For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता उत्सुकता विधानसभेची

06:55 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
आता उत्सुकता विधानसभेची
Advertisement

गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्रात जणू निवडणुकीचाच मौसम सुरू आहे. 2019 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात जी सत्तानाट्यां घडत गेली, त्याचा शेवटचा अंक अजूनही लिहिला गेलेला नाही. या पाच वर्षातले काय आठवायचे आणि काय विसरायचे? राज्यात असा एकही पक्ष राहिला नाही ज्याचे आमदार आहेत आणि त्याला सत्तेचा लाभ झाला नाही, अगदी जाता जाता अवघाची एक आमदार असलेला मनसेसुद्धा सत्ताधारी पक्षाचा दूरचा भाऊ झाला. आता महाराष्ट्राला नव्याने निवडणुकीचे वेध लागले आहेत. अर्थात निम्म्याहून अधिक लोकसंख्येला त्याच्याशी फारसे काही देणेघेणे राहिलेले नसले तरी संपूर्ण महाराष्ट्राच्या नावाने ही निवडणूक होऊ घातली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यातील विधानसभेच्या सभागृहांची मुदत ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या दरम्यान संपत असल्याने महाराष्ट्रात एक महिना आधी ऐन दिवाळीच्या तोंडावर निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीवर लोकसभा निवडणुकीचे मोठे सावट असणार आहे. या लोकसभेला जनता काय निर्णय देते त्याच्यावर राज्यातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दोन्ही गटांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. लोकसभेच्या मतदानानंतरचा प्राथमिक अंदाज महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला जनतेतून सहानुभूती मिळाली असल्याचा आहे. त्याचवेळी शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी ज्यांना अधिकृत पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे त्यांचे उमेदवार मात्र अनेक ठिकाणी अडचणीत आल्याचे वातावरण सध्या निर्माण झाले आहे. अर्थात हे सगळेच अंदाज आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणातील गडबडीमुळे दोन ते अडीच वर्षे खोळंबल्याने जनतेच्या मनात नेमके काय चाललेले आहे याचा अंदाज मतपेटीतून व्यक्त झालेला नाही. त्यामुळे लोकसभेचा ईव्हीएममधून जो मतादेश येईल तो या सगळ्या घडामोडी नंतरचा पहिला निकाल ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भातील भाजपच्या वर्चस्वाचे काय होणार, भाजपच्या आग्रहा नंतरही राखलेल्या शिंदेंच्या लोकसभेच्या उमेदवारांना कसे यश मिळणार, उद्धव ठाकरेंचे उमेदवार येथे किती टिकाव धरणार याचा जसा विचार झाला तसाच मराठवाड्यात मराठा आणि ओबीसी फॅक्टर कसा निकाल लावणार, औरंगाबादमध्ये दोन्ही सेनेची टक्कर होणार की एमआयएम पुन्हा बाजी मारणार, पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्या लोकसभा मतदारसंघात शरद पवारांचा फॅक्टर किती काम करणार आणि अजित पवार थोरल्या पवारांना कुठे कुठे डॅमेज करणार, मुंबई आणि कोकणपट्ट्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे काय होणार आणि ठाण्यात दोन्ही मतदारसंघात एकनाथ शिंदे यांना कितपत यश मिळणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या काळात मिळतीलच. पण तत्पूर्वी शिंदे आणि अजित दादांच्या शिलेदारांची जी चलबिचल सुरू झाली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजलेली आहे. दादांच्याकडे असलेल्या ज्येष्ठांनी थोरल्या पवारांच्या बाजूने बोलणे आश्चर्यकारक आहे. विधिमंडळातील सत्ता संघर्षाच्या काळात अचानक चर्चेत आलेले नरहरी झिरवाळ अजित दादांचा तंबू सोडून पुन्हा पवारांच्या तंबूत येतील अशी चर्चा सुरू झाली आहे तर शरद पवारांच्या पक्षातील युवा ब्रिगेडचे दोन अमराठी चेहरे अचानक राजीनामा देऊन अजित पवारांच्या पक्षात सामील होण्याच्या तयारीत दिसत आहेत. सत्ताधारी भाजपमध्ये अनेक मतदारसंघात कुरबुरी सुरू झालेल्या आहेत. या पाच वर्षात भाजपने अनेकांशी हात मिळवणी केली. परिणामी पूर्वीचे मित्र आताचे शत्रू आणि आताचे मित्र एकमेकांचे शत्रू अशी स्थिती असल्याने मतदार संघात कोणता उमेदवार द्यायचा आणि कोणाला मतदारसंघ सोडायचा यावरून संशयकल्लोळ सुरू झाला आहे. 105 आमदारांच्या भक्कम संख्याबळावर राज्यातील प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपच्या आमदारांची अवस्था पहिल्या अडीच वर्षात विरोधी सत्ता असल्याने अगतिकतेची होती त्या अगतिकतेचे रूपांतर निक्रियतेत होण्याची वेळ आली. प्रत्येक वेळेला मोडते घेण्याचे निवडणुकीत उट्टे काढले गेले. पक्षशिस्त आणि पक्षादेश मानणारे विधानसभेलाही मित्र पक्षांना धोबीपछाड देण्याच्या तयारीत आहेत. बाहेरच्या विरोधकापूर्वी आधी महायुतीतील आपले शत्रू शोधण्याची वेळ भाजप आमदारांवर आलेली आहे. अजित पवार आणि शिंदे सेनाही उट्टे काढण्याची चिन्हे दिसत आहेत.  स्थानिक मुद्दे आणि स्थानिक कुरघोडी लोकसभेलाच दिसून आली. त्याचे परिणाम निकालात दिसतीलच. पण ही आवळ्या भोपळ्याची मोट बांधण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे राज्यातील तीन पक्षांचे नेते आपल्या आमदारांना आणि इतर दोन पक्षातील आमदारकीच्या दावेदारांना कशा पद्धतीने हाताळणार आहेत हा प्रश्नच आहे. दुसऱ्या बाजूला विरोधकांची सुद्धा वरवर दिसणारी एकी कधी बेकीत रूपांतरित होईल याचा नेम नाही. काही ठिकाणी काँग्रेस शिवसेनेचे तर अनेक ठिकाणी शिवसेना काँग्रेसचे उट्टे काढताना दिसली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. नेते वर वर एकीच्या कितीही शपथा घेत असले तरी प्रत्यक्षात काय सुरू आहे याची त्यांनाही चांगलीच कल्पना आहे. कोणत्याही परिस्थितीत आपले लोक दुखवायचे नाहीत अशा भूमिकेला हे पक्ष आलेले असल्याने ऐन वेळेला आपल्या बंडखोरांना अप्रत्यक्ष साथ द्यायला ते मागे पुढे पाहणार नाहीत. सांगलीतील अपक्ष बंडखोरावर कारवाई करण्याचे टाळून काँग्रेसने तो पायंडा पाडलेला आहेच. अशा पार्श्वभूमीवर एकीच्या घोषणा करत नेते पुन्हा जनतेसमोर येण्यासाठी आता वातावरण निर्माण करायला लागले आहेत. महिन्याभरात तसे चित्र दिसू लागेल. लोकसभेला रचलेली व्यूहरचना मोडून आता नवा डाव मांडताना नव्या खोड्या आणि नव्या कुरघोड्या दिसल्या तर तो कालच्या पानावरून पुढे सुरू असलेला अध्याय समजण्यास हरकत नसावी.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.