आता भारतीय कंपन्यांमध्ये भारतीय मुख्याधिकारी!
सुमारे 25 वर्षांपर्यंत भारतातील आणि भारतीय कंपन्यांमध्ये कंपनीचे व्यवस्थापन प्रमुख म्हणजेच व्यवस्थापकीय संचालक अथवा मुख्य कार्यपालन अधिकारी पदावर विदेशी व्यक्तीव विषयतज्ञांची नेमणूक करण्यावर सर्वांचा भर असायचा. त्यावेळी भारतातील विदेशी अथवा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या व्यवस्थापन पद्धती व शैलीचा तो अपरिहार्य परिणाम होता. परिणामी कंपनी जरी भारतात असली तरी मुख्याधिकारी मात्र युरोपियन अथवा पाश्चात्य देशातीलच असायचे. या प्रस्थापित व्यवस्थापन पद्धती व परंपरेला छेद देण्याचे काम गेल्या सुमारे 20 वर्षात सुरु झाले. गेल्या दशकात त्याने वेग घेतला व आज भारतातील प्रमुख व मोठ्या कंपन्यांमध्ये जवळ जवळ सर्वच ठिकाणी भारतीय मुख्याधिकारी दिसून येण्याचे सुखद चित्र आकारले गेले आहे.
भारतातील प्रस्थापित व मोठ्या स्वरुपातील उद्योग व्यवसायांची संस्था असणाऱ्या निफ्टीमध्ये समाविष्ट प्रमुख 50 कंपन्यांमध्ये कधी अधिकांश मुख्याधिकारी विदेशी असत. मात्र यासंदर्भात ‘निफ्टी’ द्वाराच प्रकाशित तपशीलानुसार आता थिरी डेलॉपोरेट हे विप्रोच्या मुख्याधिकारीपदावरून मुक्त झाल्यानंतर या श्रेणीतील केवळ निवडक कंपन्यांची व्यवस्थापन सूत्र सांभाळणाऱ्या व्यक्ती विदेशी असणार आहेत.
भारतातील कंपन्यांच्या व्यवस्थापनाच्या सर्वोच्चपदी सध्या कार्यरत असणाऱ्या ‘निफ्टी’शी संबंधित कंपन्यांमध्ये आता मारुती सुझुकी, डॉ. रेड्डी लेबॉरेटरीज व कोटक महिंद्रा बँक या कंपन्यांचाच समावेश आहे. इतर भारतीय कंपन्यांच्या मुख्याधिकारी पदांवर काम करणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत अद्यापही ‘निफ्टी’ अंतर्गत कंपन्यांच्या विदेशी मुख्याधिकाऱ्यांचे प्रमाण तुलनेने अधिक ठरते.
यासंदर्भात अधिक पडताळा घेता. ‘प्राईम डेटाबेस’ च्या तपशिलानुसार 2023-2024 या आर्थिक वर्षाअखेरी भारतातील शेअर बाजारात सार्वजनिक कंपनी म्हणून पंजीकृत अशा एकूण 2521 आजही विदेशी व्यक्ती कार्यरत आहेत. विदेशी व्यक्ती मुख्याधिकारी म्हणून काम करणाऱ्या सार्वजनिक मर्यादित स्वरुपात नोंदणी झालेल्या कंपन्यांची संख्या 2048 असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारतीय कंपन्यांमध्ये विदेशी व्यक्ती मुख्याधिकारीपदी असण्याच्या संदर्भात शेअरबाजारात नोंदीकृत मोठ्या कंपन्यांच्या संदर्भात उपलब्ध माहिती खालीलप्रमाणे आहे.
गेल्या दशकातील वरील तपशील व आकडेवारीवरून स्पष्ट होणारी बाब म्हणजे शेअर बाजारात नोंदणी झालेल्या भारतीय कंपन्यांच्या संख्येत लक्षणीय स्वरुपात वाढ होत असतानाच या कंपन्यांच्या मुख्याधिकारीपदावर नेमणूक होणाऱ्या विदेशी तज्ञ व्यक्तींच्या संख्येत वाढ तर झाली नाहीच, उलट त्यामध्ये काही प्रमाणात घट मात्र निश्चित स्वरुपात झाली आहे.
भारत आणि भारतीय कंपन्या यांच्यासंदर्भात परंपरागतरित्या सांगायचे म्हणजे भारतीय कंपन्या आणि व्यवस्थापनांचा मुख्य भर हा कंपनीच्या सर्वोच्चपदी भारतीय व्यक्ती व्यवस्थापकाची नेमणूक करण्यावरच असतो. यामागे ‘आपला माणूस’ही भावना अप्रत्यक्ष स्वरुपात तर असतेच त्याशिवाय भारतीय भाषा, संस्कृती, कार्यपद्धती, व्यक्तिगत व्यवहार, मनोभावना, नेतृत्वातील लवचिकता इ. बाबी प्रामुख्याने कारणीभूत आहेत.
