काँग्रेस कार्यालयांच्या पायाभरणीसाठी 10 नोव्हेंबरची डेडलाईन
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे मंत्री, आमदार, जिल्हाध्यक्षांना पत्र
बेंगळूर : राज्यात नोव्हेंबर क्रांती, सत्ता परिवर्तन आणि मंत्रिमंडळ पुनर्रचनेच्या बातम्या पसरत असताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी राज्यातील सर्व जिल्हा आणि शहर काँग्रेस कार्यालयांच्या नवीन इमारतींच्या पायाभरणीसाठी 20 नोव्हेंबरची अंतिम तारीख निश्चित केली आहे. तसेच याबाबत सर्व मंत्री, आमदार, निवडणुकीतील पराभूत उमेदवार आणि जिल्हाध्यक्षांना पत्र लिहिले आहे. गांधी भारताच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त 100 काँग्रेस कार्यालयांच्या पायाभरणी कार्यक्रमाची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. गांधी भारत-100 कार्यक्रम अंतिम टप्प्यात पोहोचला असल्याने 20 नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी 100 काँग्रेस कार्यालय इमारतींची पायाभरणी करण्यास सहमती दर्शविली आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व आमदार आणि 2023 च्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी कार्यक्रमाची अंतिम मुदत जवळ येत असल्याचे लक्षात घेऊन आतापर्यंत कोण डीसीसी/बीसीसी भूखंड घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली नाही. तशा अध्यक्ष, आमदार आणि 2023 च्या निवडणुकीतील पराभूत उमेदवारांनी अधिक लक्ष घालून संबंधित स्थानिक प्राधिकरणकडून काँग्रेस भवन ट्रस्टच्या नावाने भूखंड घेण्यासाठी आवश्यक पावले हाती घ्यावी. स्थानिक प्राधिकरणकडून भूखंड घेण्यास अडचण येत असेल तर तेथे संबंधितांनी खासगी जागा खरेदी करूनही प्रक्रिया पूर्ण करावी, असे शिवकुमार यांनी पत्रात म्हटले आहे. हे भूखंड खरेदी करण्यासाठी सरकारी संस्था असलेल्या शहर/नियोजन प्राधिकरण, नगरविकास खाते, महसूल खात्यांची मान्यता घेत त्यांची नोंदणी करावी लागेल. आतापर्यंत ज्या भागात स्थळांची नोंदणी झाली आहे आणि मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे, त्यांची माहिती त्वरित पाठवण्याचे निर्देश एआयसीसीने दिले आहेत. त्यामुळे या विषयाचा गांभीर्याने विचार करून आपापल्या मतदारसंघात भूखंड मिळविण्यासाठी त्वरित कारवाई करावी, अशी विनंतीही शिवकुमार यांनी पत्रात केली आहे.
दिल्ली दौरा हा नेहमीचा कार्यक्रम
दिल्ली दौरा हा नेहमीचा कार्यक्रम होता. मुख्यमंत्री सिद्धरामय्या मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत बोलतील, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी रविवारी सांगितले. राज्य सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये मंत्रिमंडळ पुनर्रचना होईल, असे संकेत सिद्धरामय्या यांनी शनिवारी दिले होते. मी तिथे (नवी दिल्ली) नियमितपणे जातो. जेव्हा जेव्हा काम असते तेव्हा मी तिथे जातो. मी हायकमांडला भेटणे, आराम करणे, खरेदी करण्यासह न्यायालयीन खटल्यांना उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला जातो, असे म्हणत शिवकुमार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.