आता अनुभवुया दोन वाघातील लढाई
एक काळ असा होता की विंडीजचा संघ म्हटला की समोरचा संघ थरकाप कापायचा. 1983 च्या वर्ल्ड कप नंतर साधारण 1990 ते 95 पर्यंत विंडीज संघाला उतरती कळा लागली. कित्येक वर्ष तर या देशाने पात्रता फेरी खेळण्याचे संकट ओढून घेतलं. जणू काही क्रिकेटने त्यांच्यावरती बेभरवशाचा शिक्काच मारला होता. परंतु टी-20 च्या सामन्यात विंडीजने टेस्ट क्रिकेट आणि 50 षटकांच्या क्रिकेटला ऑप्शनल टाकत टी-20 क्रिकेट वर भर दिला. आणि बघता बघता एकदा नव्हे दोन वेळा विश्वचषक उंचावला.मागील विश्वचषकाचा कर्णधार होता,डरेन सॅमी आणि तोच आता या संघाचा बाहेरून नेतृत्व करतोय. चालू विश्वचषक स्पर्धेत मागचा सामना सोडला तर त्यांनी एकंदरीत धमाकाच केलाय.( मागचाही काही प्रमाणात शेफर्ड आणि होल्डरचा धमाकाच होता) आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जीवावर समोरच्यांना त्यांनी आतापर्यंत जायबंदी केलेय.
परंतु या धामधुमीत 2016 चा बदला घ्यायची एक नामी संधी भारतीय संघाला चालून आली आहे. मला तो अजूनही उपांत्य फेरीचा सामना आठवतोय. विराट कोहली त्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट होता. त्याच्या 190 च्या स्ट्राईक रेटने 89 धावा. त्याला अतिशय छान साथ दिली होती ती रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने. धाव फलकावर 192 धावा रचल्या गेल्या होत्या. त्यावेळच्या 192 धावा म्हणजे आताच्या अडीचशे धावा होत्या. परंतु चांगले गोलंदाजी करून सुद्धा नशीब आपल्यावर रुसलं होतं. सिमन्सने 51 चेंडूत 82 धावा फटकावल्या खऱ्या परंतु त्याला दोन वेळा नोबॉलची साथ मिळाली. चांगली कामगिरी करून सुद्धा नशिबाची साथ न लाभल्याने भारतीय संघ उपांत्य फेरीतच स्पर्धेबाहेर गेला. आणि त्याच वर्षी वेस्टइंडीज ने विश्वचषकही जिंकला.
आता प्रश्न हा आहे की भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना 200 ते 225 धावा पुरेस होतील का? कारण सात बाद 77 नंतर शेफर्ड आणि होल्डरने अनेक टाईम बॉम्ब फोडले होते. आपले सहा गोलंदाज वरील धावसंख्या रोखून धरेल का? हाही प्रश्न मनात येतो. दुसरीकडे धावांचा पाठलाग करताना जर विंडीजने 200 धावा जमवल्या तर त्याचा पाठलाग करताना मानसिकरित्या संघ खचला जाणार तर नाही ना? अनेक प्रश्न आपल्यासमोर आठवासून उभे आहेत. त्यातच इडन गार्डन्सची सीमा रेषा ही जवळच आहे. त्यामुळे साहजिकच भारताने धावा रोखण्याएवजी झटपट गडी बाद करण्यावर भर दिला पाहिजे. टी-ट्वेंटी क्रिकेट मध्ये कुठल्याही गोलंदाजासाठी झटपट बळी मिळवणे म्हणजे पगार अधिक बोनस अशीच ऑफर असते. दुसरीकडे धावा रोखण्याच्या नादात कधी 200 ते 225 धावा धावफलकवर जमा होतील हे समजणार सुद्धा नाही. या विश्वचषक स्पर्धेतील त्यांचे सर्व सामने अगदी थाटातले होते. चौकार आणि षटकारांचा फेटा बांधून त्यांचे फलंदाज मैदान उतरतात. अशावेळी भारतीय गोलंदाजांचा खरा कस लागणार आहे. त्यातच चायनामन कुलदीप यादवला खेळवायचं की आहे तोच संघ कॅरी ऑन करायचा या द्विधा अवस्थेत भारतीय संघ निश्चित असणार. एकंदरीत दोन वाघातील लढाई आपल्याला बघायला मिळणार आहे. अजून भारतासाठी दिल्ली बहुत दूर है. परंतु हा सामना जिंकत भारतीय संघ दिल्लीच्या मागच्या स्टेशन पर्यंत निश्चित येऊ शकेल एवढं मात्र निश्चित. पहिल्या तीन शून्या नंतर अभिषेक बाजीगर बनू पाहतोय. बुमराह आणी वरूण चक्रवती सारखे ट्रंप कार्ड विंडीजच्या फलंदाजांवरती किती दडपण आणतात हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे. एकंदरीत काय आपण दोन वाघातील लढाई अनुभवणार आहोत. ही लढाई दोन्ही बाजूने आक्रमकच होवो हीच अपेक्षा. परंतु शेवटी आपल्याला 2016 चा बदला हा घ्यावाच लागेल. आणि तो बदला तुम्ही घ्यावाच हिच माफक अपेक्षा.