For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता, भारतावर राज्य आलंय!

06:23 AM Feb 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
आता  भारतावर राज्य आलंय
Advertisement

जगावं कि मरावं हा एकच सवाल’ हे वाक्य मी कुठलं नाटक बघून मी तुम्हाला प्रश्न करत नाहीये. हा प्रश्न पडलाय मला कालचा सामना बघून (कदाचित तो तुम्हालाही पडला असेल). हा सामना संपल्यानंतर काही बोलावं की मूग गिळून गप्प बसावं हाही प्रश्न पडला होता. काही सामनेच असे असतात. कालचा सामना त्यापैकीच एक होता. काय ही शोकांतिका! खरं पाहता तीन बाद वीसवरून डगआउटमधील राखीव खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने खऱ्या अर्थाने शॅम्पेनचं बूच उघडत एका मागोमाग एक पेग रिचवले पाहिजे होते. पण घडलंय, बिघडलंय म्हणत जुन्या काळातील तापावरचे लाल औषध तर पिलं नसेल ना, एवढी हाराकिरी काल बघायला मिळाली. हाच का तो भारतीय संघ जो मागील दोन महिने टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये राज्य करत होता. 15 चेंडूत अर्धशतक, 30 ते 35 चेंडूत शतक असा धावांचा रतीब टाकणारे फलंदाज ‘गेला माधव कुणीकडे’ असं म्हणत गेले कुठे, असे म्हणण्याची पाळी आली. परंतु आता हेच राज्य भारतावर आले की काय, असे म्हणावे लागते. एखादा घरजावई कधीकधी सासरच्या जीवावर 50ज्ञ् अवलंबून असतो, अगदी तसाच भारतीय संघ बुमराहच्या जीवावर अवलंबून आहे की काय, हाही प्रश्न मला आजकाल पडू लागलाय.

Advertisement

अभिषेक शर्मा धावांची ‘बोहनी’ करत नाही म्हणून इशानने स्ट्राइक घेतला. परंतु वाण नाही पण गुण मात्र त्याला लागला. बरं, तुम्हाला माहित आहे की या स्पर्धेत तुमच्यासमोर पहिलं षटक हे ऑफब्रेकने सुरु होणार. मग एवढी घाई का? पुढे जाऊन हा प्रश्न निर्माण होतो की अभिषेक आणि इशानमध्ये फरक तो काय? बरं, मार्करम हा काही क्रिकेटमधील ऑस्करप्राप्त गोलंदाज नव्हता की आल्या आल्या त्याला त्याची बोहनी करून द्यायची.

भारतीय संघ कधीकधी सहज ‘मामा’ बनतो. त्यासाठी भारतीय संघाच्या डोक्यावर टोपी ठेवण्याची आवश्यकता नाही. कालच्या सामन्यातून खऱ्या अर्थाने जबाबदारी आणि कर्तव्य हे दोन्ही पार पाडायचे होते. परंतु या सामन्यातून ना कर्तव्य दिसलं ना जबाबदारी. सगळं कसं अगदी सुशेगात.

Advertisement

ही दोन वाघांतील लढाई आहे, असं आपण मानत होतो. परंतु एकाने हल्ले केले आणि दुसरं गवत खात बसला. कधीकधी यशस्वी गोलंदाजाचा दिवस नसतो. काल वरुण चक्रवर्तीचा नव्हता. पण भारतीय फलंदाज काय? सर्वांनीच माती खावी ‘ये बात कुछ हजम नही हुई’. या पूर्ण स्पर्धेत सुरुवातीचे एक दोन गडी बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्याला आपण चंद्र बनताना बघतोय. स्क्वेअरलेग आणि फाईनलेगच्या डोक्यावरुन ‘ते’ विलोभनीय फटके लोप पावले का? हा प्रश्न आपल्याला राहून राहून पडतोय. मागील दोन-तीन सामन्यात सूर्यकुमार यादव भूलभुलय्यात (चक्रव्यूहात नाही बरं का) अडकल्यासारखा वाटतोय. नेमकं करावं तरी काय, हेच त्याला सूचेनास झालंय. अभिषेकचे पहिले तीन शून्य आणि कालच्या 15 धावा यात काहीच फरक नव्हता. जगातील एक नंबरचा टी-20 खेळाडू काल फलंदाजी करत होता, असं वाटलं नाही. एखादा नवीन खेळाडू नेट प्रॅक्टिसमध्ये आपला आपला पहिला दिवस घालवतो, त्यावेळी जे हावभाव त्याच्या चेहऱ्यावर असतात तेच हावभाव काल अभिषेकच्या चेहऱ्यावर दिसत होते. तिलक वर्माचा आतताईपणा, वॉशिंग्टन सुंदरची चुकलेली जागा, अशा एक ना अनेक चुका  भारतीयांनी केल्या. आपण हरलो त्याचं दु:ख नाही पण ज्या बॅटिंग ट्रॅकवर आपण हरलो ते निश्चितच न पचनी पडणारं. क्रिकेटमध्ये ‘ऑफेन्स इज द बेस्ट डिफेन्स’ असं म्हटलं जातं. परंतु आक्रमण कोणी आणि कधी करायचं या प्रश्नाची उकलच झाली नाही. बरं, आपण सामना हरून आपला रन रेट व्यवस्थित ठेवलं का, तर तेही नाही. वजा 3.8 मध्ये आपण आता पोहोचलो आहोत. (साखळीमधील कुठलाही रन रेट इथे गृहीत धरले जाणार नाहीत).

कालचा योगायोग तर बघा, काल दोन्ही आयोजक देश पहिल्याच सामन्यात पराभूत झाले. मी मागच्या लेखात म्हटलं होतं की सुपरएटमधील सर्व सामने बरोबरीचे आहेत. ना उन्नीस ना बीस.

येणाऱ्या पुढील दोन सामन्यात भारतासाठी ‘करो या मरो’चा प्रश्न आहे. सामने हे जिंकायचे तर आहेतच, पण रनगती सुद्धा उंचावली पाहिजे. आणि काही गोष्टी जर तर वर सोडून द्यावे लागतील येवढं मात्र खरं.!

Advertisement
Tags :

.