आता पोटनिवडणुकांचेही राजकारण
राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूक होणार असून, या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. मात्र गेल्या काही वर्षात राज्यातील राजकारणाची बदललेली स्थिती, आघाडी आणि युतीतील मित्रपक्षांमधील कुरघोडीचे राजकारण पाहता, आता पोटनिवडणुकांकडे देखील राजकीय वर्चस्वाची लढाई म्हणून पाहण्यात येऊ लागले आहे. काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिल्याने बिनविरोध निवडणूक होण्याचे दिवस आता राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्याच्या राजकारणातील बदललेली राजकीय समीकरणे, पक्षांर्तगत संघर्ष आणि नेतृत्वाची स्पर्धा या सगळ्या गोष्टींचा परिणाम राज्याच्या सर्वव्यापी राजकारणावर जसा झाला, तसा तो गेल्या काही वर्षात झालेल्या पोटनिवडणुकीवर देखील झाल्याचे दिसते. विद्यमान आमदार किंवा खासदाराचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीकडे सहानुभुती म्हणून बघितले जात होते, मात्र गेल्या काही वर्षात अशा निवडणुकांकडे देखील राजकीय पक्ष आणि नेते संधी म्हणून बघू लागल्याने आता पोटनिवडणुकीचा आखाडादेखील गाजू लागला आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले निधन आणि राहुरी विधानसभा मतदार संघातील भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आकस्मिक निधनामुळे या दोन विधानसभांच्या रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. अजित पवार यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे, पवार घराण्यातील उमेदवार असल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने या जागेवर उमेदवार न देता सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणूकीत शरद पवार यांच्या पक्षाचे युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्या विरोधात येथून उमेदवार होते, मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा तसेच रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या घातपाताबद्दल उपस्थित केलेले सवाल बघता, शरद पवार यांच्या पक्षाला विरोधी भूमिका घेणे हे परवडणारे नव्हते. काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी आपला उमेदवार जाहीर केला, त्यामुळे महाआघाडीतील दुसरा घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना उध्दव ठाकरेंचा पक्ष कोणाला पाठिंबा देणार महायुतीच्या सुनेत्रा पवारांना की आघाडीच्या काँग्रेस उमेदवाराला हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या काही वर्षातील पोटनिवडणुकांचा इतिहास बघता पोटनिवडणुकीकडे सहानुभुती म्हणून न बघता एक संधी म्हणून बघण्यात येऊ लागले आहे. त्यामुळे पोटनिवडणूक ही देखील राजकीय वर्चस्वाची होऊ लागली. 2014 ला सिंधुदुर्गातील कुडाळ विधानसभा मतदार संघातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पराभव झाला, त्यानंतर काही दिवसातच मुंबईतील वांद्रे (पूर्व) विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे आमदार प्रकाश (बाळा) सावंत यांचे निधन झाले. सावंत यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नारायण राणे यांनी थेट मातोश्रीच्या अंगणात येऊन ही निवडणूक लढवली. मात्र बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा पराभव केला. 2014 विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभेत काँग्रेसकडे आक्रमक नेता नव्हता, त्यात शिवसेना भाजपचे सरकार राज्यात आले होते. त्यामुळे राणे यांना विधानसभेत जाऊन काँग्रेस विधीमंडळ पक्षाचा नेता व्हायचे होते, मात्र त्यांना त्यात यश आले नाही. पुण्यातील अशाच दोन पोटनिवडणूका गाजल्या होत्या. मनसेचे नेते आमदार गोल्डमॅन रमेश वांजळे यांच्या निधनामुळे झालेल्या खडकवासला विधानसभा पोटनिवडणूकीत मनसेने वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांना उमेदवारी देऊ केली, पण हर्षदा वांजळे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीत पक्षांतर केले. हर्षदा वांजळेंनी केलेले पक्षांतर आवडले नाही. त्यात मनसेने येथे उमेदवार न देता अप्रत्यक्ष भाजपला मदत केली आणि भाजपचे भिमराव तापकीर यांना लॉटरी लागली. राज्यात दुसरी गाजलेली कसबा विधानसभा पोटनिवडणूक भाजपचा वारू देशात आणि राज्याचा चौखुर उधळत असताना कसबा पेठेतील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर भाजपने टिळकांच्या कुटुंबाऐवजी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. टिळकांच्या कुटुंबातील उमेदवार न दिल्याने तसेच काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा या मतदार संघातील प्रभाव पाहता, भाजपसाठी ही निवडणूक मोठी डोकेदुखीची ठरली. देशातील नेते कसबा पेठेत येऊन गेले, मात्र रासने यांच्या पराभवाने भाजपच्या वारूला लगाम बसला. पोट निवडणुकांमध्ये शक्यतो ज्या पक्षाचा उमेदवार असतो, त्या पक्षाचा विजयी होतो. मात्र पुण्यातील या दोन्ही पोटनिवडणुकांमध्ये विरोधीपक्षाचे आमदार निवडून आले, हा अपवाद म्हणावा लागेल. शिवसेनेत फुट पडल्यानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदार संघातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांचे परदेशात अकाली निधन झाले, या मतदार संघातील रिक्त झालेल्या जागेवर शिवसेनेने लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली होती. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला मशाल चिन्ह या निवडणुकीच्या निमित्ताने देण्यात आले, भाजपने या जागेवर उमेदवार जरी दिला नसला तरी मुरजी पटेल जे सध्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यांनी त्यावेळी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत केलेली बंडखोरी आणि लटके यांच्या विरोधात नोटा या मतांचा पर्याय कसा वाढेल याचा भाजपने केलेला प्रचार बघता, ही निवडणूक चांगलीच गाजली. या निवडणुकीत अखेर ऋतुजा लटके या विजयी झाल्या, विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाने किंवा भाजपने कोणीच येथे उमेदवार दिला नव्हता. मशाल चिन्हावर विजयी झालेल्या ठाकरे गटाच्या त्या पहिल्या आमदार ठरल्या. गेल्या काही वर्षातील पोटनिवडणुकांचा हा राजकीय आखाडा बघता राजकीय नेता एका संधीच्या शोधात आहे, हेच भासते.
प्रवीण काळे