आता सतेज पाटील यांनी अपशकुन आणू नये
कोल्हापूर :
संपूर्ण हयातभर कै. पी. एन. पाटील यांनी कोल्हापूर जिह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यासाठी इमाने-इतबारे पक्षाची सेवा केली. आता त्यांची मुले भवितव्याचा विचार करून अन्य पक्षात प्रवेश करत आहेत. त्यांना सहकार्य करता येणार नसेल तर अपशकुन करून अडथळा आणू नयेत. त्यांना आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती वजा बोचरी टीका मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्यावर केली.
मंत्री मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते पुढे म्हणाले, राहुल पाटील व राजेश पाटील या पाटील बंधुंसह आमदार कै. पी. एन. पाटील गटाच्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हत्तीचे बळ मिळणार आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत युतीचा झेंडा फडकविण्यास फार मोठा हातभार लागणार आहे, या पक्षप्रवेशामुळे आमदार सतेज पाटील यांनी इतकेही हाळवे होऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी विरोध कायम राहील या राहुल पाटील यांच्या वक्तव्याबाबत मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणुकीला कोल्हापूर जिह्यामध्ये तीन जागा वाढणार आहेत. कदाचित मतदार संघाची विभागणी झाली तर राहुल पाटील आणि चंद्रदीप नरके हे मित्रही असतील. आपला गट टिकवण्यासाठी सगळ्यांकडूनच अशी वक्तव्ये होत असतात.
मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्कीट बेंचमुळे जिल्हयाचा 20 टक्के जीडीपी वाढणार आहे. त्यामुळे शहराची हद्दवाढ करणे, शेंडा पार्क येथील जागेत इमारत, यासह आयटी पार्क निर्माण करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितपवार यांच्याशी चर्चा करून शहरातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करु. हे काम पावसाळा झाल्यानंतर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु, असे मुश्रीफ म्हणाले.
- शक्तिपीठाच्या भूमिकेवर ठाम
मंत्री मुश्रीफ म्हणाले, शक्तिपीठ बाबतची भूमिका मुख्यमंत्र्यांनी लपवून ठेवलेली नाही. शेतकऱ्यांवर न लादता त्यांना विश्वासात घेऊनच शक्तिपीठ महामार्गची वाटचाल करणार आहोत. या भूमिकेवर आजही ठाम असून 15 आँगस्ट रोजी शेताशिवारात ध्वजारोहण करण्यासाठी आणि खर्डा भाकर खाण्यासाठी सतेज पाटील यांनी नितीन राऊत यांनाही बोलवायला हवे होते, अशीही कोपरखळी मंत्री मुश्रीफ यांनी लगावली.
- गोकुळच्या जाजमचा विषयाला दिली बगल
गोकुळ दूध संघात सध्या साडेतीन कोटी रुपयांच्या जाजम आणि घड्याळ प्रकरण गाजत आहे. निविदा प्रक्रिया न राबवताच ही खरेदी केल्याची तक्रार दुग्ध विभागाकडे केली आहे. या निवीदा प्रक्रियेमुळे संपूर्ण संचालक मंडळावर कारवाईची टांगती तलवार आहे. इतकी मोठी खरेदी विना निवीदा कशी केली? असा प्रश्न दूध उत्पादकांमध्ये आहे. गोकुळ दूध संघाच्या जाजम आणि घड्याळ वाटपाच्या आरोपाबद्दल विचारले असता मुश्रीफ म्हणाले, याबाबत संघाने यापूर्वीच योग्य तो खुलासा केलेला आहे. आम्ही जी- जी आश्वासने दूध उत्पादकांना दिली आहेत, ती पूर्ण केली आहेत. दूध खरेदी दरवाढ दोन रुपये देण्याचे वचन दिले होते. तिथे बारा रुपये दरवाढ दिली. भविष्यात हा दूध संघ फार मोठा होतोय. कृपया, याला कुणी अपशकुन करू नका.