कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आता मुख्यमंत्र्यांच्या पाठिलाही हवेत डोळे!

06:30 AM May 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेकदा गमतीशीर बोलतात. सांगलीत शुक्रवारी झालेल्या मेळाव्याच्यावेळी व्यासपीठावरील मंडळींची नावे घेताना कोणाचे राहिले तर ती चूक लिहून देणाऱ्याची असेल कारण वक्त्याच्या पाठिला डोळे असत नाहीत अशी मिश्किल टिप्पणी केली. पण, धुळेत विधीमंडळाचे मोठेपण धुळीला मिळवणाऱ्या 1 कोटी 84 लाख 84 हजार दोनशे रूपयांच्या नोटा विधीमंडळ अंदाज समितीच्या प्रमुखांच्या स्वीय सहाय्यकाच्या खोलीत मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या पाठिलाही डोळे असण्याची गरज निर्माण झाली आहे. एसआयटी नेमणार तरी किती? आधी नेमलेल्यांनी काय केले?

Advertisement

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेला मोठ्या विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. सहा महिने झाले सरकार सत्तेवर येऊन. पण, राज्यात रोज नवी नौटंकी घडताना दिसत आहे. कधी ती सत्तेतील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये निर्माण होणाऱ्या बेबनावाची असते, कधी एखादा मंत्री आपल्याच पक्षाच्या नेत्याविरोधात कुरघोडी करताना सापडतो, कधी एक मंत्री असा कारभार करतो की त्याच्यामुळे त्याच्या पक्षाच्या प्रमुखाला आपल्या पदाचीच धास्ती वाटू लागते शिवाय त्याला पदावरून काढावे की न काढावे, काढले तर काय तोटा होईल याच्या विचारातच वेळ घालवावा लागतो. कधी एका उपमुख्यमंत्र्याचा रूसवा काढता काढता हजारो कोटीची कामे त्यांच्या मनाप्रमाणे द्यावी लागतात. पुन्हा कुरघोड्यांचे राजकारण होते ते वेगळेच. सत्तेत सहभाग मिळाला नाही म्हणून एक ज्येष्ठ माजी मंत्री भर अधिवेशनात आपल्याच सत्तेच्या विरोधात भूमिका घेतात तर भूजबळांच्यासारखे सर्वात ज्येष्ठ मंत्री पुन्हा मंत्रीमंडळात येण्यामागे आपल्या पक्षाचे नेते नाहीत तर अमित शहा, देवेंद्र फडणवीस आहेत असे सांगून आपल्याच पक्षात आपला सवतासुभा असल्याचे स्पष्टपणे दाखवून देतात. एका कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार त्या विवाहाला गेलो होतो म्हणजे सासरच्यांना पाठिशी घालेन असे समजू नका, असे लोक आपल्या पक्षात नसले तरी चालतील असा धावत पळत खुलासा करतात आणि राज्यातील न्यूज चॅनेलनी आपल्या विरोधात या प्रकरणात मोहीम चालवली असल्याचा खुलासा करतात. एकापेक्षा एक धक्कादायक अशा या घटना आहेत. प्रत्येकाला मुख्यमंत्रीपदच पाहिजे आहे आणि त्यासाठी प्रत्येकजण आपापली खेळी खेळत आहेत त्याचेच हे द्योतक.

Advertisement

अनिल गोटेंचा दे धक्का

पूर्वाश्रमिचे पत्रकार, शेतकरी नेते आणि तेलगी घोटाळ्यात गोवले गेल्याने जेलमध्ये जाऊन येऊन पुन्हा आमदार झालेले नेते अनिल गोटे दे धक्का राजकारणासाठी प्रसिध्द आहेतच. त्यांनी आता महाराष्ट्र विधानमंडळाला धक्का दिला आहे. सोमवारी राज्यातील विधीमंडळ समित्यांच्या निवडी झाल्या. या समित्या म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करतात अशी नेहमीच खासगीत चर्चा असते. मात्र आमदारांची समिती असल्यामुळे हक्कभंगाच्या भयाने कोणीही त्यांच्या विरोधात बोलण्याचे धाडस दाखवत नाहीत. जिल्ह्यात रूबाब गाजवणारे सर्व वरिष्ठ अधिकारी एकत्र येऊन या समितीची बडदास्त ठेवतात आणि त्यांच्या मागणीप्रमाणे पूर्तता करून त्यांना समाधानी करून पाठवितात अशी खूपवर्षाची चर्चा आहे. सत्ता कोणाचीही असली तरी आणि समितीत कोणीही असले तरी हा प्रकार सुरूच असतो. पण, ही झाली फक्त चर्चा. ती सत्य असल्याचा कोणताही पुरावा आजपर्यंत कोणी उघड करू शकले नव्हते.

