For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नोव्हॅक जोकोविचची विजयी सलामी

06:30 AM Nov 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
नोव्हॅक जोकोविचची विजयी सलामी
Advertisement

वृत्तसंस्था, पॅरिस

Advertisement

पॅरिस मास्टर्स स्पर्धेत सात वेळा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम नावावर असलेला नोव्हॅक जोकोविच पहिल्या फेरीत अडचणीत सापडला होता. परंतु त्याने जिद्दीने पुनरागमन करत व्हॅलेंटिन व्हॅचेरोटचा 6-7 (7-5), 7-5, 6-1 असा पराभव केला. व्हॅचेरोट आपल्या वेगवान सर्व्हिससाठी ओळखला जातो.

पुरुष टेनिसमध्ये 24 ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकण्याचा विक्रम नावावर असलेला जोकोविच आता आपल्या कारकिर्दीतील 103 व्या जेतेपदाच्या शोधात आहे. हे जेतेपद मिळाल्यास तो रॉजर फेडररच्या बरोबरीने दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. ओपन एरामध्ये जिमी कॉनर्स 109 जेतेपदांसह अव्वलस्थानी आहे. मात्र पॅरिसमध्ये 10 व्या क्रमांकावर असलेला हा सर्बियन खेळाडू स्पर्धेतून लवकर बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर होता. विशेष म्हणजे व्हॅचेरोटने रविवारीच स्विस इनडोअर्स स्पर्धा जिंकली होती आणि गेल्या वर्षी शांघाय मास्टर्सच्या उपांत्य फेरीत जोकोविचचा पराभवही केला होता. जोकोविचचा सामना पात्रता फेरीतून आलेल्या रिंकी हिजीकाताशी होईल

Advertisement

अन्य सामन्यांत, तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बेन शेल्टनने कॅमेरुन नॉरीचा 6-3, 6-4 असा पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. या विजयासह त्याने या हंगामातील आपल्या सर्वाधिक विजयांच्या (42) विक्रमाशी बरोबरी केली आहे. या अमेरिकन खेळाडूने 2027 च्या हंगामासाठी कार्लोस अल्कारेझचे माजी प्रशिक्षक जुआन कार्लोस फेरेरो यांना आपल्या टीममध्ये सामील केले आहे. शेल्टनने 15 ते 22 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या एटीपी फायनल्समध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. त्याच्यासोबत अलेक्झांडर व्हेरेव्ह, कार्लोस अल्कारेझ आणि डॅनिल मेदव्हेदेव यांनीही या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. याशिवाय जोकोविचच्या अगदी खाली (11 व्या क्रमांकावर) असलेला टेलर फ्रित्झ याने बेंजामिन बोन्झीचा 3-6, 6-3, 6-4 असा पराभव केला.

पहिल्या फेरीच्या इतर सामन्यांत, फ्रेंच ओपनमध्ये प्रेक्षकांचा लाडका ठरलेला फ्रान्सचा किशोरवयीन खेळाडू मोईस कुआमे याला नुनो बोर्जेसकडून 6-3, 6-1 असा पराभव पत्करावा लागला. तसेच 2022 चा विजेता होल्गर रुने याला 12 व्या मानांकित टॉमी पॉलने 7-5, 6-4 अशा फरकाने पराभूत केले. अकिलीस (पायाच्या घोट्याकडील) दुखापतीतून सावरून रुने अजूनही पुन्हा फॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. 23 वर्षीय डॅनिश खेळाडू सप्टेंबर महिन्यात कोर्टवर परतला असून गेल्या आठवड्यात स्विस इंडोर्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याला वाचेरोटकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

Advertisement

.