For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता भिस्त केवळ पावसावरच !

12:29 PM Jun 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
आता भिस्त केवळ पावसावरच
Advertisement

शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट : टँकरद्वारे पाणीपुरवठा : राकसकोप जलाशयात आठ दिवस पुरेल इतकेच पाणी

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातील पाणीसाठा आटोक्यात आला असल्याने सध्या मृत साठ्यातून दोन विद्युत मोटारींद्वारे पाणी उपसा सुरू आहे. आणखी आठ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध असून पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस न झाल्यास बेळगावकरांना भीषण पाणी टंचाईला सामेरे जावे लागणार आहे. हिडकल आणि राकसकोप जलाशयांतून बेळगाव शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. राकसकोप जलाशयातून येणाऱ्या पाण्यावर लक्ष्मीटेक येथील जलशुद्धीकरण केंद्रात तर हिडकलहून येणाऱ्या पाण्यावर बसवणकोळ येथील शुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते.

सध्या राकसकोप जलाशयाच्या मृत साठ्यातून पाण्याचा उपसा सुरू आहे. त्यासाठी 35 एचपीच्या दोन विद्युत मोटारी जोडण्यात आल्या आहेत. राकसकोपमधून दररोज 20 ते 25 एलएमडी आणि हिडकलमधून 55 एमएलडी पाण्याचा उपसा सुरू आहे. शहराला दररोज 105 ते 110 एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र, दोन्ही जलाशयांतून 75 ते 80 टक्केच पाणी येत असल्याने काही भागात पाण्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे सध्या एलअॅण्डटीकडून 10 ते 12 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. गतवर्षीच्या तुलनेत हिडकल जलाशयात पाण्याचा साठा कमी आहे.

Advertisement

आणखी आठ दिवस पुरेल इतका पाणीसाठा राकसकोप जलाशयात आहे. पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस न झाल्यास पाणीटंचाईची समस्या गंभीर बनणार आहे. मध्यंतरी एलअॅण्डटीकडून समर अॅक्शन प्लॅन राबविण्यात आला होता. त्यामुळे ज्या ठिकाणी पाच ते सहा दिवसांतून पाणीपुरवठा केला जात होता, त्या ठिकाणी सहा ते सात दिवसांतून पाणीपुरवठा केला जात आहे. समर अॅक्शन प्लॅनमुळेच आतापर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य झाले. अन्यथा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच जलाशयातील पाणीसाठा संपला असता.

मृत साठ्यातील पाणी आणखी आठ दिवस पुरण्याची शक्यता असल्याची माहिती एलअॅण्डटीच्या अधिकाऱ्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. राकसकोप जलाशयाची पाणी साठविण्याची क्षमता 2478 फूट इतकी आहे. मात्र, यंदा जलाशय लवकर रिकामा झाल्याने तो पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होणे गरजेचे आहे. लवकर पाऊस न झाल्यास बेळगावकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे एलअॅण्डटीच्या अधिकाऱ्यांची आता केवळ पावसावरच भिस्त आहे.

महापौर, उपमहापौरांची जलाशयाला भेट

शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत असल्याने या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हणमंत कोंगाली, सत्ताधारी गटनेते संतोष पेडणेकर यांच्यासह केयुआयडीएफसी आणि एलअॅण्डटीच्या अधिकाऱ्यांनी राकसकोप जलाशयाला भेट देऊन सद्यस्थितीची पाहणी करण्यासह माहिती जाणून घेतली. यावेळी नगरसेवक आणि मनपा अधिकारीही उपस्थित होते.

32 टँकरद्वारे पाणीपुरवठा

बेळगाव दक्षिण आणि उत्तर भागातील ज्या परिसरात पाण्याची टंचाई आहे, त्या ठिकाणी टँकरद्वारे एलअॅण्डटीकडून पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या दररोज 30 ते 32 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. एखाद्या भागात टँकरची आवश्यकता असल्यास त्यांनी स्थानिक नगरसेवकांशी संपर्क साधावा. नगरसेवकांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा केला जाईल, असे एलअॅण्डटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाणलोट क्षेत्रात पाऊस होणे आवश्यक

राकसकोप जलाशयाच्या मृत पाणीसाठ्यातून 20 ते 25 तर हिडकलमधून 55 एमएलडी पाण्याचा उपसा सुरू आहे. शहराला दररोज 105 ते 110 एमएलडी पाण्याची गरज आहे. पण, या तुलनेत 75 ते 80 टक्के पाणी दोन्ही जलाशयांतून उपलब्ध होत असल्याने काही ठिकणी पाणी समस्या निर्माण होत आहे. चालू महिनाअखेर पुरेल इतका पाणीसाठी राकसकोपमध्ये शिल्लक आहे.

-धीरज उभयकर, व्यवस्थापक एलअॅण्डटी

Advertisement
Tags :

.