आता नजरा मंत्रीमंडळ फेरबदलाकडे
21 जुलैपासून प्रारंभ होणार आहे. हे अधिवेशन 8 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मात्र विरोधकांसाठी हे दिवस कमीच पडतील, हे नक्की. अधिवेशनापूर्वी आमदार गोविंद गावडेंच्या मंत्रिपदावर कुणाची तरी वर्णी लावण्याची आवश्यकता होती. बहुतेक सभापती रमेश तवडकर यांच्याच गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल. गावडे प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी बरीच सावध भूमिका बजावली. आपल्यावरील कारवाई टाळली जावी, यासाठी गोविंद गावडे यांनी आदिवासी समाजाचे कार्ड पुरेपूर वापरले मात्र भाजप आणि त्यांच्या नेत्यांनी गरम वातावरणात हातोडा हाणण्याचे टाळले.
वातावरण अगदीच शांत होण्याची वाट पाहिली. गावडेंच्या दबावतंत्राला सरकार घाबरल्याचे व गावडेंविरुद्ध कारवाईचे शस्त्र भाजप नेत्यांनी म्यान केल्याचा समज गोव्यात पसरला होता. गावडेंवरील कारवाई टळली, अशी हवा पसरत असतानाच आरोग्यमंत्र्यांनी ‘गोमेकॉ’च्या डॉक्टरला शिस्तीचे डोस पाजले आणि गोव्यात एकच कल्लोळ झाला. कधी नव्हे ते डॉक्टर मंत्र्यांना आव्हान देऊ लागले. हे प्रकरण बरेच तापले. त्यामुळे गावडेंचा गोंधळ लोकही विसरले. याच वातावरणाची संधी घेत मुख्यमंत्र्यांनी गोविंद गावडेंना एकदाचे पायउतार केले. त्यानंतर मात्र गोविंदांकडून किंवा त्यांच्या समर्थकांकडून आकाश-पाताळ एक करण्याचा प्रयत्न झाला नाही. कितीही अपमानीत व्हावे लागले किंवा कितीही नाराजी मनात असली तरी सद्यस्थितीत गावडेंना भाजपसोबतच राहण्यावाचून पर्याय नाही. पुढे काय होईल ते होईल, आता पुरते इथेच राहू, एवढाच त्यांचा शहाणा विचार.
गोविंद गावडेंच्या राजकीय नाट्याच्या पहिल्या अंकाचा पडदा पडला आहे. दुसरा अंक यथावकाश सुरू होईल. त्यासाठी निवडणूकही जवळ यावी लागेल. खरेतर गोविंद गावडे यांना आमदारकी बहाल करण्यात भाजपचाच हात होता. 2017 मध्ये मगो नेते दीपक ढवळीकर यांचा काटा काढण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रियोळमध्ये अपक्ष उमेदवार गोविंद गावडे यांनाच आपला उमेदवार मानले आणि दीपक ढवळीकरांना घरी पाठविण्यात यशस्वीही झाले. तेव्हापासून आतापर्यंत आठ वर्षांहून अधिक काळ गोविंद गावडे यांनी मंत्रिपद भूषविले आणि हळूहळू डोईजड झाले. त्याचा परिणाम हकालपट्टीत झाला.
आता आमदार गोविंद गावडे यांना घरी पाठविण्यासाठी भाजपाला मगो नेते दीपक ढवळीकरांची मदत घ्यावी लागणार आहे. नियतीचा हा उलटा प्रवास आहे. गोविंद गावडे प्रकरणाने अप्रत्यक्षरित्या भविष्यातील मगो-भाजप युतीच्या प्रियोळच्या जागेची अडचण दूर झालेली आहे. आमदार गोविंद गावडे यांना भविष्याचा अंदाज आहेच. भविष्यातील घडामोडींना सामोरे जाण्याचे नियोजन त्यांनीही केलेले असेलच.
