दृष्टीचा आहार
परमात्म्याने मानवाला डोळे दिले ते कशासाठी? तर सर्वत्र अनेक रूपाने नटलेला परमेश्वर जे घडोघडी शिक्षण देतो ते समजून घेत आत्मस्वरूपाची ओळख होण्यासाठी. आपल्या प्रत्येक इंद्रियांचा एक आहार असतो. डोळ्यांचा आहार कोणता, तर विश्वात भरून असलेले चैतन्य आणि सर्व भूतमात्रांच्या शरीरात वास्तव्य करीत असलेले चैतन्य हे एकच आहे हे ज्यांना कळते त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त होते.
पावसाळी दुपार जेव्हा संध्याकाळसारखी अंधारून येते तेव्हा माणसाचे मन हळवे, उदास, जिवलगांच्या आठवणींनी आणि एकटेपणाची जाणीव होऊन अंतर्मुख होते. अशावेळी जिभेला परमात्म्याच्या गोड नामात गुंतवले तरच छान; अन्यथा मन जिभेला उचकावून चमचमीत खाण्यासाठी प्रवृत्त करते. त्यामुळे अनायासे आत वळलेली दृष्टी बहिर्मुख होते. वासनेमध्ये गुंतते. निसर्गाच्या अद्भुत विभ्रमांमध्ये मन रमले की कधीकधी आनंदाने जगण्याचे रहस्य सापडून जाते. ती एक अशीच पावसाळी दुपार होती. भिजलेली. काळोखी. तेव्हा एक दृश्य बघितले. उंचच उंच इमारतीमधल्या पहिल्या मजल्यावर बाल्कनीतून खाली जमिनीकडे लक्ष गेले. सुदैवाने तेव्हा तिथे दगडी फरशा नव्हत्या, तर मातीचे अंगण होते. इमारतीची ती मागची बाजू असल्यामुळे वर्दळही नव्हती आणि तिथे उंदरांनी बिळे केली होती.
एक उंदीर आपल्या बिळातून बाहेर डोकावून बघत होता. सावधपणे शत्रूची चाहूल घेत होता. नंतर तो हळूच बाहेर आला आणि आजूबाजूला पडलेल्या ‘वापरा आणि फेका’ अशा वस्तू म्हणजे कागदी कप, चमचे, डिशेश, पेन इत्यादी बऱ्याच वस्तूंपैकी एक एक तोंडात धरून तो उंदीर तुरुतुरु पळत बिळात शिरला. एक एक करीत पुष्कळ वस्तू त्याने आपल्या त्या जमिनीतल्या बिळात म्हणजे त्याच्या घरात नेऊन ठेवल्या. त्याचे हे घर नक्कीच मोठे असावे. शेवटी झाले काय की त्याचे घर भरले आणि छोट्याशा जागेतून तो बाहेर आला. पुन्हा टकमक इकडे तिकडे बघू लागला. हे दृश्य बघितले आणि दृष्टी आत वळली. वाटले, माणसेसुद्धा या उंदरांचेच प्रतिनिधी असतात. प्रतिष्ठेचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या मोठमोठ्या अत्याधुनिक मॉलमध्ये जातात आणि गरज नसलेल्या वस्तू हौसेपायी डोळ्यांना सुख देतात म्हणून आणि तीव्र आसक्ती, लोभापायी घरी आणतात. सारे घर सामानाने भरगच्च भरून टाकतात. त्यात आनंद मानतात. क्षणिक सुखासाठी अशा अशाश्वत गोष्टींचा साठा करणारी माणसे आणि उंदीर यात फरक तो कोणता? माणसांनी फेकून दिलेल्या वस्तू तो उंदीर उचलतो आणि परमेश्वराने त्याज्य ठरवलेल्या गोष्टी माणूस उचलून आणतो. उंदराची कृती बघून माणसाला जसे हसू येते तसेच माणसाची संग्रही वृत्ती पाहून त्या परमेश्वराला काय बरे वाटत असेल? दुर्लभ नरदेह प्राप्त होऊन सद्गुरूरूपाने प्रत्यक्ष परमेश्वराची भेट होऊन देखील माणसाचे मन अशा मोहामध्ये का गुंतते कुणास ठाऊक! घरभर पसरलेल्या वस्तूंपेक्षा अंतरातला आनंद हा खरा शाश्वत आहे याची जाणीव व्हायला हवी; परंतु आत्मभानाचे अनेक क्षण माणसाच्या आयुष्यात येतात आणि जातात. दृष्टीद्वारे मनात बदल घडवून आणणाऱ्या घटनांकडे त्याचे लक्ष जातेच असे नाही.
