आता विमानाने होणार पोस्टाच्या कुरिअरचा प्रवास
काही तासांमध्ये पार्सल पोहोचणार देशाच्या कानाकोपऱ्यात : बेंगळूर येथील पोस्ट कार्यालयाकडून मंजुरी पत्र
बेळगाव : खासगी कुरिअर कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी पोस्ट विभागाने आणखी एक पाऊल टाकले आहे. आता बेळगावच्या सांबरा विमानतळावरून पत्र, तसेच पार्सलची वाहतूक केली जाणार आहे. यामुळे काही तासांमध्ये देशाच्या विविध भागात पार्सल पोहोचविणे शक्य होणार आहे. बेंगळूर येथील पोस्ट कार्यालयाकडून नुकतेच मंजुरीचे पत्र बेळगाव पोस्ट कार्यालयाला पाठविण्यात आल्याने आता पार्सलचा वेगवान प्रवास होणार आहे.
केवळ पत्रव्यवहारापुरता मर्यादित असलेला पोस्ट विभाग आता अनेक सेवा देत आहे. यातीलच एक प्रमुख सेवा म्हणजे कुरिअर पार्सल आहे. चार वर्षांपूर्वी कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात पार्सल विभाग सुरू करण्यात आला. बेळगाव महानगरपालिका हद्दीमध्ये पार्सलची सुविधा सुरू करण्यात आली. खासगी कुरिअर सेवेपेक्षा पोस्ट विभागावर विश्वासार्हता जास्त असल्याने काही महिन्यांतच उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता ही सेवा विस्तारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महिन्याभरापूर्वी पोस्ट विभागाचे काही अधिकारी व विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठांमध्ये बैठक झाली. इंडिगो एअरलाईन्सच्या सहकार्याने पार्सल सेवा सुरू केली जाणार आहे. यापूर्वी बेळगावहून बेंगळूरला बसने अथवा रेल्वेने पार्सलची वाहतूक होत होती. परंतु यामध्ये काही तासांचा कालावधी जात होता. याची गती वाढविण्यासाठी आता बेळगावहून बेंगळूरला अवघ्या दोन तासांमध्ये पार्सलची वाहतूक केली जाणार आहे. ही सेवा या महिन्यापासून सुरू करण्यात येत असल्याची माहिती पोस्ट विभागाने दिली.
उत्तर भारतात एका दिवसामध्ये पार्सल पोहोचविता येणार
बेळगावमधून उत्तर भारतात कुरिअर पाठविण्यासाठी बराच वेळ लागतो. आता हा वेळ विमानसेवेद्वारे कमी केला जाणार आहे. बेळगावहून बेंगळूरला व तेथून विमानाने उत्तर भारतात अवघ्या एका दिवसामध्ये पार्सल पोहोचविता येणार आहे. यासंदर्भात बेंगळूर येथील कार्यालयाने मंजुरी दिली आहे.
- विजय वडोणी (पोस्ट अधीक्षक)