पर्वरी फ्लायओव्हर समस्यांच्या तक्रारी मांडा आता व्हॉट्सअपवर
पणजी : पर्वरीच्या प्रस्तावित फ्लायओव्हरच्या बांधकामामुळे सामान्य जनतेला वाहतूक कोंडी, धूळ प्रदूषण आणि अन्य समस्यांना सामोरे जावे लागत असून त्या समस्या मांडण्यासाठी खास अधिकाऱ्यांचा गट आणि एक व्हॉट्सअप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. या क्रमांकावर बांधकामाबाबतची कुठलीही तक्रार वा सूचना स्वीकारली जाऊन त्यावर तातडीने उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी उच्च न्यायालयाला दिले आहे.
पर्वरीच्या फ्लायओव्हर बांधण्याच्या कामांमुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषण होत असल्याची जनहित याचिका मोझीस पिंटो यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. मंगळवारी सुनावणीवेळी पिंटो यांनी अनेक समस्यांवर अजूनही कार्यवाही केली जात नसल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याचिकेच्या सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी दिलेल्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता ज्यूड कार्व्हालो हे काल न्यायालयात हजर राहिले. त्यांना न्यायालयाने दिलेल्या सर्व निर्देशांचे कंत्राटदाराकडून पालन होते की नाही याकडे स्वत: लक्ष देण्यास सांगितले आहे. यात पादचारी आणि वाहनचालकांची सुरक्षा व्यवस्था ही कार्यकारी अभियंत्यांची जबाबदारी असेल, असे बजावण्यात आले आहे.
दरम्यान, पर्वरीच्या काही नागरिकांतर्फे युरिको मास्कारेन्हस यांची या आव्हान याचिकेत नव्याने हस्तक्षेप याचिका मंगळवारी दाखल केली आहे. त्यात पावसाळच्या दिवसात रस्त्यावर माती व गाळ साचून चिखल तयार होत असल्याने वाहन चालवताना त्रास होत असतो. तसेच रस्त्याच्या शेजारील खड्ड्यात पाणी साचत असल्याने गतसालच्या पावसाळ्यात अनेक अपघात घडले होते. पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने पुलाच्या बांधकामावरही परिणाम होत असल्याने गटार व्यवस्था सुधारण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
..................बॉक्स.........................
व्हॉट्सअपवर 50 शब्दांत मांडा तक्रारी
अॅडव्होकेट जनरल पांगम यांनी कंत्राटदार, सार्वजनिक बांधकाम खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य आणि वाहतूक पोलिस आदी अधिकाऱ्यांचा एक स्वतंत्र व्हॉट्सअप गट केला जाणार असून त्यात ते एकमेकांशी समन्वय साधणार असल्याचे सांगितले. पर्वरी फ्लायओव्हर व शेजारील भागातील नागरिकांसाठी 8380081177 या व्हॉट्सअप क्रमांकावर आपल्या तक्रारी वा सूचना 50 शब्दांत मांडता येतील. ही तक्रार अधिकाऱ्यांच्या गटाकडे पाठवली जाऊन त्यावर तातडीने कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.