आता मतदार नोंदणी अर्ज 17 वर्षांनंतर करता येणार
वर्षातून तीनवेळा अर्ज करण्याची सुविधा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आता मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी तरुणांना वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याची प्रतिक्षा करावी लागणार नाही. वयाची 17 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तरुणांना मतदार कार्डसाठी आगाऊ अर्ज करता येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांनी सर्व राज्यांतील संबंधित अधिकाऱयांना याबाबत सूचना दिल्या आहेत. नोंदणी केल्यावर तरुणांना निवडणूक फोटो ओळखपत्र दिले जाईल. या ओळखपत्राच्या आधारे वयाची 18 वर्षे पूर्ण होताच आपल्या भागात होणाऱया मतदानामध्ये सदर मतदार आपला हक्क बजावू शकणार आहे.
यापूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करण्यासाठी तरुणांना 1 जानेवारीपर्यंत प्रतिक्षा करावी लागत होती. मात्र, निवडणूक आयोगाच्या सुधारित निर्देशानुसार आता भारताचा नागरिक 17 वर्षांचा झाल्यानंतर 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या तारखांनाही मतदार नोंदणीसाठी अर्ज करू शकणार आहे. या तारखांना प्रशासकीय पातळीवर विशेष मतदार नोंदणी अभियान राबविले जाणार आहे. नवीन सूचनांनुसार मतदारयादी दर तिमाहीला अद्ययावत केली जाईल. त्याचबरोबर पात्र तरुणांची नावे वर्षाच्या पुढील तिमाहीत मतदारयादीत समाविष्ट केली जातील. सध्या मतदारयादी 2023 मध्ये दुरुस्ती केली जात आहे.
आधार-मतदान कार्ड जोडणीसाठीही मोहीम
निवडणूक आयोगाने मतदारयादी आधारशी जोडण्याची मोहीम सुरू केली आहे. यासाठी 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. अभियानात मतदारयादीत समाविष्ट असलेले प्रत्येक नाव आधार क्रमांक घेऊन आधारशी लिंक करण्यात येणार आहे. मतदारयादी आधारशी लिंक झाल्यानंतर दोन ठिकाणी असलेली नावे आपोआपच रद्द होतील. त्याचबरोबर ज्या मतदारांकडे आधार क्रमांक नाही त्यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. मतदारांना आधारकार्ड क्रमांक ऑनलाईनही देता येणार आहे. मतदारकार्ड आधारशी लिंक करण्यासाठी सरकार आग्रही आहे, तर विरोधक विरोध करत आहेत. आधार-मतदान कार्ड जोडणीतून सरकार ‘राईट टू प्रायव्हसी’चे उल्लंघन करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.