आता पाकिस्तानचा जुनागढवरही दावा
भारताविरोधात नवी दर्पोक्ती : भारताने बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा आरोप
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
अवैधपणे जम्मू-काश्मीरचा अर्ध्याहून अधिक भाग गिळून बसलेल्या पाकिस्तानने आता गुजरातमधील जुनागढवरही दावा सांगितला आहे. एका बाजूला आर्थिक दिवाळखोरीने हा देश ग्रस्त झालेला असून भारताविरोधातील त्याची खुमखुमी जात नाही, हेच या दाव्यावरुन सिद्ध होत आहे. पाकिस्तानच्या विदेश विभागाच्या प्रवक्त्या मुमताज जहरा बलोच यांनी शुक्रवारी ही दर्पोक्ती केली.
जुनागढ हे गुजरातमधील शहर आहे. 1947 मध्ये भारताची फाळणी होत असताना भारताने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने तेथे कारवाई केली होती आणि ते घेतले होते. जुनागढची प्रजा हिंदू होती तर संस्थानिक मुस्लीम होता. तो पाकिस्तानात पळून गेला होता. तेव्हापासून जुनागढ भारताचा भाग आहे. आता पाकिस्तानने त्यावर दावा सांगून नवी कुरापत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानमध्ये सध्या बलुचिस्तान प्रांतात बंडाळी माजली आहे. या प्रांतातील जनता पाकिस्तानच्या जुलमी राजवटीच्या विरोधात पेटून उठली आहे. त्यामुळे या प्रांतात प्रशासन चालविणे पाकिस्तानला कठीण जात आहे. पाकिस्तानपासून आम्हाला स्वातंत्र्य हवे अशी मागणी बलुचिस्तानमधील जनता करीत आहे. त्यामुळे पाकिस्तानची कोंडी होत आहे. यावरुन आपल्याच जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी पाकिस्तानने जुनागढचा मुद्दा उपस्थित केल्याचे मत व्यक्त होत आहे.
उलटा कांगावा
जम्मू-काश्मीरवरही भारताने अवैध ताबा मिळविला आहे, असा कांगावा पाकिस्तानने पुन्हा केला आहे. जम्मू-काश्मीर आणि जुनागढ हे प्रदेश भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांच्या विरोधात जाऊन ताब्यात घेतले आहेत, असे पाकिस्तानचे नवे म्हणणे आहे. मात्र, पाकिस्ताननेच दहशतवादी आणि आपले सैनिक घुसवून पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट आणि बाल्टीस्तानवर बेकायदेशीररित्या कब्जा केला आहे. पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीरमधून आपले सैन्य काढून घ्यावे, अशी सूचना सुरक्षा परिषदेने 1949 मध्येच केली आहे.