आता नशेबाजांच्या साथीने विक्रेत्यांवर कारवाई
खरेदी करणाऱ्यांकडूनच विकणाऱ्यांचाही लावणार शोध
बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात गांजाची विक्री व सेवन वाढले आहे. यावर आळा घालण्यासाठी बेळगाव पोलिसांनी आता गांजा सेवन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. गेल्या आठवडाभरात पंधरा जणांवर कारवाई केली असून सेवन करणाऱ्यांच्या माध्यमातून विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यापूर्वी केवळ गांजा, पन्नी आदी अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवरच कारवाई केली जायची. सेवन करणाऱ्यांना समज देऊन सोडण्यात येत होते. आता अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा 27बी नुसार सेवन करणाऱ्यांविरुद्धही कारवाई करण्यात येत आहे. यासाठी एक हजारहून अधिक तपासणीचे किट मागविण्यात आले आहेत.
गस्त घालताना जर गांजा सेवन करणारे पोलिसांना आढळले तर थेट त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलला नेले जाते. पोलीस दलानेच सिव्हिल हॉस्पिटलला एक हजार किट पुरवले आहेत. त्या किटचा वापर करून तपासणी केली जाते. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला की त्या अहवालावरून संबंधितांवर एफआयआर दाखल केला जातो. नंतर नोटीस देऊन त्यांची सुटका केली जाते. त्याला 5 ते 6 हजार रुपये दंडही होतो. जर दंड भरला नाही तर अशा नशेबाजांना कारागृहात धाडण्याची तरतूद आहे. कायद्यातील या तरतुदीचा वापर करीत पोलीस दलाने गांजासह अमलीपदार्थ सेवन करणाऱ्यांविरुद्ध गेल्या आठवड्याभरापासून मोहीम सुरू केली आहे.
एपीएमसी, माळमारुती, खडेबाजार, टिळकवाडीसह शहरातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात आठवडाभरात पंधरा जणांवर कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी माळमारुती पोलिसांनी कनकदास सर्कलजवळ इब्राहिम सय्यद (वय 29) रा. उज्ज्वलनगर, अभिषेक बडीगेर (वय 20) रा. मारुतीनगर या दोघा जणांवर कारवाई केली होती.
गांजासह अमलीपदार्थांचे सेवन करणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नव्या किटमुळे अधिक सुलभ झाली आहे. केवळ मूत्र तपासणीतून त्याने अमलीपदार्थांचे सेवन केले आहे की नाही याचा उलगडा होतो. तपासणी किट पोलीस दलाने पुरवले असले तरी तपासणी मात्र सिव्हिल हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केली जाते. या मोहिमेमुळे नशेबाजांबरोबरच अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यासंबंधी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्याशी संपर्क साधला असता गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण शहरात अमलीपदार्थांचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुरू करण्यात आली आहे. नशेबाजांची तपासणी करून त्यांच्या माध्यमातून विक्री करणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.