For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता रंगत शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीची

06:02 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
आता रंगत शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीची
Advertisement

कोकण आणि मुंबई या पदवीधर तर मुंबई आणि नाशिक विभागातील शिक्षक मतदारसंघातील विधानपरिषद निवडणूक 26 जून रोजी होणार आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये जो उमेदवार अधिक मतदार नोंदणी करतो त्याला निवडणूक अधिक सोपी जाते हे नेहमीच अनुभवास येते. मुंबई पदवीधर या शिवसेना ठाकरे गटाचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघातील लढत भाजपने उमेदवार दिल्याने चुरशीची होण्याची शक्यता आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेले लोकभारतीचे कपिल पाटील यांनी आता लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. लोकभारतीने सुभाष मोरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपने शिवनाथ दराडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीतील सर्वच मित्र पक्षांनी या निवडणुकीत आपले स्वतंत्र उमेदवार जाहीर केल्याने या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना ठाकरे गटाची जागा राखण्यासाठी कसोटी लागली आहे.

Advertisement

लोकसभा निवडणुकीचा निकाल आज लागेल, शिवसेना कोणाची राष्ट्रवादी कोणाची हे जरी आज ठरणार असले, तरी मुंबई, ठाणे आणि कोकणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मुंबई, कोकण पदवीधर तर मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदार संघातील विधानपरिषद निवडणुकीची रंगत लोकसभा निवडणूक निकालानंतर चांगलीच वाढणार आहे. या निवडणुकीत मुंबई आणि कोकण पदवीधरच्या जागा कायम राखण्याचे भाजप आणि ठाकरे गटापुढे मोठे आव्हान असणार आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून भाजपने पत्रकार किरण शेलार यांना तर शिवसेना ठाकरे गटाने माजी मंत्री अॅड. अनिल परब यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर शिवसेना शिंदे गटाकडून माजी आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत हे इच्छुक आहेत.

Advertisement

मुंबई पदवीधर मतदार संघाचा इतिहास बघता 1988 पासून सलग मुंबई पदवीधरच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार निवडून येत आहे. शिवसेना नेते प्रमोद नवलकर यांनी तर 1988, 1992 आणि 1999 अशा सलग तीन वेळा निवडून येताना हॅट्रीक केली, त्यानंतर सलग दोनवेळा माजी आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत, त्यानंतर एक टर्म विलास पोतनीस जे विद्यमान आमदार आहेत. यावेळी मात्र शिवसेनेसमोर भाजपने आपला उमेदवार जाहीर केल्याने या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यातच खरी लढत होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला गेल्या चाळीस वर्षाचा या निवडणुकीचा अनुभव आहे. शिवसेनेच्या शाखा-शाखा मधून केलेली मतदारांची नोंदणी आणि स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून बुध्दीजीवी लोकांचे केलेले संघटन याचा शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत चांगलाच फायदा झाला. 1988 साली झालेल्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत प्रमोद नवलकर यांनी भाजपच्या मधु देवळेकर यांचा पराभव करत शिवसेनेचा पहिला पदवीधर आमदार होण्याचा मान मिळवला. हा सन्मान लोकाधिकार समितीच्या कार्यकर्त्यांचा असल्याचे नवलकर नेहमी म्हणत.

