For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता वेध लागणार तिसऱ्या टप्प्याचे

06:41 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
आता वेध लागणार तिसऱ्या टप्प्याचे
Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची मतदान प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाल्यानंतर, आता तिसऱ्या टप्प्याचे वेध लागणे स्वाभाविक आहे. दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा यांच्यात 10 दिवसांचे अंतर असून हे या निवडणुकीत कोणत्याही दोन सलग टप्प्यांमधील सर्वाधिक अंतर आहे. एकप्रकारे मतदानप्रक्रियेत ही एक छोटी सुटीच आहे, असे म्हणता येईल. 1999 च्या लोकसभा निवडणुकीपासून असा सुटी देण्याचा प्रघात पडलेला दिसून येतो. या काळात राजकीय पक्षांना आतापर्यंत झालेल्या मतदानाचा आढावा घेण्यासाठी आणि त्यानुसार आपले पुढच्या मतदान टप्प्यांचे धोरण ठरविण्यासाठी अधिक कालावधी मिळतो. या टप्प्यात 12 राज्यांमधील 94 मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून हा टप्पाही सत्ताधाऱ्यांसाठी महत्वाचा असेल. या टप्प्यात गुजरात, आसाम, गोवा, कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांमधील मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आदी मोठ्या राज्यांमधील आणखी मतदारसंघांमध्ये मतदान होईल. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांमधील 10 दिवसांमध्ये प्रचारालाही चांगलीच धार येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कालावधीत 40 प्रचारससभांना संबोधित करतील अशी शक्यता आहे. इतर केंद्रीय मंत्री आणि सत्ताधारी आघाडीच्या प्रमुख प्रचारकांच्याही अनेक सभांचे आयोजन  करण्यात आले आहे. विरोधी आघाडीकडूनही प्रचाराचा जोर लावला जाण्याची शक्यता आहे. हा टप्पा या निवडणुकीला अर्ध्या अंतराच्या नजीक घेऊन जाणार आहे.

Advertisement

मतदानाच्या टक्केवारीवर रहाणार लक्ष

पूर्ण झालेल्या दोन टप्प्यांमध्ये मतदानाची टक्केवारी 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत काही प्रमाणात कमी झालेली दिसून आली. तो एका फार मोठ्या चर्चेचा विषय ठरला. वास्तविक मतदानाच्या टक्केवारीत फार मोठे अंतर पडले नाही, तर त्याचा विषेश परिणाम निवडणुकीच्या परिणामावर होत नाही, हे अनेकदा दिसून आले आहे. तरीही अशा चर्चा प्रत्येक विश्लेषक त्याच्या मतानुसार करत राहतो. साहजिकच तिसऱ्या टप्प्याच्या मतदानावरही लक्ष राहणार आहे.

Advertisement

? निवडणूक आयोगाने मतदानात वाढ होण्यासाठी काही नव्या उपाययोजना केल्या आहेत. अनेक राज्यांमध्ये सध्या असलेले उष्णतेची लाट पुढच्या 10 दिवसांमध्ये कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसे झाल्यास उष्ण हवामानामुळे मतदानात घट झाली असले तर ती तिसऱ्या टप्प्यात न होण्याची शक्यता आहे. तसेच आधीच्या दोन टप्प्यांमध्ये झालेली घट मतदारांच्या निरुत्साहामुळे होती की, हवामानामुळे याचेही उत्तर मिळण्याची शक्यता आहे.

कोणती राज्ये कोणासाठी महत्वाची

? तिसऱ्या टप्प्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी या सत्ताधाऱ्यांसाठी सर्वच 10 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेश महत्वाचे आहेत. कारण याच 10 राज्यांमधून गेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा त्यांना मिळालेल्या आहेत. विशेषत: उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार, महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेश यांच्यावर त्यांचे बारकाईने लक्ष राहणार हे निश्चित आहे.

? गेल्या निवडणुकीत याच मतदारसंघांमध्ये विरोधकांना सर्वात मोठा फटका बसला होता. यावेळी आपल्या कामगिरीत सुधारणा करणे हे त्यांच्यासमोरचे प्रमुख ध्येय आहे. यात कामगिरी सुधारल्याशिवाय विरोधी पक्षांना सत्तेच्या जवळ जाणे शक्य होणार नाही, असे विश्लेषकांचे मत आहे. गेल्यावेळी या 94 मतदारसंघातील 80 टक्क्यांहून अधिक जागांवर भारतीय जनता पक्षाला यश मिळाले होते.

काँग्रेससाठी सर्वात वाईट टप्पा

? 2019 च्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता हा तिसरा टप्पा काँग्रेससाठी वाईट ठरला होता. या टप्प्यातील 94 जागांपैकी या पक्षाला केवळ 2 जागांवर विजय मिळाला होता. त्यातील एक जागा गोव्यातील तर एक दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील होती. त्यामुळे काँग्रेसला या टप्प्यात स्थिती सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागणार आहेत, हे स्पष्ट दिसून येते.

दक्षिण पूर्ण होण्याच्या मार्गावर

? तिसऱ्या टप्प्यानंतर दक्षिण भारतातील यंदाची लोकसभा निवडणूक पूर्ण होण्याच्या मार्गावर जाईल. कारण, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक ही तीन राज्ये आणि पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश यांच्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यानंतर चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेशातील 25 जागा आणि तेलंगणामधील 17 जागा आणि आंध्र प्रदेशातील विधानसभेच्या 175 जागांवर निवडणूक होईल.

? दक्षिणेत कर्नाटकातील निवडणूक प्रक्रिया या तिसऱ्या टप्प्यात पूर्ण होईल. या टप्प्यात या राज्यातील उत्तर आणि मध्य भागांमधील 14 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. गेल्या निवडणुकीत या सर्व चौदा जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या होत्या. त्यामुळे हे राज्य आणि विशेषत: या राज्यातील मतदानाचा दुसरा टप्पा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

Advertisement
Tags :

.