आता युरोप आसामचा चहा घेईल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आसाममध्ये प्रचार सभेत प्रतिपादन, भारत-ईयू कराराचा उल्लेख
► वृत्तसंस्था / दिब्रूगढ
आसाममधली विधानसभा निवडणूक आता जवळ येत आहे. येत्या एप्रिल-मेमध्ये चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक होत आहे. या चार राज्यांमध्ये आसामचाही समावेश आहे. सध्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी या राज्यात सत्तेवर आहे. या आघाडीने यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अनौपचारिक शुभारंभ केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिब्रूगढ येथील जाहीर सभेने हा शुभारंभ करण्यात आला आहे. शाह यांनी या सभेत भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यातील व्यापार कराराचा उल्लेख केला. आता आसामचा चहा सारा युरोप पिणार आहे, असे प्रतिपादन करत त्यांनी या कराराचे महत्व विशद केले आहे.
या करारामुळे आसामच्या जगप्रसिद्ध चहाला संपूर्ण युरोपची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. याचा लाभ आसाममधील चहा उत्पादकांपासून चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत सर्वांना होणार आहे. यामुळे आसाममधून होणाऱ्या निर्यातीत वाढ होणार असून या राज्याच्या संपत्तीत भर पडणार आहे, अशी मांडणी त्यांनी दिब्रूगढ येथील खानीकार परेड मैदानातील जाहीर सभेत शुक्रवारी केली.
पंतप्रधान मोदी यांचा पुढाकार
भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यात 27 जानेवारीला व्यापारविषयक महाकरार करण्यात आला आहे. या महासंघात युरोपातील 27 देशांचा समावेश आहे. हा महासंघ ही एक आर्थिक महाशक्ती असून आता ही बाजारपेठ भारताच्या वस्तू आणि सेवांसाठी मोकळी झाली आहे. या कराराचे कार्यान्वयन येत्या काही महिन्यांनंतर होण्यास प्रारंभ होईल. भारताने कोणत्याही देशाशी आतापर्यंत केलेल्या करारांमध्ये हा सर्वात मोठा करार आहे, ही वस्तुस्थिती आहे.
उत्तर आसाम रालोआसाठी महत्वाचा
आसामच्या उत्तर भागावर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांचा भर आहे. येथे भारतीय जनता पक्षाला नेहमी मोठ्या संख्येने जागा मिळतात. याच भागात जगप्रसिद्ध आसाम चहाचे मळे मोठ्या प्रमाणात आहेत. या मळ्यांमध्ये आसामसह बिहारमधून स्थलांतरित झालेले कामगारही मोठ्या प्रमाणात काम करतात. हा कामगारवर्ग भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ मानला जातो. त्यामुळे हा भाग राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. याच भागात दिब्रूगढ हे शहर आहे. हे शहर आसाम राज्याची द्वितीय राजधानी म्हणून ओळखले जाते. आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा यांच्या प्रभावक्षेत्रात हा भाग येतो.
करार हा भाजपसाठी निवडणूक मुद्दा
उत्तर आसाम आणि तेथील चहाचे उत्पादन हे आसाम राज्याच्या अर्थकारणासाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने युरोपियन महासंघाशी झालेला करार हा या विधानसभा निवडणुकीत निवडणूक प्रचाराचा मुद्दा म्हणून उपयोगात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे प्रत्यंतर अमित शाह यांनी प्रचारसभेत केलेल्या भाषणावरुन येत आहे. युरोपात भारतातील चहा लोकप्रिय असून आसामी चहा अत्यंत आवडीने प्यायला जातो, असे म्हटले जाते.
अहोम समुदायाचा पाठिंबा महत्वाचा
उत्तर आसाममध्ये मोठ्या संख्येने असणारा अहोम समाज हा पूर्वी काँग्रेसचा मतदार होता. तथापि, गेल्या 10 वर्षांमध्ये तो भारतीय जनता पक्षाकडे मोठ्या प्रमाणात झुकला आहे. शिवसागर, चराईदेव, जोरहाट, गोलाघाट, दिब्रूगढ, तिनसुखिया, लखीमपूर, देमाजी, सोनितपूर, बिस्वनाथ आणि नौगाव या जिल्ह्यांमध्ये या समाजाचे प्राबल्य आहे. हा संपूर्ण भाग गेल्या दहा वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला बनला आहे. त्यामुळे या पक्षासाठी हा भाग महत्वपूर्ण आहे.
भाजपच्या प्रचाराला अनधिकृत प्रारंभ
ड दिब्रूगढ येथील जाहीर सभेने भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभ
ड युरोपियन महासंघाशी झालेला करार हा पक्षासाठी निवडणूक प्रचार मुद्दा
ड भारतीय जनता पक्षासाठी ‘अहोम’ समाज अत्यंत महत्वाचा मतदारसंघ
ड आसाममध्ये येत्या एप्रिल-मेमध्ये अन्य राज्यांसह विधानसभा निवडणूक