आता ग्रामीण प्रवासही महागला...
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, 3 रूपये जादा तिकीट
बेळगाव : शहरासह ग्रामीण भागातील बसचा प्रवास महागला आहे. विविध मार्गांवर धावणाऱ्या बसमध्ये आता प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. वाढत्या तिकीट दराचा सर्वसामान्य प्रवाशांना चटका बसला आहे. परिवहनने इंधन आणि शक्ती योजनेचे कारण पुढे करून तिकीट दरात वाढ केली आहे. शिवाय ही 15 टक्के दरवाढ लागू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे. शहरासह ग्रामीण भागातील सांबरा, उचगाव, काकती, होनगा, वडगाव, पंतबाळेकुंद्री, हलगा, कडोली, हंदीगनूर, किणये यासह इतर सर्वच मार्गावर तिकीट दरवाढ झाली आहे. 2022 मध्ये परिवहनने 12 टक्के तिकीट दर वाढविला होता. त्यानंतर आता पुन्हा 15 टक्के तिकीट दर वाढविला आहे. त्यामुळे प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहे. आधीच वाढत्या जीवनावश्यक वस्तुंनी सर्वसामान्य हैराण झाले आहेत. त्यातच आता तिकीट दराचा अतिरिक्त भार सोसावा लागणार आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या नोकरदार, कामगार, भाजीविक्रेते आणि इतर प्रवाशांना तिकीट दराचा फटका बसला आहे. महिलांसाठी शक्तीयोजनेतंर्गत मोफत प्रवास सुरू असला तरी पुरूषांना मात्र या जादा तिकीट दराचा फटका सहन करावा लागणार आहे.