आता गर्लफ्रेंडही ‘एआय’निर्मित
सध्या ‘कृत्रिम बुद्धीमत्ता’ किंवा एआय संबंधी बरेच बोलले जात आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग किती आणि त्यापासून धोका किती, याचे हिशेब घालण्यात भले भले विद्वान आपल्या नैसर्गिक बुद्धीमत्तेचा व्यय करीत आहेत. पण कोणी निंदा, किंवा कोणी वंदा, कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाची प्रगती मात्र धडाक्यात होत आहे. अक्षरश: प्रतिदिन या क्षेत्रात नवी नवी निर्मिती होत असून आगामी दशक हे ‘कृत्रिम बुद्धीमत्ते’चे असणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. भारतातही अनेक कंपन्या या क्षेत्रात संशोधन करण्यात गुंतल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीपासून या क्षेत्रात एक नवी सनसनाटी निर्माण झाल्याचे दिसून येते. ‘आरिया’ नामक एका गर्लफ्रेंडची निर्मिती रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांच्या संयोगाने करण्यात आली असून प्रथमदर्शनी ही यांत्रिक मैत्रिण अगदी मानवी गर्लफ्रेंडसारखीच वाटते. त्यामुळे अनेकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे. ही गर्लफ्रेंड आपल्या भावनाही जाणू शकते, असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेतली एक कंपनी ‘रियलबॉटिक्स’ने तिची निर्मिती केली असून तिचे प्रदर्शन एका इलेक्ट्रॉनिक शोमध्ये करण्यात आले आहे. तिची मानवसमानता पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. अर्थातच हे केवळ आभासी सत्य आहे. या गर्लप्रेंडची किंमत आहे, तब्बल दीड कोटी रुपये ! आता ही सत्याभासी गर्लप्रेंड नैसर्गिक मानवी गर्लफ्रेंडपेक्षा महाग पडणार की स्वस्त, हा ज्याचा त्याचा प्रश्न.