गोव्याच्या राजकारणात सध्याचा प्रमुख विषय आहे, मंत्रिमंडळाची फेररचना. मागच्या जवळपास दीड-दोन वर्षांपासून सुप्तावस्थेत असलेला हा विषय गोंविंद गावडे प्रकरणाच्या निमित्ताने उफाळून आलेला आहे. गावडेंमुळे रिक्त झालेल्या मंत्रिपदाकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेतच. त्यात फेररचनेत इतर इच्छुकांनाही संधी मिळणार आहे. कला, क्रीडा, संस्कृती खाते सांभाळण्यासाठी सुसंस्कृत नेताच मिळावा, असे राज्यातील जनतेलाही वाटेल, यात शंका नाही आणि कोणत्याही समाजाची नाराजी ओढवून घेण्याचे प्रयत्न भाजप सरकार करणार नाही, हेही खरे आहे. त्यामुळे या मंत्रिपदासाठी जशास तसे जातीचे गणित जुळविले जाणार आहे. रमेश तवडकर मंत्री बनल्यास गोवा विधानसभेला नवा सभापती लाभेल.
मागच्यावेळी आमदार नीलेश काब्राल यांना मंत्रिपदावर पाणी सोडावे लागले होते. गोविंद गावडेंची तर हकालपट्टीच झाली. अजून काही मंत्र्यांना वगळले जाईल व नव्या आमदारांची मंत्रिपदी नियुक्ती होईल, ही चर्चा आणि प्रयत्न कधी फळास येतात, याची सध्या प्रतीक्षा आहे. काही मंत्र्यांना वगळले जाणार, ही चर्चा तशी वर्ष-दीड वर्षापासूनच आहे मात्र भाजपला योग्य मुहूर्त मिळालेला नव्हता. आता ती वेळ जवळ आल्याचे दिसते. आमदार मायकल लोबो, संकल्प आमोणकर एवढेच नव्हे तर पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले दिगंबर कामतसुद्धा पदोन्नतीसाठी उत्सुक आहेत. दीड वर्षांनंतर येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भाजपचा हा मंत्रीमंडळाला नवे रुप देण्याचा विशेष प्रयत्न आहे परंतु नव्या मंत्र्यांना पुढील दीड वर्षांच्या काळात जेमतेम एक वर्षच आपली कार्यक्षमता दाखविता येईल. नवे मंत्री काय दिवे लावतील, हे पुढील काळच ठरवेल.
येत्या निवडणुकीत मगो-भाजपला एकत्र येण्यावाचून पर्याय राहणार नाही. दुसऱ्या बाजूने काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड तयारीत आहेत. त्यांच्या पंगतीत ‘आप’ सहभागी झाला तर भाजपची चिंता थोडी वाढेल. निवडणुकीला अद्याप दीड वर्ष आहे. काँग्रेस मरगळ झटकत आहे. आमदार विजय सरदेसाई यांनी आपला जनता दरबार पुन्हा सुरू केला आहे. विरोधकांमध्ये आमदार विजय सरदेसाई यांचाच डंका अधिक दिसतो. त्या मानाने काँग्रेसचा आवाज कमी पडतो. विजय सरदेसाई यांच्या दरबारांना प्रतिसाद मिळतो. लोक, संस्था, संघटना त्यांची दरबारात भेट घेतात. आपल्या तक्रारी मांडतात. याचा अर्थ प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्षाने काय तो काढावा. पावसाळी अधिवेशनात आमदार विजय सरदेसाई, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, ‘आप’चे आमदार वेन्झी व्हिएगस आणि ‘आरजी’चे आमदार विरेश बोरकर तुटून पडतीलच आणि विशेष म्हणजे मंत्रिपद गमावलेले आमदार गोविंद गावडे भाजपला घरचा आहेर देण्याचा प्रयत्न वेळोवेळी करतील, अशीही शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांची शक्ती वाढेल. गोविंद गावडे भाजपात राहून विरोधकांजवळ जातील आणि भविष्यात कदाचित काँग्रेससह एखादा विरोधी पक्ष गोविंद गावडे यांना प्रियोळमधून आपली उमेदवारीही देईल. राजकारणात काहीही होऊ शकते, याचा अनुभव गोव्यातील जनतेने वारंवार घेतलाही आहेच.
अनिलकुमार शिंदे