आता कुंकवावर राजकारण
मोदी सरकारने पाकिस्तानबरोबर झालेल्या लढाईनंतर 35 देशात सात बहुपक्षीय शिष्टमंडळे पाठवून आंतरराष्ट्रीय जगतात प्रचाराचा धुरळा उडवला आणि त्यात काँग्रेसच्या शशी थरूर यांची सर्वात चमकदार कामगिरी झाली हे निर्विवाद. अमेरिका आणि त्याच्या जवळच्या देशांत जाऊन पाकिस्तानच्या दहशतवादाविरुद्ध आवाज उठवण्याचे प्रभावी काम त्यांनी केले. खासदार मंडळींचे शिष्टमंडळ असल्याने ज्या देशांना भेटी दिल्या गेल्या तेथील नेतृत्वाला ते भेटू शकलेले नाहीत हे ओघानेच आले.
पण ते करत असताना थरूर यांनी मोदी आणि त्यांच्या सरकारची जी भलीथोर भलावण केली ती मायदेशी परतल्यावर त्यांच्या अंगलट येणार याची स्पष्ट चिन्हे राजधानीच्या राजकीय वर्तुळात दिसू लागली आहेत. काँग्रेसच्या एका नेत्याने थरूर हे भाजपचे ‘सुपर स्पोक्समन’ (सुपर प्रवत्ते) आहेत असा घरचा आहेर देऊन त्यांच्यापुढे भारतात काय वाढून ठेवलेले आहे ते अगोदरच दाखवले आहे. थरूर यांनी आपल्या बचावासाठी जे काही दावे केलेले आहेत ते श्रेष्ठींच्या पचनी पडलेले दिसत नाहीत.
गमतीची गोष्ट अशी की संधी मिळूनदेखील भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांच्या खासदारांना विदेशात प्रभावीपणे आवाज काढता आला नाही. विरोधी पक्षाच्या थरूर तसेच तृणमूल काँग्रेसच्या अभिषेक बॅनर्जी यांनी फड गाजवला असे चित्र निर्माण झाले आहे. एआयएमआयएमच्या असदुद्दीन ओवैसी यांनी या संधीचा फायदा घेत पाकिस्तानची धुलाई करत आपणही देशभक्तच आहोत असेच जोरदारपणे दाखवण्याचे काम केले. राष्ट्रीय राजकारणात ओवैसी यांचा वापर करत भाजप आपली हिंदुत्वाची मतपेढी घट्ट करते हे आरोप वारंवार होतात. ओवैसी वा त्यांच्या पक्षातील कोणा नेत्याविरुद्ध कधीच तपास यंत्रणांनी धाडी घातलेल्या नाहीत, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. मांजर डोळे मिटून दूध पिते तसाच मामला.
भाजपच्या कृपेनेच या शिष्टमंडळात सामील केले गेलेले जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांना त्यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करायला मिळाले नाही. त्यांच्यापेक्षा फार कनिष्ठ असलेल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळात सामिल होण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. राहुल गांधींवर सडकून टीका करत काँग्रेसबाहेर पडलेले आझादसाहेब हे दिवसेंदिवस राजकीयदृष्ट्या निस्तेज होत चालले आहेत, हे परत एकदा दिसले. या शिष्टमंडळांमध्ये सामील केले गेलेले भाजपचे वादग्रस्त सदस्य निशिकांत दुबे यांनी देशामध्ये एक नवा वाद निर्माण केला. एकीकडे बहुपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून विदेशात ‘आम्ही सारे एक’ असे भासवण्याचा प्रयत्न चालला असताना दुबे यांनी समाज माध्यमांवर काँग्रेसवर टीकेची झोड उठवणे सुरूच ठेवले आणि विरोधकांनी ती संधी हेरली.
पाकिस्तानदेखील केळी खात बसलेला नाही. त्याने पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली खास शिष्टमंडळ आपल्या प्रचारासाठी पाठवले. गमतीची गोष्ट म्हणजे पाकिस्तानातील सत्ता खरोखर ज्यांच्या हातात आहे ते लष्कर प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर हे या गटाचे एक सदस्य होते. तुर्कीयेमध्ये त्याचे जोरदार स्वागत झाले. इराण तसेच आखातातील काही देशांना देखील त्याने भेट दिली. चीनने ज्या प्रकारे पाकिस्तानची भरघोस मदत करून त्याला अत्याधुनिक अस्त्रs तसेच विमाने दिली त्याने जग अवाक झालेले आहे हे देखील नाकारता येत नाही.
गेल्या आठवड्यात पंतप्रधानांनी पश्चिम बंगालचा दौरा करून तेथील मुख्यमंत्री ममताबॅनर्जीवर केलेल्या टीकेने त्या खवळल्या नसत्या तरच नवल होते. एकीकडे बहुपक्षीय शिष्टमंडळे जगात पाकिस्तानच्या विरुद्ध देशाची बाजू मांडत असताना पंतप्रधानांनी राजकारण करणे बरोबर नव्हे. भाजपचे नेते म्हणत आहेत की ऑपरेशन सिंदूर झाले आहे आता ‘ऑपरेशन बंगाल’ करण्याची वेळ आलेली आहे हे फार आक्षेपार्ह आहे. ‘पंतप्रधानांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी उद्या बंगालमध्ये निवडणूका घ्याव्यात’, असे त्यांनी आव्हानच दिले. विरोधी पक्षांनी विशेषत: काँग्रेसने दिवसेंदिवस प्रश्नांची सरबत्ती सुरु करून मोदी सरकारला अस्वस्थ केलेले दिसत आहे. संसदेच्या विशेष सत्राची मागणी विविध विरोधी पक्षांनी केलेली आहे. ती काँग्रेसने तसेच ममताच्या तृणमूल काँग्रेसने आणि लालू यादव यांच्या राजद तसेच डाव्या पक्षांनी देखील केली आहे. परेश रावल आणि प्रेम चोप्रा यांच्याप्रमाणे पंतप्रधान डायलॉगबाजी करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीचा केलेल्या दाव्यांबाबत ते चूप का? असे प्रश्न विरोधक विचारत आहेत.
