For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता पंजाब नव्हे तर ‘उडता महाराष्ट्र?’

11:30 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
आता पंजाब नव्हे तर ‘उडता महाराष्ट्र ’
Advertisement

तब्बल दीड टन गांजा जप्त : आंध्रप्रदेशातून कर्नाटकमार्गे मुंबई-पुण्याला पुरवठा

Advertisement

बिदर : ट्रक कँटरमध्ये चोर कप्पे निर्माण करून गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. आता ट्रकमध्ये चोर कप्पे तयार करून गांजा वाहतूक करणाऱ्या एका टोळीचा बिदर पोलिसांनी छडा लावला असून आंध्रप्रदेश व ओडिशाच्या सीमेवरून थेट मुंबईला गांजा पुरविण्यात येत होता. पोलिसांनी 1 हजार 596 किलो गांजा जप्त केला आहे. बिदर पोलीस व केंद्रीय अमली पदार्थ विरोधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अवराद तालुक्यातील वनमारपळ्ळी तपासनाक्यावर शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलीसप्रमुख चन्नबसवाण्णा एस. एल. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आंध्रप्रदेशहून महाराष्ट्राला गांजा घेऊन जाणारा ट्रक अडवून तपासणी केली असता 1596 किलो गांजा साठा सापडला. त्याची किंमत 15 कोटी 96 लाख रुपये इतकी होते. आंध्रप्रदेश व ओडिशाच्या सीमेवरील जंगलात गांजा पिकवून महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आदी महानगरांना गांजा पुरवठा करणारे हे मोठे रॅकेट असून नक्षल प्रभावित जंगल असल्यामुळे या परिसरात तपासनाक्यांची संख्या कमी आहे. याचाच फायदा घेत हे गुन्हेगार ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गांजा वाहतूक करीत होते.

गांजा वाहतुकीसंबंधी बिदर पोलीस व एनसीबी विभागाला माहिती मिळाली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांनी पाळत ठेवली होती. पोलीस यंत्रणेला चुकविण्यासाठी गुन्हेगारांनी मार्ग बदलला होता. बिदर जिल्ह्यातून ट्रक घातला तर सापडण्याची भीती होती. म्हणून जहिराबाद, नारायणखेड मार्गे चालकाने ट्रक वळविला होता. हा मार्गही धोक्याचा वाटल्याने पुन्हा त्यांनी कर्नाटकात ट्रक वळविला. उपलब्ध माहितीनुसार या ट्रकमध्ये सिमेंटच्या विटा ठेवण्यात आल्या होत्या. या विटांच्यामध्ये गांजा भरलेली गाठोडी ठेवण्यात आली होती. या प्रकरणी भालकी व हुमणाबाद येथील दोघा जणांना अटक करण्यात आली असून ट्रकमालक संगारे•ाrचा राहणारा आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. जानेवारी 2023 मध्ये याच ट्रकमधून 300 किलो गांजा वाहतूक करताना बिदर पोलिसांनी चालकाला अटक केली होती. ट्रकही जप्त करण्यात आला होता. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून 14 फेब्रुवारी 2024 रोजी ट्रक सोडविण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात गांजा वाहतूक करण्यासाठी याच ट्रकचा वापर करण्यात आला आहे.

Advertisement

राज्यातील सर्वात मोठी कारवाई

गोव्याहून वेगवेगळ्या राज्यांना बेकायदा दारू वाहतूक करण्यासाठी ट्रक, टेम्पो, कँटर आदी वाहनांमध्ये चोर कप्पे तयार करून घेतले जातात. बेळगाव येथील अबकारी अधिकाऱ्यांनी अशी अनेक प्रकरणे उघडकीस आणली आहेत. आता पोलीस व अमलीपदार्थ विरोधी पथकाला चकविण्यासाठी सिमेंटच्या विटातून गांजा वाहतूक करण्यासाठी ट्रकमध्ये सिक्रेट चेंबर तयार करून घेतला होता. राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

सतत पाळत ठेवून केली कारवाई

यासंबंधी जिल्हा पोलीसप्रमुख चन्नबसवाण्णा एस. एल. यांच्याशी संपर्क साधला असता शनिवारी रात्री झालेल्या कारवाईची त्यांनी माहिती दिली. गेल्या वर्षभरात बिदर जिल्ह्यात 1500 किलो गांजा जप्त करण्यात आला होता. आता एकाच कारवाईत 1596 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. एक वर्षापूर्वी याच टोळीला अटक झाली होती. आता पुन्हा ही टोळी अमलीपदार्थांच्या व्यवसायात गुंतली आहे. सतत पाळत ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात मुंबईसह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांना गांजा पुरविण्यात येत होता, असे त्यांनी सांगितले.

बिदर जिल्हा पोलीसप्रमुख चन्नबसवाण्णा एस. एल.

Advertisement
Tags :

.