For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता जिभेने चालवा संगणक

06:38 AM Jul 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
आता जिभेने चालवा संगणक
Advertisement

आधुनिक काळात सर्वात जास्त आणि सर्वाधिक वेगाने तंत्रज्ञानविकास संगणक क्षेत्रात झाला आहे. संगणक चालविताना आपल्याला हाताने माऊस फिरवावा लागतो. तथापि, आता संगणक चालविण्यासाठी हाताचा उपयोग करण्याची आवश्यकता राहणार नाही, असे तंत्रज्ञान विकसीत करण्यात आले आहे. आता आपण माऊस चालविण्याचे काम आपल्या जिभेने करु शकणार आहेत. यासाठी एका विख्यात कंपनीने तोंडात बसविल्या जाणाऱ्या माऊसपॅडची निर्मिती केली आहे. याला ‘माऊथपॅड’ असे संबोधण्यात आले आहे. या कंपनीचे नाव ‘ऑगमेंटल’ असे असून ती अमेरिकेतील आहे. हे माऊथपॅड दातांमध्ये फिट केले जाते. या माऊथपॅडवर जीभेचे टोक ठेवून आपण संगणकाच्या हालचाली नियंत्रित करु शकता. हे नियंत्रण दूरसंचालित पद्धतीचे आहे. यासाठी आपल्या मेंदूत कोणतीही ‘चिप’ बसविण्याची आवश्यकता नाही. केवळ जीभेनेच आपल्याला नियंत्रण ठेवता येते. या साधनाची किंमत साधारणत: 1 हजार 500 डॉलर्स आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे. हाताने माऊस फिरविण्यापेक्षा ही पद्धती सोपी असल्याचे दिसून येते.

Advertisement

कंपनीच्या म्हणण्यानुसार 100 हून अधिक लोकांनी या साधनाच्या उपयोगाचा प्रारंभ यापूर्वीच केला असून त्यांचा अनुभव सुखावह आहे. या साधनाच्या माध्यमातून कर्सर हलविणे, स्क्रोल करणे, स्वाईप करणे आणि क्लिक करणे यासारखी कामेही सहजगत्या करता येतात. या साधनाचा उपयोग अधिक योग्य प्रकारे करण्यासाठी एक अॅप देण्यात आले असून या अॅपच्या साहाय्याने नियंत्रणात आपण आपल्या सोयीनुसार परिवर्तन करु शकता. कंपनीच्या म्हणण्यानुसार कर्सर नियंत्रणात हे साधन आपल्याला ‘ब्रेन काँप्युटर इंटरफेस’सारखी सुविधा देऊ शकते. तथापि, ब्रेन काँप्युटर इंटरफेस’ आणि हे तंत्रज्ञान यात एक महत्वाचे अंतर आहे. ‘ब्रेन काँप्युटर इंटरफेस’ प्रमाणे या तंत्रज्ञानात शस्त्रक्रिया करुन आपल्या मेंदूत ‘चिप’ बसवावी लागत नाही. त्यामुळे आपल्याला कोणताही त्रास होत नाही. तसेच सहजपणे आपण आपल्या संगणकाचे नियंत्रण आपल्या तोंडातून करु शकता आणि संगणकाचे काम झाल्यानंतर तोंडातील माऊथपॅड काढून सुरक्षित स्थानी ठेवू शकता. प्रवासातही आपल्याला या साधनाचा उपयोग करता येणे शक्य आहे.

Advertisement
Advertisement

.