For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच

06:36 AM Dec 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
आता पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच
Advertisement

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 15 डिसेंबरला राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाला, तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी 21 डिसेंबरला खातेवाटप करण्यात आले. आता जिह्याचा पालकमंत्री कोण असणार? यासाठी महायुतीतील घटक पक्षात रस्सीखेच सुरू आहे. पालकमंत्री हा त्या जिह्याचा बाप असल्याने प्रत्येक मंत्र्याला आपलाच जिल्हा पालकमंत्री म्हणून मिळावा असे वाटत असते. मात्र मंत्रीमंडळ विस्तारात 15 जिह्यांची पाटी कोरी राहिल्याने या 15 जिह्यांची जबाबदारी कोणाला मिळणार हे देखील बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement

15 डिसेंबरला राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर, या विस्तारात ज्या आमदारांना स्थान मिळाले नाही, त्यांची नाराजी अजुनही कायम आहे. मंत्रीमंडळ विस्तारात भाजप आणि राष्ट्रवादीने ज्येष्ठ नेत्यांना बाजुला सारले तर खातेवाटपात चांगली खाती नवीन चेहऱ्यांना दिली गेली. खातेवाटपानंतर आता जिह्याचा पालकमंत्री कोण हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. जिह्यात कोणत्या पक्षाचे किती आमदार मंत्री असले तरी पालकमंत्र्याला त्या जिह्यात अनन्यसाधारण महत्त्व राहिले आहे. आमदारांना जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून विशेष निधी देण्याची तरतूद पालकमंत्री करत असतात, त्यामुळे जिल्हा नियोजनाच्या बैठकीत अनेक वेळा विरोधीपक्षाचे आमदार विरूध्द पालकमंत्री असा गोंधळ अनेकदा बघायला मिळतो.

जिह्याच्या राजकारणाची सुत्रे आपल्या हातात ठेवण्यासाठी तसेच जिह्यावर आपले वर्चस्व ठेवण्यासाठी हे पद नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. जिह्याचा पोलीस अधिक्षक म्हणजेच एसपी आणि जिल्हाधिकारी कलेक्टर या जिह्यातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींना पालकमंत्र्यांचा आदेश हा नेहमीच अंतिम मानला जातो. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना रायगड जिह्याच्या पालकमंत्री असणाऱ्या आदिती तटकरे या शिवसेनेच्या आमदारांना दुय्यम वागणूक देत असल्याची तक्रार जिह्यातील शिवसेना आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी केली होती, तर उदय सामंत रत्नागिरीचे पालकमंत्री असताना त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी स्थानिक क्रिकेट सामन्याच्या आयोजनावऊन थेट विधानपरिषदेत सामंत यांच्यावर आरोप केले होते. आता पालकमंत्री जसा वादग्रस्त ठरला जातो तसाच तो आपल्या कारकिर्दीत जिह्याचा विकास देखील करतो मग तो बाहेरच्या जिह्याचा असला तरी. गृहमंत्री राहिलेल्या आर. आर. पाटलांनी तर थेट नक्षलग्रस्त गडचिरोली जिह्याचे पालकमंत्रीपद घेतले होते. त्यांच्या काळात जिह्यातील आदिवासी तरूण तरूणींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच नक्षली कारवाईत सक्रिय असणाऱ्यांना आत्मसमर्पण करणारी विशेष योजना आबांनी आणली होती. आबांनी गडचिरोली जिह्याचे पालकमंत्रीपद घेतल्यानंतर महिना दोन महिन्यांनी गडचिरोलीला भेट ठरलेली असायची. पालकमंत्री त्यात गृहखाते आबांकडे असल्याने जिह्यातील प्रशासन आणि पोलीस कधी नव्हे ते अॅक्टीव्ह मोडवर आले. आता मात्र केवळ जिह्यात राजकीय वर्चस्व ठेवण्यासाठी पालकमंत्री हे पद महत्त्वाचे मानले जात आहे.

