाऊ शकते. आपल्या याच खाण पाण्याच्या अभ्यासाच्या पाठपुराव्याद्वारे सीएमपीडीआयने प्रायोगिक स्तरावर झारखंड या कोळसाबहुल राज्यातील खाणींमधील पाणसाठ्यांचा त्यातील पाण्याच्या दृष्टीने अभ्यास केला. या पाण्याचा उपयोग विविध कामांसाठी उत्पादक व उपयुक्त पध्दतीने होऊ शकतो असे आढळून आल्याने प्रयोगाच्या पुढील टप्यात आणखी 14 खाणींमधील पाणसाठ्यांचा उपयोग केला गेला हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.

Advertisement

खाणींमधील पाण्याच्या उपयोगाचा पहिला यशस्वी टप्पा गाठला गेला 2021 मध्ये. या पाणी प्रयोगाचे पहिले लाभार्थी ठरले ते झारखंडच्या रायगड जिल्ह्याच्या पांडी पंचायतीतील रहिवासी. त्यांना कोल इंडिया अंतर्गत आरा-8 खाणीतील उपलब्ध पाण्याचा उपयोग गावकऱ्यांच्या विविध उपयोगांसाठी होऊ शकला. याच पाणी उपक्रमाचा अवलंब नंतर आरा खाणीच्या विविध ठिकाणी यशस्वीपणे केला गेला.

पाण्यासाठीच्या या प्रयत्नांची एकूण पार्श्वभूमी म्हणजे कोळसाखाण क्षेत्रात पावसाळ्यादरम्यान साचलेले पावसाचे पाणी व त्यानंतर पण वेगवेगळ्या जलस्त्राsतांद्वारे झिरपून खाण क्षेत्रांमधील पाणवठ्यांमध्ये साचणारे पाणी याची साठवण वर्षानुवर्षे व परंपरागत स्वरूपात होत होती. पण या अशा प्रकारे नैसर्गिक स्वरूपात साचलेल्या पाण्याचा उपयोग कशा प्रकारे करता येईल यावर फारसा विचार झाला नव्हता.

मात्र गेल्या काही वर्षात केंद्र सरकारच्या कोळसा मंत्रालयातर्फे कोळसा खाणींमधील पाणसाठ्यांचा उपयोग केला जाऊ शकतो का यावर विचार सुरू झाला. सुरूवातीचे प्रयत्न फलदायी ठरले नाहीत. मात्र या प्रयत्नांमध्ये सातत्य असल्याने त्याची उपयुक्तता सर्वांना समजली. तशातच कोळसा खाण क्षेत्र व परिसरातील ग्रामीण व रहिवाशांसाठी पावसाळ्यानंतर सुमारे 6 महिने पाण्याचे दुर्भिक्ष कायमचे असायचेच.

यातूनच खाण परिसरातच राहणारे कोल इंडियाचे अधिकारी व तज्ञ यांनी खाणींमधील पाण्याचा उपयोग लोकांच्या वापरासह पिण्याचे पाणी म्हणून करता यावा यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवले व याच प्रयत्नांची परिणती गेल्या सुमारे 5 वर्षांपासून करता येऊ लागला. केंद्रीय कोळसा खाण मंत्री जी. किशन रे•ाr यांनी नव्यानेच जाहीर केलेल्या निर्णयानुसार सद्यस्थितीत कोल इंडिया व त्याच्या अंतर्गत असणाऱ्या विविध कोळसा खाणींमधील अशाप्रकारे उपलब्ध असणाऱ्या पाण्याचा खाण व परिसरातील रहिवासी नागरिकांसाठी करण्यावर केंद्रीय स्तरावर प्राधान्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.

यासंदर्भात केंद्र सरकारच्या विशेष प्रयत्नांतून मर्यादित स्वरूपात अथवा दीर्घकालीन संदर्भात खाणकाम खोदकाम वा वापरासाठी नसणाऱ्या खाणींमध्ये साचलेल्या व उपलब्ध असणाऱ्या पाण्याच्या वापरावर विचार करून त्याचा उपयोग करण्यासाठी विशेष भर दिला गेला. यातूनच खाणींच्या प्रयत्नांना प्रयत्नपूर्वक यश येत गेले हे या संदर्भात उल्लेखनीय आहे. याचेच पाणीदार परिणाम आता दिसून येत आहेत.

कोळसा खाणींमध्ये तर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असतात. पिढ्यान पिढ्या या रोजगार संधींचा लाभ मिळाला आहे. मात्र आता या खाणींमध्ये उपलब्ध असणाऱ्या या पाण्याचा उपयोग खाण परिसरातील गरजू ग्रामीणांसाठी होणार आहे, हे महत्त्वाचे. या पाण्यापैकी काही पाणी ग्रामीण व लघु उद्योगांसाठी पण उपयुक्त ठरणार असून त्यामुळे काही प्रमाणात स्वयंरोजगारासह रोजगार संधी उपलब्ध होऊ घातल्या आहेत.

‘आयएपीडीआय’सह जल तज्ञांतर्फे करण्यात आलेल्या अभ्यासानुसार या तज्ञांच्या मते हे पाणी सर्व प्रकारच्या वापरासाठी योग्य असून पिण्याच्या दृष्टिने त्याचा उपयोग करायचा झाल्यास पाण्यावर प्रक्रियेसह शुद्धीकरण करुनच त्याचा वापर करावा, असा सल्लादेखील तज्ञ मंडळींनी दिला आहे. यासंदर्भात आपल्या कोळसा खाणींमध्ये उपलब्ध असणाऱ्या पाण्याचा पाश्चिमात्य देशांमधील खाणींमधील पाण्याच्या संदर्भात तुलनात्मक अभ्यास करुन सीएमपीडीआयने असे स्पष्ट केले आहे की पाश्चिमात्य देशांमधील खाणींमध्ये करण्यात आलेल्या प्रक्रियांमुळे तेथील पाणी रसायनयुक्त असल्याने विशेषत: मानवीय उपयोगांसाठी घातक ठरु शकते. भारतात मात्र येथील खाणींमध्ये अशी प्रक्रिया होत नसल्याने कोल इंडियाच्या खाणींमध्ये साठणाऱ्या व उपलब्ध असणाऱ्या पाण्याची उपयुक्तता निश्चितपणे उजवी व दर्जेदार ठरते.

याचेच प्रत्यंतर विविध अभ्यास आणि अहवालांमधून येत असते. सीएमपीडीआयचे जनसंपर्क अधिकारी कोल इंडिया अंतर्गत खाणींमध्ये उपलब्ध पाण्याचा ग्रामीणांसाठी व विशेषत: त्यांचा घरगुती व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिने वापर करण्याआधी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळातर्फे पाण्याची संपूर्ण चाचणी केली जाते व मंडळाच्या अभ्यास आणि चाचणी प्रमाणपत्रानंतरच हे पाणी पिण्यायोग्य समजले जाते व त्यानुसार संबंधित गरजू, ग्रामीण क्षेत्रातील रहिवाशांसाठी वापर केला जातो. खाणीतून पाणी या नव्या पाणीदार प्रयत्नांमुळे खाण क्षेत्रातील रहिवाशांची पाण्याची गरज व प्रसंगी तहान भागविण्याचे हे भगीरथ प्रयत्न म्हणूनच अभिनंदनीय ठरतात.

- दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :

.