1 नोव्हेंबर काळ्या दिनी निषेध फेरी काढणारच!
मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार : मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
बेळगाव : 1 नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळून निषेध फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार रविवारी रेल्वे ओव्हरब्रिज येथील मराठा मंदिरमध्ये झालेल्या मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर होते. काळ्या दिनी मराठी भाषिकांनी आपली ताकद दाखवून निषेध फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
1956 पासून मराठी माणसाचा आवाज दाबण्यासाठी आंदोलन आणि काळ्या दिनाला परवानगी नाकारली जाते. तरीही आतापर्यंत अनेक आंदोलने आणि काळा दिन यशस्वी झाला आहे. त्याप्रमाणे 1 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणारी निषेध फेरीही यशस्वी करण्याचा निर्धार बैठकीत कार्यकर्त्यांनी केला. 2004 मध्ये सीमाप्रश्नाचा दावा न्यायालयात दाखल झाला आहे. मात्र याकडे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाचेही दुर्लक्ष होऊ लागले आहे. मात्र सीमाभागातील जनता आपल्या न्याय हक्कासाठी सदैव लढत राहिल असे विचारही कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
1956 पासून सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला आहे. तेव्हापासून 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन गांभीर्याने पाळला जातो. या दिवशी फेरी काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदविला जातो. काळ्या दिनी मोठ्या संख्येने निषेध फेरीत सहभागी होऊन निषेध नोंदविण्याचा निश्चयही बैठकीत कार्यकर्त्यांनी केला. अलीकडे प्रशासनाकडून कानडीकरणाचा वरवंटा वाढला आहे. दरम्यान मराठी संस्कृती पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सगळे थांबविण्यासाठी मराठी भाषिकांनी ताकदीने निषेध फेरीत सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, खानापूर म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, एम. जी. पाटील, माजी जि. पं. सदस्य रामचंद्र मोदगेकर, मनोहर संताजी, आर. के. पाटील, मनोहर हुंदरे यांच्यासह म. ए. समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी विचार व्यक्त केले. यावेळी बैठकीत डी. बी. पाटील, बी. एस. पाटील, बी. डी. मोहनगेकर, गोपाळ देसाई, मुरलीधर पाटील, लक्ष्मण पाटील, रावजी पाटील, बसवंत येतोजी, रामचंद्र गावकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.