गुजरातसह विविध राज्यात जाऊन ऑपेरेशन सिंदूर वर स्वत:ची वाहवाही करणारे पंतप्रधान संसदेच्या सत्राच्या मागणीवर गप्प आहेत. या युद्धाबाबत विदेशात भारताचा डंका वाजो अथवा न वाजो, देशात आपलीच पाठ थोपटण्याचा प्रकार मात्र सुरु झाला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या या कारवाईला ऑपेरेशन सिंदूर हे नाव देऊनच मोदी सरकार मोठे राजकारण करत आहे आणि त्याद्वारे विरोधी पक्षांना खच्ची करण्याचा हा डाव आहे, असा आरोप करून ममतादीदींनी लढाईला तोंड फोडलेले आहे. तीन टर्म मुख्यमंत्री राहिलेल्या ममता या सध्या देशातील सर्वात ज्येष्ठ मुख्यमंत्री आहेत. पुढील वर्षी बंगालमध्ये निवडणूका आहेत आणि काहीही करून दीदींना आसमान दाखवायचा चंग भाजपने बांधलेला आहे.
मोदी पंतप्रधान बनून अकरा वर्षे झाली तरी सैन्यदलांना अत्याधुनिक विमाने मिळत नाही आहेत असे एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी अप्रत्यक्षपणे सांगून एकप्रकारे खळबळ माजवली आहे. सिंग यांच्या टीकेचा रोख हा हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ)वर दिसत आहे कारण 48,000 कोटी रुपये देऊनही तेजस हे लढाऊ विमान तयार झालेले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. जर आमच्याकडे विमानेच नसतील तर मग आम्ही लढायचे कसे? अशा प्रकारचा प्रश्न आहे. पण डीआरडीओ हा सरकारचाच उद्योग आहे. पाकिस्तानबरोबरील लढाईत त्याच्याकडे अत्याधुनिक अशी चीनी विमाने असल्याने भारताची कुचंबणा झाली असे जाणकार सांगत असतानाच हवाई दल प्रमुखांनी हे गंभीर विधान केलेले आहे. तेदेखील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत. ऑपरेशन सिंदूरचा राजकीय लाभ उठवण्यासाठी रोड शो सुरु झालेले असताना हवाई दल प्रमुखांनी सरकारचे कान टोचलेले आहेत. जाणकारांच्या मते सध्याच्या परिस्थितीत देशाची हवाई लढाईची क्षमता दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत आहे तर दुसरीकडे शत्रू मजबूत होत चालला आहे.
भावनिक मुद्दा आला की भाजप व मोदींचा हात कोणीच धरू शकत नाही हे मात्र पाकिस्तानबरोबरील लढाईनंतर परत एकदा सिद्ध होत आहे. भाजप घरोघरी जाऊन कुंकू वाटणार असे वृत्त एका प्रमुख हिंदी दैनिकाने दिले होते. ममता बॅनर्जी यांनी या मुद्यावर साक्षात पंतप्रधानांवर हल्लाबोल केला होता आणि विरोधी पक्षांनी रान उठवले होते. आता भाजपने घरोघरी कुंकू वाटायचा त्याचा काही कार्यक्रम नाही असे अधिकृतपणे जाहीर केले आहे. पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात राजकीय आणि परराष्ट्रीय क्षेत्रात झालेल्या भाजपच्या पिछेहाटीला झाकण्यासाठी भाजपने हा कार्यक्रम आखला होता, असा विरोधी पक्षांचा दावा आहे. येत्या महिन्यात ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या प्रसाराकरता बरेच काही कार्यक्रम मात्र आखले गेलेले आहेत. येत्या 9 तारखेला मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचे एक वर्ष पूर्ण होत आहे.
पुलवामा आणि पहलगाममधील घटनांनंतर राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे असा विरोधकांचा होरा आहे. या लढाईत भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर एकाकी पडल्याने मोदींची परराष्ट्रनीतीच उखडली गेलेली आहे आणि भावी काळात त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत, असा त्यांचा दावा आहे. चीन व पाकिस्तान हे शनी-मंगळ केवळ एकत्रच आले नाहीत तर ते भारताला सतावण्याचे उद्योग वाढवणार, अशी भीती जाणकारात वाढत आहे.
अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीत कोणते नरेटिव्ह चालणार ते लवकरच दिसणार आहे. असे सारे राजकारण घडत असताना ट्रम्प यांनी परत एकदा भारत-पाक लढाईत आपणच मध्यस्थी केली होती असे सांगून सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढवलेल्या आहेत.