आता सोनोली होणार तंटामुक्त गाव
गाव पातळीवर भांडण-तंटे मिटविण्यासाठी कमिटीची स्थापना : कार्यालयाचे उद्घाटन
वार्ताहर/किणये
अलीकडे आपापसातील मतभेद वाढत आहेत. त्याचबरोबर विविध कारणांवरून एकमेकांमध्ये भांडण-तंटे होत आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात तंटामुक्त गाव बनविणे ही काळाची गरज बनली आहे. याच धर्तीवर सोनोली गावात ग्रामस्थ, पंच कमिटीची स्थापना गेल्या अनेक वर्षापासून करण्यात आलेली आहे. ही परंपरा गावात अखंडपणे सुरू आहे. मात्र कार्यालय नसल्याने गैरसोय होत होती. पण सध्या ग्रामस्थ, पंच कमिटीसाठी नव्याने कार्यालय देण्यात आले असून, नुकतेच त्याचे उद्घाटन केले आहे. त्यामुळे आता सोनोली गाव तंटामुक्त गाव होणार आहे. परस्परांमधील मतभेद, घरगुती वाद, शेतजमिनी, रस्ते, हद्द, मित्रांमधील चढावोढ आदींमुळे खेडेगावातही भांडण-तंटे अधिक प्रमाणात होऊ लागले आहेत. याचे रुपांतर अनेक वेळा हाणामारीमध्ये होऊन थेट पोलीस स्टेशनमध्ये जावे लागते. यानंतर अनेकांना कोर्टाच्या पायऱ्याही चढाव्या लागतात. पंच कमिटीतर्फे भांडण मिटविण्याचा प्रयत्न यामुळे कित्येकांचे आयुष्य हे देशोधडीला लागते. तसेच पैसाही खर्च होतो. हा सारासार विचार करता भांडण-तट्ट्यांतून कोणालाही काहीच साध्य होत नाही त्यामुळे सामंजस्यपणाने कोणत्याही समस्येवर तोडगा काढणे सोयीस्कर ठरते त्यामुळेच अनेक गावांमध्ये ग्रामस्थ, पंच कमिट्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून गाव पातळीवर भांडण मिटवण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
नागरिकांच्या हितासाठी न्याय देणे गरजेचे
मात्र न्याय देताना बऱ्याच गावांमध्ये काही जण एका बाजूने न्याय देतात. यामुळे अनेकांना सदर ग्रामस्थ कमिटीचा निर्णय मान्य होत नाही. यामुळे ग्रामस्थ, पंच कमिटीने कोणताही मतभेद न दाखवता त्यांच्याकडे जो हुद्दा आहे त्याचा योग्य प्रमाणात वापर करून नागरिकांच्या हितासाठी न्याय देणे गरजेचे आहे.
विठ्ठल-रखुमाई मंदिरात थाटले कार्यालय
सोनालीत गेल्या अनेक वर्षापासून ग्रामस्थ, पंच कमिटीची स्थापना केली आहे. पंच कमिटीमध्ये सदस्यांची पुनर्रचना करण्यात येते. सदर कमिटी गावासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गेल्या काही वर्षापासून मंदिरात व कुठेही मोकळ्या जागेत, ग्रामस्थ, पंचकमिटी बैठका घेऊन नागरिकांना न्याय देण्यासाठी चर्चा करत होते. यांना कायमस्वरूपी बैठका घेण्यासाठी व्यवस्थित जागा नव्हती. सोनोली गावातील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर एक हॉल आहे. त्या ठिकाणी ग्रामस्थ पंच कमिटीने आपल्या कार्यालयाची व्यवस्था करून घेतली आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक शट्टूपा पाटील होते. कार्यालयाचे उद्घाटन दुद्दाप्पा झंगरूचे यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रवळू पाटील, बाळू लोहार, अनिता पाटील व माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील झंगऊचे उपस्थित होते. ग्रामस्थ, पंचकमिटीचे शिवाजी शट्टूपा झंगरूचे, धाकलू कडोलकर, हणमंत पाटील, बाबू पाटील, यल्लाप्पा तुकाराम पाटील, नागोजी झंगरूचे, संदीप पाटील, मल्लाप्पा कनगुटकर, मल्लाप्पा झंगरूचे, मेघराज झंगरूचे आदी यावेळी उपस्थित होते. सोनाली येथे कार्यालय झाल्यामुळे आता ग्रामस्थ, पंचकमिटीला कोणत्याही एखाद्या समस्येबद्दल निवांतपणे सर्वांना चर्चा करण्यात येणार आहे.