आता ‘इंडिगो’चा प्रवास होणार स्वस्त
तिकिटांच्या किमती 1000 रुपयांनी कमी होणार : एअरलाईन्सकडून इंधन शुल्क आकारणी बंद
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
बजेट एअरलाइन इंडिगोने आजपासून तिकिटांवर इंधन शुल्क आकारणे बंद केले आहे. एव्हिएशन टर्बाइन फ्यूल (एटीएफ) च्या सतत वाढत असलेल्या किमतींमुळे, इंडिगोने ऑक्टोबर 2023 च्या सुरुवातीला इंधन शुल्क आकारण्यास सुरुवात केली होती. तथापि आता शुल्क आकारणी कंपनीने बंद केली असल्याने आगामी काळात तिकीटाचे दर कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. एटीएफ हा एअरलाइनच्या ऑपरेटिंग खर्चाचा एक मोठा भाग असतो. एटीएफच्या किमती वाढल्याने खर्च वाढतो. इंधन शुल्क हटवल्यानंतर आता विमान तिकीट स्वस्त होणार आहे. आतापर्यंत 300 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंतचे इंधन शुल्क वसूल केले जात होते. इंडिगो दररोज 1900 पेक्षा जास्त उ•ाणे चालवते. इंडिगोकडे 320 हून अधिक विमानांचा ताफा आहे. आपल्या ताफ्यासह, इंडिगो दररोज 1900 पेक्षा जास्त उ•ाणे चालवते. ही एअरलाइन 81 देशांतर्गत आणि 32 आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवा देते. इंडिगोचा भारतात सर्वाधिक विमान सेवा देणारी म्हणून उल्लेख होतो.
189 कोटी नफा
इंडिगोला दुसऱ्या तिमाहीत 188.9 कोटी नफा झाला. कोणत्याही आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत विमान वाहतूक कंपनीने नफा कमावण्याची 5 वर्षांतील ही पहिलीच वेळ होती. साधारणपणे हा तिमाही विमान उद्योगासाठी कमकुवत मागणीचा हंगाम मानला जातो.
समभाग वधारला
इंधन शुल्क लागू केल्यानंतर कंपनीच्या समभागाच्या भावात वाढ झाली. ऑक्टोबरमध्ये इंधन शुल्क लागू होण्यापूर्वी, इंडिगोच्या शेअरची किंमत सुमारे 2400 रुपये होती, जी आता सुमारे 3000 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजे 3 महिन्यांत स्टॉक सुमारे 25 टक्क्यांनी वाढला आहे. शेअर्सच्या वाढीमुळे, 13 डिसेंबर रोजी इंडिगो मार्केट कॅपच्याबाबतीत जगातील 6वी सर्वात मोठी एअरलाइन बनली. इंडिगोने अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सला मागे टाकले होते.