इतकेच नव्हे तर पदवीधर मतदारसंघातील विजयाने मुंबईतील सुशिक्षित-पदवीधर तसेच बुध्दीजीवी मराठी वर्ग हा शिवसेनेच्या मागे आहे हे वेळोवेळी दिसले. यंदा मात्र शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट लढत होत आहे. त्यातच शिवसेना शिंदे गट हा भाजपसोबत असल्याने ही निवडणूक शिवसेना आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. शिवसेनेकडे मतदारांचा असलेला डाटा आणि वेळोवेळी केलेली नव मतदार नोंदणी अभियान यामुळे शिवसेनेची या निवडणुकीत चांगली पकड राहिली आहे, त्या उलट भाजपकडे अशी यंत्रणा नाही. या निवडणुकीत प्रचाराच्या मर्यादा असतात आणि सर्वात मोठे आव्हान असते ते मतदारांपर्यत वेळेत पोहचणे आणि या मतदारांचे मतदान कऊन घेणे, मुंबईत शिवसेनेने उमेदवारी दिलेले अनिल परब हे यापूर्वी मंत्री तसेच विधानपरिषदेवर आमदार राहिले आहेत. त्या तुलनेत भाजपचे उमेदवार किरण शेलार हे नवखे उमेदवार आहेत, मनसेच्यावतीने देखील मुंबईत वेळोवेळी पदवीधर मतदार नोंदणीचा कार्यक्रम घेण्यात येतो. मात्र या निवडणुकीत मनसे भाजपसोबत असणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या विरोधात मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यावेळी मनसे नेत्यांनी आम्ही भाजपला फक्त लोकसभा निवडणुकीपुरता fिबनशर्त पाठिंबा दिला होता, विधानपरिषद निवडणुकीसाठी नाही अशा प्रतिक्रिया दिल्या. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे संजय मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने कोकण पदवीधर मतदार संघात महायुतीतील तीन मित्रपक्षांचे तीन स्वतंत्र उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सोडल्याने काँग्रेसच्या रमेश किर यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

आता युतीत तीन मित्र पक्ष विरोधी आघाडीतील काँग्रेसचा असे चार उमेदवार जरी रिंगणात असले तरी 12 जुनला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कळणार की ही निवडणूक महायुतीतील मित्रपक्ष स्वतंत्र लढणार की महायुती म्हणून लढणार. एक मात्र नक्की की भाजपसमोरही जागा राखण्याचे आव्हान असणार आहे. मुंबई शिक्षक मतदार लोकभारतीचे कपिल पाटील हे यावेळी रिंगणात नाही, लोकभारतीने सुभाष मोरे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने शिवनाथ दराडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिंदे गटाकडून 2018 ला शिवसेनेकडून निवडणूक लढविलेले आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचे खंदे समर्थक शिवाजी शेंडगे हे यावेळी इच्छुक होते, मात्र भाजपने उमेदवार जाहीर केल्याने शेंडगे यांच्या उमेदवारीबाबत सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे. ठाकरे गटाने शिक्षक मतदार संघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी दिल्याने ही लढत भाजप-शिवसेना आणि लोकभारती यांच्यात तिरंगी होण्याची शक्यता आहे.

लोकभारतीचे कपिल पाटील हे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत होते, लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छुकही होते. मात्र आता पाटील हे आगामी विधानसभा निवडणूक गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून लढविण्याची शक्यता आहे. पाटील आणि उध्दव ठाकरे यांचे चांगले सख्य असल्याने ऐनवेळी पडद्यामागे काही शाळा झाल्यास भाजपसाठी ही निवडणूक अडचणीची ठरणार आहे, कारण कपिल पाटील यांनी तीनवेळा मुंबई शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले असून, त्यांच्या पक्षाची स्वत:ची एक व्होट बँक आहे. चांगले संघटन आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही तांबे पित्रा-पुत्र आणि काँग्रेसचा अधिकृत एबी फॉर्ममुळे चांगलीच गाजली होती.

काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागेवर शेवटी शिवसेनेला पुरस्कृत उमेदवार द्यावा लागला होता, आता नाशिक शिक्षक मतदार संघातील निवडणूक ही चांगलीच रंगतदार होणार असून ठाकरे गटाचे नाशिक शिक्षक आमदार किशोर दराडे हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत ते महायुतीचा पाठिंबा आणि उमेदवारीही मिळविण्याची शक्यता असून काँग्रेस नेते संदीप गुळवे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने या निवडणुकीची रंगत वाढली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही शिवसेना विरूध्द शिवसेना अशीच होणार असल्याचे आज तरी चित्र दिसत असले तरी आज लागणाऱ्या निकालात मतदार कोणाची शिवसेना खरी याचा कौल देणार असल्याने या निकालाचे परिणाम हे आगामी विधानपरिषद निवडणुकीवर नक्कीच होण्याची शक्यता आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.