आता मुक्काम पोस्ट मुंबई!
सुपरएटमधील आफ्रिकेच्या एका पराभवानंतर भारतीय संघाच्या डोक्यावर जे मळभ साचलं होतं ते काल-परवा दूर झालं. हुश्श! म्हणत थोड्याफार प्रमाणात सुटकेचा निश्वास सोडला. स्पर्धेदरम्यान स्वत:ला साखळदंडात बांधून घ्यायची सवय आणि त्यानंतर तो साखळदंड सोडवण्यासाठी अपार मेहनत करायची ही भारतीय संघाची जुनी खोड. ती सध्या तरी लगेच सुटेल याची शक्यता कमीच.
असो. काल-परवा संजू सॅमसनने तर कमालच केली. काही दिवसांपूर्वी ‘काफी अकेला हू मै’ असं स्वत:च्या मनाची समजूत काढणारा संजू परवा मात्र तमाम भारतीयांना ‘अकेला ही काफी हू मै’ असं ठणकावून सांगत होता. ज्या वेस्ट इंडीजने 2016 मध्ये चार चेंडूवर चार षटकार खेचत विश्वचषक जिंकला होता त्याच ईडन गार्डन्सवर उपांत्य फेरीचा दरवाजा बंद केला तो अगदी कायमचा. चालू विश्वचषक स्पर्धेत जवळपास अर्ध्या सामन्यात भारतीय संघाला पाणी घेऊन जाणाऱ्या संजू सॅमसनने मात्र यावेळी वेस्ट इंडिजला पाणी पाजलं. संजूबाबाची आठवण आपल्याला झाली ती आफ्रिकेच्या पराभवानंतर. संजूला संघात घ्यायचं तर का घ्यायचं? आणि घ्यायचं तर कुठल्या नंबरवर खेळवायचं, हे विविध प्रश्न भारतीय संघासमोर होते. परंतु परवाच्या या संजू सॅमसनच्या स्पेशल खेळीने सर्व गोष्टींना पूर्णविराम मिळाला. पहिल्या चेंडूपासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत कंट्रोलमध्ये असलेल्या संजू सॅमसननं खऱ्या अर्थाने आठवण करून दिली ती विराट कोहलीची. समोरचे फलंदाज आपली कामगिरी चोख बजावत तंबूत परत असताना हा पठ्ठ्या स्वत: मात्र ना डगमगला ना घाबरला.
क्रिकेट हा खेळ प्रत्येकाला संधी देत असतो. जो यातून तावून सुलाखून निघतो तोच या संधीचा सोनं करू शकतो. अर्थात या संधीचं सोनं संजू सॅमसनने व्यवस्थित केलं. (काही वर्षांपूर्वी मुंबईकर पृथ्वी शॉला ही संधी मिळाली होती. पण तो नको त्या ठिकाणी भरकटला). या पूर्ण स्पर्धेत विंडीज संघ ‘आम्हीच आक्रमकतेचे बाप आहोत’ असे उर बडवून सांगत होता. काल आक्रमण, संयम आणि कलात्मकता हा त्रिवेणी संगम साधत संजू सॅमसननं विंडीज संघाला चोख उत्तर दिले. क्रिकेटमध्ये जबाबदारी म्हणजे काय असतं हे संजूने दाखवून दिलं. नुसती जबाबदारी घेतली नाही तर ती जबाबदारी तडीस लावली. काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर म्हणाले होते की, तुम्हाला टी-20 चा सामना जिंकायचा असेल, आणि विशेषत: 190 ते 200 धावांचा पाठलाग करताना प्रत्येकाने आपला छोटा छोटा हिस्सा संघाला देणं गरजेचं असतं. परवा अगदी तेच घडलं. प्रत्येकाने आपली जबाबदारी अगदी व्यवस्थित वाटून घेतली.
कमीत कमी धोका आणि जास्तीत जास्त धावा हे त्याच्या कालच्या यशाचं गमक होतं. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण ही बाब ऐरणीवर आली आहे. अभिषेकने सोडलेले ते दोन झेल. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर असे झेल ऐन मोक्याच्या क्षणी सोडाल तर काय म्हणावं अशा खेळाडूला? अभिषेक हाताला ग्रीस तर लावत नसावा, अशी शंका मनात निर्माण व्हावी असे त्याने झेल सोडले. दुसऱ्या बाजूने वरुण चक्रवर्ताने एका एन्डवर दोन फलंदाज असताना त्याच एंडवर चेंडू फेकणे आणि तेही तो तीस यार्ड सर्कलच्या आत असताना ही गोष्ट मात्र निश्चितच न पचनी पडलेली. परवाच्या विजयाने मात्र सुपरएटमधील एका पराभवाने जी मरगळ आली होती ती मरगळ मात्र दूर झाली आहे. ज्या ज्या वेळी भारतीय संघ नैराश्येच्या गर्तेत असेल त्यावेळी कालच्या विजयाची पानं उलगडली तरी नैराश्य दूर होईल, एवढी ताकद या विजयात होती. आता आपली फक्त दोन पावलं बाकी आहेत. पहिले पाऊल आहे ते अर्थात मुक्काम पोस्ट मुंबई. समोर उभा ठाकणार आहे तो इंग्लंड. ज्या इंग्लंड संघाने 2022 मध्ये आपल्याला धुतलं होतं, त्याच इंग्लंड संघाला आपण 2024 मध्ये उपांत्य फेरीत सोलून काढलं. परंतु 2026 मध्ये आता त्याच इंग्लंडला मास्टरस्ट्रोक देण्याची आवश्यकता आहे. हा मास्टरस्ट्रोक कोण, कधी, कसा देतोय हे बघणं आता कमालीचं रंजक ठरणार आहे. आणि हाच मास्टरस्ट्रोक जर अभिषेक शर्माकडून बघायला मिळाला तर मात्र त्याने केलेली या विश्वचषक स्पर्धेतील सर्व पापं धुवून निघतील, एवढं मात्र निश्चित!