For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता उत्सुकता निवडणूक निकालाची

11:05 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
आता उत्सुकता निवडणूक निकालाची
Advertisement

मतदानाचा टक्का वाढल्याने समाधान : मतदारांमध्ये जनजागृतीचा परिणाम

Advertisement

बेळगाव : लोकसभेची निवडणूक मंगळवार दि. 7 रोजी पार पडली. यंदा मतदानाचा टक्का वाढला, ही समाधानाची बाब आहे. उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद झाले आहे. आता सर्वांना उत्सुकता आहे ती निवडणुकीच्या निकालाची. लोकसभा निवडणुकीचे बिगुल 19 एप्रिल 2024 रोजी वाजले आणि निवडणुकीचे पडघम सुरू झाले. त्या दिवसापासूनच उमेदवारी कोणाला मिळणार? याच्या चर्चा रंगू लागल्या. वास्तविक लोकसभेचे तिकीट मिळावे यासाठी अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली होती. विविध उपक्रम राबवून मतदारांच्या मनामध्ये स्थान मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात अनेकांची उपस्थिती दिसू लागली. कार्यकर्त्यांमध्ये उठबस वाढू लागली. इच्छुकांनी नवस, गाऱ्हाणे असे प्रकारही केले. परंतु शेवटी पक्षश्रेष्ठींनी जे नाव ठरविले, त्या नावाला मान्यता देणे अपरिहार्य ठरले. बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे जगदीश शेट्टर, काँग्रेसतर्फे मृणाल हेब्बाळकर, म. ए. समितीतर्फे महादेव पाटील यांची नावे निश्चित झाली. नावे जाहीर होताच उमेदवार खऱ्या अर्थाने प्रचारासाठी रिंगणात उतरले. अर्जभरणा करताना प्रत्येकांनीच शक्तिप्रदर्शन केले. भाजप उमेदवार जगदीश शेट्टर हे बेळगावचे स्थानिक रहिवासी नाहीत, असा सूर उमटू लागला. तर मृणाल हेब्बाळकर अनुनभवी आहेत, असाही सूर उमटला. मात्र त्याला दोघांनीही प्रत्युत्तर दिले. मृणाल हेब्बाळकर यांच्या पाठीशी मंत्री असलेल्या त्यांच्या आई लक्ष्मी हेब्बाळकर खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला.

जगदीश शेट्टर यांच्या पाठीशी भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांचे बळ उभे राहिले. दस्तुरखुद्द पंतप्रधान भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी बेळगावला आले आणि त्यांनी जाहीरसभा घेतली. भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. दरम्यान महादेव पाटील यांच्या पाठीशी समितीनिष्ठ मराठी कार्यकर्ते आणि भाषिक उभे राहिले. त्यांनीही प्रचारात कसर ठेवली नाही. निवडणूक जवळ येवू लागली तसतशी प्रचाराला गती आली. दरम्यानच्या काळात नेहा हिरेमठ या विद्यार्थिनीच्या हत्येचा मुद्दा भाजपने प्रचारात उठवून संधी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी त्वरित नेहाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. पंतप्रधानांनी आपल्या भाषणामध्ये तालुक्यातील एका गावात घडलेल्या महिलेवरील अत्याचाराचा मुद्दा, तसेच नेहाच्या हत्येचा मुद्दा आपल्या भाषणात उठविला. एकूणच गेले महिनाभर प्रचाराची रणधुमाळी सुरू राहिली. या दरम्यान जिल्हा प्रशासनानेही मतदान जागृतीबाबत सातत्याने काम केले. विविध संघ-संस्थांनीही मतदान जागृतीसाठी रॅली काढल्या. लोकसभा निवडणुकीचे कामकाज कसे चालते हे पाहण्यासाठी परदेशातील प्रतिनिधी बेळगावमध्ये दाखल झाले, हे यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्या होय. प्रशासनाने निवडणुकीचे गांभीर्य लक्षात घेऊन ठिकठिकाणी तपासनाके उभारून अवैध रक्कम व बेकायदेशीर दारूसाठा मोठ्या प्रमाणात जप्त केला.

Advertisement

कार्यकर्त्यांना निवडणूक झाल्याने दिलासा

मंगळवार दि. 7 मे रोजी निवडणूक पार पडली. गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाचे प्रमाण वाढले. मतदारांमध्ये राष्ट्रीय कर्तव्याबाबत निर्माण झालेली जागृती हे याचे फलित म्हणावे लागेल. सर्व उमेदवारांचे भवितव्य मशीन बंद झाले. आता 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. तोपर्यंत उमेदवारांसह कार्यकर्ते आणि मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे. शेवटी मतदारराजाने कोणाला कौल दिला, हे या दिवशी समजणार आहे. निवडणुकीमध्ये आपल्या नेत्यांच्या समर्थनार्थ प्रचारासाठी फिरलेल्या कार्यकर्त्यांना निवडणूक झाल्याने दिलासा मिळाला. तरी आता शिवजयंती मिरवणुकीसाठी पुन्हा ते गुंतून राहणार आहेत.

Advertisement
Tags :

.