For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रिटनमध्येही आता ‘स्मोक फ्री जनरेशन’

06:58 AM Apr 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
ब्रिटनमध्येही आता ‘स्मोक फ्री जनरेशन’
Advertisement

2008 नंतर जन्म झाला असल्यास करता येणार तंबाखू खरेदी : संसदेत जनरेशन बॅन कायदा संमत : 1 जानेवारीपासून होणार लागू

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

ब्रिटनने धूम्रपान रोखण्यासाठी अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. आता तेथील नव्या पिढीच्या लोकांसाठी सिगारेट खरेदी करणे कायमस्वरुपी बंद करण्याची तयारी झाली आहे. सरकारने टोबॅको अँड वेप्स विधेयक संमत करविले असून याच्या अंतर्गत 2008 नंतर जन्मलेले लोक हयातभर तंबाखूशी निगडित गोष्टी खरेदी करू शकणार नाहीत. हे विधेयक संसदेची दोन्ही सभागृहं हाउस ऑफ  कॉमन्स आणि हाउस ऑफ लॉर्ड्समध्ये संमत झाले आहे. आता केवळ  राजे चार्ल्स तृतीय यांची औपचारिक मंजुरी शिल्लक असून ती सर्वसाधारणपणे केवळ एक प्रक्रिया असते.

Advertisement

ब्रिटन सरकारने हे विधेयक 2024 मध्ये मांडत याला स्वत:च्या मोठ्या प्राथमिकतांमध्ये सामील केले होते. नव्या नियमानुसार 1 जानेवारी 2027 पासून तंबाखू खरेदीचे किमान वय दरवर्षी एक वर्षाने वाढत जाणार आहे. म्हणजेच जे लोक 2009 किंवा त्यानंतर जन्मले आहेत, ते कधीच सिगारेट खरेदी करू शकणार नाहीत.

ई&-सिगारेटबद्दल कठोर

-वेपिंग (ई-सिगारेट)वरही कठोर भूमिका घेण्यात आली आहे. शाळा, रुग्णालये आणि मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणांवर धूम्रपान पूर्णपणे बंद असेल. अनेक इनडोअर ठिकाणांवरही वेपिंग करता येणार नाही. -जर कुणी 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासोबत कारमध्ये वेपिंग करत असेल तर तो गुन्हा मानण्यात येणार आहे. दुकानदाराने नियम मोडल्यास त्याच्यावर दंड ठोठावण्यात येणार आहे.

-वेपिंगशी निगडित सामग्रीची विक्री आणि आयातीवर नजर ठेवण्यासाठी ब्रिटनचे सरकार नवी नोंदणी पद्धत आणणार आहे. याच्या माध्यमातून संबंधित सामग्रीच्या विक्री तसेच वापरावर नजर ठेवली जाणार आहे.

-आगामी काळात स्मोक-फ्री जनरेशन या कायद्याच्या माध्यमातून  तयार होणार आहे आणि धूम्रपानामुळे होणारे आजार तसेच मृत्यू कमी होतील असा दावा ब्रिटनच्या सरकारने केला आहे. -संबंधित विधेयक अत्यंत कठोर असल्याचा दावा काही लोक अन् व्यावसायिक करत आहेत. लोकांना याप्रकरणी जागरुक करणे अधिक आवश्यक असल्याचा दावा संबंधित व्यावसायिकांकडून केला जातोय.

ब्रिटनमध्ये तंबाखूमुळे हजारो बळी

ब्रिटनमध्ये धूम्रपान लोकांच्या आरोग्यासाठी मोठा धोका ठरले आहे, याचमुण्s तेथील सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार ब्रिटनमध्ये दरवर्षी 76 हजारांहून अधिक लोक सिगारेटशी निगडित आजार म्हणजेच कॅन्सर, हृदयविकार आणि फुफ्फुसांच्या समस्येमुळे जीव गमावत असतात. बहुतंश लोक कमी वयातच धूम्रपान सुरू करतात आणि नंतर ही सवय सोडणे अवघड ठरते असे सरकारचे सांगणे आहे. धूम्रपानामुळे उपचारावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो, ज्यामुळे ब्रिटनच्या आरोग्य सेवेवरील (एनएचएस) दबाव वाढतो. लोकांनी धूम्रपान कमी केल्यास हा भार कमी होईल असे सरकारचे सांगणे आहे.

न्यूझीलंडचे अनुकरण

ठराविक सालानंतर जन्मलेले लोक कधीच सिगारेट खरेदी करू शकणार नाहीत अशी कल्पना अंमलात आणणारा न्यूझीलंड हा पहिला देश होता. न्यूझीलंड सरकार देशाला सिगारेट-तंबाखूपासून मुक्त करवू पाहत असल्यानेच हा कायदा आणला गेला होता. डिसेंबर 2022 मध्ये न्यूझीलंड संसदेत तंबाखू-सिगारेटवर बंदी घालणारा स्मोक फ्री एनवायरनमेंट कायदा संमत झाला होता. याच्या अंतर्गत 2008 नंतर जन्म झालेल्या लोकांना कुठल्याही प्रकारची स्मोकिंग प्रॉडक्ट्स खरेदी करता येत नाहीत.

स्मोक-फ्री धोरण

जागतिक आरोग्य संघटनेनुसार 2004 साली आयर्लंडने कार्यस्थळ, रेस्टॉरंट आणि बारमध्ये धूम्रपानावर बंदी घातली होती. तर 2007 पर्यंत केवळ 10 देशांमध्ये इनडोअर स्मोकिंगवर बंदी होती. 2023 पर्यंत जगातील 71 टक्के लोकसंख्या (सुमारे 560 कोटी लोक) कुठल्या न कुठल्या स्मोक-फ्री धोरणाच्या कक्षेत आली होती

Advertisement
Tags :

.