शिंदेसेनेचे आमदार आणि माजी मंत्री अर्जून खोतकर यांच्या स्वीयसाहाय्यक असलेल्या मंत्रालयातील कक्ष अधिकारी किशोर पाटील याच्यामुळे हे अंडे अखेर फुटले! समितीची निवड होण्यापूर्वीच 15 मे पासून किशोर पाटील याच्या नावाने धुळ्याच्या गुलमोहोर शासकीय विश्रामगृहात जी खोली किशोर पाटील याच्या नावाने आरक्षित होती त्या खोलीत विधिमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांना वाटण्यासाठी 5 कोटी रूपये आणल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. ते जेव्हा विश्रामगृह परिसरात आले तेव्हा किशोर पाटील बरीच मोठी रक्कम घेऊन बाहेर पडला असा आरोप करत गोटे यांनी खोली नं. 102 मध्ये अजूनही पैसे आहेत असा आरोप करत बुधवारच्या रात्री त्या वादग्रस्त खोलीच्या बाहेर ठिय्या मारला. अनिल गोटे सध्या ठाकरे सेनेत आहेत. त्यांचा हा ठिय्या निवडणूक काळात भाजप नेते विनोद तावडे हे आपल्या मतदारसंघात पैसे वाटपासाठी आले आहेत असे ठामपणे सांगणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांच्याप्रमाणेच आत्मविश्वासपूर्ण होता! गोटे अडून राहिल्यामुळे सगळ्या वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची गोची झाली आणि नाईलाजाने का होईना त्यांना रात्री उशीरा खोली उघडावी लागली. तर त्यात एक कोटी 84 लाख 84 हजार दोनशे रूपयांचे घबाड सापडले. हे प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून उकळलेले पैसे असून आमदारांना वाटण्यासाठी आणले होते असा गोटे यांचा आरोप आहे. तर समितीचे प्रमुख अर्जून खोतकर यांनी हा सरकारला बदनाम करण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे.

किती एसआयटी नेमणार?

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात अशा घटना घडल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपानेते ज्या आवेशाने त्यावर तुटून पडायचे त्यामुळे दोन्ही काँग्रेस एकतर कारवाई करायचे किंवा संधीची वाट पहायचे. यात त्यांची खूप बदनामी व्हायची. पण, देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर एक रामबाण उपाय शोधला आहे. तो म्हणजे घटना घडताच एसआयटी स्थापन करण्याचा! पण, या चौकशांचे पुढे काय होणार? अब्दूल सत्तार, तानाजी सावंत, सरनाईक यांच्यापासून अनेकांच्या चौकशा वेळोवेळी लावल्या आहेत. पुढे काय? आणखी किती एसआयटी ते नेमणार आहेत? मुख्यमंत्र्यांना आता खरोखरच पाठिलाही डोळे हवे आहेत. ही काळाची गरज आहे. पाठिमागे दबा धरून बसलेल्या मंडळींचे अनुयायी सहज हाती लागत आहेत हे ठीकच पण, त्यातून बदनामीही पदरी पडत आहे. लोकाभिमुख सरकार, घरबसल्या ऑनलाईन सेवा हे ठीकच. पण, सरकारी पैशाचा अपव्यय आणि त्याचा हिशेब तपासायला जाऊन होणारी लूट सरकारला बदनाम करत आहे त्याचे काय? यातून जे राजकारण पिकेल त्याच्या बिया नव्याने कोणते राजकारण जन्माला घालेल?

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article