Advertisement

मंत्रीमंडळ विस्तारानंतर महायुतीतील तीन पक्षामध्ये 11 जिह्यात दोन किंवा अधिक मंत्री असल्याने या जिह्यात पालकमंत्री पदासाठी जोरदार रस्सीखेच बघायला मिळत आहे. ठाणे, पुणे, रायगड, बीड, नाशिक, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, रत्नागिरी आणि यवतमाळ या 11 जिह्यात पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ठाण्यात भाजपचे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात, कोल्हापूरात प्रकाश आबिटकर आणि हसन मुश्रीफ, साताऱ्यात शंभुराज देसाई, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील यांच्यात, जळगावमध्ये गुलाबराव पाटील आणि संजय सावकारे तर नाशिकमध्ये गिरीश महाजन, नरहरी झिरवळ, दादा भुसे, माणिकराव कोकाटे यांच्यात स्पर्धा आहे. नाशिकमध्ये दर बारा वर्षानी कुंभमेळा भरतो आणि 2026-27 मध्ये कुंभमेळा नाशिकला होणार असल्याने नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्याकडे जाऊ शकते. पुण्यातील जबाबदारी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील या दोन इच्छुकांपैकी कोणाकडे जाणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. अजित दादांनी राष्ट्रवादी सोडत भाजप महायुतीत सामील झाल्यानंतर चंद्रकांत दादांचे पालकमंत्रीपद आपल्याकडे घेतले, त्यावेळी भाजपची मानसिकता वेगळी होती. आता मात्र भाजप वेगळया मोडवर आहे. कारण पुण्यात आता भाजपचे आमदार जास्त आहेत. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री दोन दादांमधील कुठले लाडके दादा होणार हे तितकेच महत्त्वाचे असणार आहे.

रायगडमध्ये भरत गोगावले, आदिती तटकरे या दोघांमध्ये चुरस आहे. तर रत्नागिरीत उदय सामंत आणि योगेश कदम या दोघांमध्ये, यवतमाळ जिह्यात अशोक उईके, संजय राठोड आणि इंद्रनील नाईक असे महायुतीतील तीन पक्षाचे तीन मंत्री आहेत, तर बीड जिह्यात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे मंत्री आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे हिवाळी अधिवेशन बीडने गाजवले. देशमुख हत्या प्रकरणात जिह्याच्या पोलीस अधिक्षकाची बदली झाली. या प्रकरणाची धग अजुनही कायम असल्याने बीडचे पालकमंत्री पद हे मुंडे बहीण भावा व्यतिरीक्त तिसऱ्याच मंत्र्याला मिळण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये संजय शिरसाट, अतुल सावे या दोघांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. राज्यातील जवळपास 15 जिल्ह्यांची पाटी कोरी असल्याने या 15 जिह्यांची जबाबदारी कोणाकडे जाणार हे बघणे देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे.

उध्दव ठाकरे यांचे सरकार गेल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सुरूवातीला एका मंत्र्यांवर दोन तसेच तीन जिह्यांची जबाबदारी देण्यात आली होती, स्वत: फडणवीस यांच्याकडे सहा जिह्यांची पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. नंतर अजित पवार महायुती सरकारमध्ये आल्यानंतर झालेल्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर त्या त्या जिह्याला पालकमंत्री मिळाले, त्यात पण काही जणांकडे दोन टोकावरच्या जिह्याची जबाबदारी देण्यात आली होती.

साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे सातारा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिह्याची जबाबदारी होती. बदलापूरमध्ये शाळेतील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर ठाण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई हे सगळ्यात उशिरा तेथे भेट देणारे पालकमंत्री ठरले. यावेळी त्यांच्यावर अखेर पालकमंत्री बदलापूरला येणार अशी माध्यमातून टीका देखील झाली होती. भाजपला 2029 साठी स्वबळावर लढण्याची तयारी करायची असेल तर प्रत्येक जिह्यात भाजपला स्वत:चे वर्चस्व निर्माण करावे लागले. पक्ष विस्तारासाठी पालकमंत्री पद हे महत्त्वाचे ठरले आहे. त्यामुळे महायुतीतील तीन पक्षांमध्ये कोणाला कोणत्या जिह्याचे पालकमंत्री पद मिळणार हे बघणे महत्त्वाचे असेल.

Advertisement
Tags :

.