याच्याच जोडीला मूलत: भारतीय व आता जागतिक स्तरावर उद्योग- व्यवसायाची व्याप्ती वाढविलेल्या प्रमुख व प्रगतीशील कंपन्यांनी प्रसंगी वेगळी वाट चोखाळल्याचे दिसते. यासंदर्भात प्रामुख्याने व उदाहरणादाखल म्हणून प्रसंगी व गरजेनुरुप भारतीय कंपनीत विदेशी व्यक्तीची व्यवस्थापन प्रमुख पदावर नेमणूक करणाऱ्या कंपन्या म्हणून एअर इंडिया, इंडिगो, डीआरआय, बायकॉन ग्रुप, सिंजेन इंटरनॅशनल यासारख्या कंपन्यांचा उल्लेख करता येईल. सनफार्माने इस्त्रायलच्या तेव फार्मा कंपनीच्या मुख्याधिकाऱ्यांना आपले व्यवसाय प्रमुख नेमले होते तर पूर्वकाळात रॅनबॅक्सी फार्मा, जेट एअरवेज व स्पाईसजेट या कंपन्यांनी पण विदेशी तज्ञ व्यक्तींवर कंपनीची धुरा सोपविली होती.
भारतातील आपल्या कंपनीच्या विविध व्यवसायांच्या प्रमुखपदी विदेशी तंत्रज्ञ वा विषय तज्ञांची नेमणूक करण्यामध्ये टाटा उद्योग समूहाने आघाडी घेतलेली दिसते. यासंदर्भात प्रमुख उदाहरणे म्हणून टाटा उद्योगांतर्गत असणाऱ्या एअर इंडिया, टाटा टेक्नॉलॉजीज, आग्रतास यांचा उल्लेख करावा लागेल. याशिवाय टाटा अंतर्गत असणाऱ्या टाटा मोटर्स, विस्तारा, टाटा टेलिसर्व्हिसेस या कंपन्यांना विदेशी व्यवसाय प्रमुख वा मुख्याधिकारी असण्याची पूर्वपरंपरा लाभली आहे.
या उलट प्रस्थापित व परंपरागत स्वरुपात ग्राहकोपयोगी उत्पादन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमधील हिंदुस्थान युनी लिव्हर लि. व
प्रॉक्टर अँड गॅम्बल या सारख्या मोठ्या कंपन्यांच्या भारतातील उत्पादन-विक्री व्यवसाय विभागात भारतीय व्यक्तीची प्रमुखपदी निवड झाल्याचा इतिहास आहे. यामध्ये नेस्ले इंडियाचा मात्र अपवाद म्हणायला हवा. कारण या कंपनीने व्यावसायिक गरजांनुसार विदेशी मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक त्यांच्या भारतातील व्यवसाय वाढीसाठी केलेली आहे.
यासंदर्भात ‘मॅनेजमेंट डिसिजन जर्नल’तर्फे प्रकाशित करण्यात आलेला अहवाल अभ्यासनीय आहे. 2018 मध्ये प्रकाशित या अभ्यासानुसार विकसनशील देशांमधील उद्योग-व्यवसायांच्या प्रमुखपदी संबंधित विकसनशील देशाचे मूळ निवासी असणाऱ्या व सध्या विकसित देशातील उद्योगात जबाबदारीसह काम करणाऱ्या यशस्वी व कर्तबगार व्यवस्थापकांना आवर्जुन स्वदेशी उद्योगात अधिक मोठी व महत्त्वाची जबाबदारी घेण्यासाठी प्राधान्याने बोलावित आहेत. ते विकसनशील देश, त्या कंपन्या व संबंधित उद्योग व्यवसाय या साऱ्यांनाच या यशस्वी प्रयोगाचे मोठे फायदे झाल्याचे त्यावेळच्या त्या अभ्यासाद्वारे स्पष्ट झाले.
या निमित्ताने विदेशी मुख्याधिकाऱ्यांमुळे भारतीय उद्योग व कंपन्या यशस्वी होण्याची कितपत खात्री असते? हा मुद्दा सुद्धा चर्चिल्या गेला. ज्या कारणासाठी विदेशातून व्यवसाय प्रमुख आणले जातात ती उद्दिष्टपूर्ती कितपत होते याचा अभ्यास करणाऱ्या ‘एक्झिक्युटिव्ह अॅक्सेस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक असणारे रोनेश पुरी आपल्या अनुभवातून सांगतात की, भारतीय कंपन्यांमध्ये विदेशातून आणलेल्या मुख्याधिकाऱ्यांपैकी यशस्वी होणाऱ्यांचे प्रमाण सुमारे 10 ते 15 टक्के असते.
परिणामी आज भारतातील व भारतीय कंपन्यांमध्ये भारतीय मुख्याधिकारी व व्यवसाय प्रमुख नेमण्यावर कल वाढत असून तसा भर दिला जात आहे. रोनेश पुरींच्या मते आज जागतिक उद्योग-व्यवसाय वाढ साधण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान व यशस्वी व्यवस्थापन तंत्र सर्वसाधारणपणे पुरेसे ठरणारे असले तरी भारतीय उद्योगाला यशस्वी करण्यासाठी तंत्रज्ञान-व्यवस्थापनाच्या जोडीलाच प्रामाणिक व कृतीशील नेतृत्व आणि व्यवसाय- व्यवहाराला भावनात्मक विचार कृतीची जोड असल्यानेच भारतातील उद्योगांमध्ये भारतीय व्यवसायप्रमुखांचे महत्त्व वाढते राहणार आहे.
- दत्तात्रय आंबुलकर