परमात्म्याने मानवाला डोळे दिले ते कशासाठी? तर सर्वत्र अनेक रूपाने नटलेला परमेश्वर जे घडोघडी शिक्षण देतो ते समजून घेत आत्मस्वरूपाची ओळख होण्यासाठी. आपल्या प्रत्येक इंद्रियांचा एक आहार असतो. डोळ्यांचा आहार कोणता, तर विश्वात भरून असलेले चैतन्य आणि सर्व भूतमात्रांच्या शरीरात वास्तव्य करीत असलेले चैतन्य हे एकच आहे हे ज्यांना कळते त्यांना दिव्यदृष्टी प्राप्त होते. श्री रामकृष्ण परमहंसांना एकदा त्यांच्या शिष्य मंडळींनी प्राणीसंग्रहालय बघायला नेले. पिंजऱ्यामधील सिंहाकडे बघताच त्यांची समाधी लागली. हृदयामध्ये सदैव जागृत असलेल्या कालीमातेचे सिंह हे वाहन बघताच श्री रामकृष्ण अंतर्मुख झाले. पूज्य गुलाबराव महाराज हे लौकिकदृष्ट्या अंध होते; मात्र त्यांना दिव्यदृष्टी होती. अर्थात प्रज्ञाचक्षू असल्यामुळे ते मानवी दृष्टीच्या पलीकडले दृश्य बघू शकत. सुप्रसिद्ध चित्रकार बेडेकर यांनी काढलेले श्री ज्ञानेश्वर माऊलींचे चित्र अंतर्दृष्टीने बघून ते म्हणाले, हे चित्र चुकीचे आहे. यात माऊलींच्या गळ्यात जानवे दाखवले आहे. माऊलींचा व्रतबंध झालेला नव्हता, त्यामुळे ते जानवे घालत नव्हते. माऊली हे आजानुबाहू होते. हे चित्र तुम्ही दुरुस्त करा.
शेगावीचे संत गजानन महाराज यांच्या प्रकटीकरणाचा प्रसंग त्यांच्या ‘गजाननविजय’ या पोथीमध्ये भाविक नित्यनेमाने वाचतात. तापलेल्या जमिनीवर भर माध्यान्हीला हा योगीराणा रस्त्यावर बसून उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होता. संत दासगणू महाराज म्हणतात, ‘बंकटलाल आगरवाला । होता रस्त्याने चालला । त्याने हा प्रकार पाहिला । आपल्या त्या स्नेह्यासह?’ दामोदरपंत कुलकर्णी हे बंकटलाल अगरवाल यांचे स्नेही होते. त्या दोघांना या योगीराणाला पाहून असे वाटले की जर हा अन्नार्थी असता तर त्यांनी पात्र मागून घेतले असते. नंतर ते दोघे रस्त्यावर उभे राहून सद्गुरूस्वरूप गजानन महाराजांची कृती बघू लागले आणि त्यांना कळले की ‘कृतीने हा दिसे वेडा । परी वाटे ज्ञान गाडा । वा विमलज्ञानाचा हुडा। असावा की प्रत्यक्ष?’ संत दासगणू महाराज पुढे म्हणतात, ‘पथे हजारो लोक गेले।परि न कोणी पाहिले।या दोघांवाचून भले। याचा विचार करा हो?’ बंकटलाल यांची दृष्टी क्षणार्धात आत वळली आणि त्यांना कळले की, ‘ह्याला वेडा म्हणालो आपण । ती नि:संशय झाली चुकी। हा तर ज्ञानजेठी आहे?’ ते पंतांना म्हणाले, ‘धन्य आपुले शेगाव। दृष्टी पाहिला योगीराव?’ नंतर महाराजांनी साध्यासोप्या शब्दात अद्वैत वेदांत या दोघांना सांगितला आणि ते धन्य झाले. पंथाने हजारो लोक गेले, पण महाराजांना कोणीच नाही पाहिले. ते या दोघांनाच दिसले कारण नुसते डोळे असून चालत नाही, तर डोळे हे अंत:करणाशी जोडलेले हवे, तेव्हा भगवंताचे दर्शन होते. स्वामी विवेकानंदांची दृष्टी ही अतिशय पवित्र होती. पाश्चात्य स्त्रियांना भारतीय स्त्राrची महती सांगताना स्वामी म्हणाले की, आम्ही पाच वर्षाच्या मुलीलाही आई म्हणूनच हाक मारतो. कारण आईजवळ असणारे वात्सल्य, प्रेम, जिव्हाळा हे सगळे गुण तिच्याजवळ उपजतच असतात. एक विदेशी स्त्राr स्वामी विवेकानंदांचे रूप बघून त्यांच्यावर आसक्त झाली आणि म्हणाली, मला तुमच्यासारखा मुलगा हवा आहे. तेव्हा स्वामी म्हणाले, ‘माझ्यासारखा कशाला? आई, मीच तुझा मुलगा होतो.’ माऊलींचा एक सुप्रसिद्ध अभंग आहे. कानडा वो विठ्ठलु । करनाटकू। येणे मज लावियेला वेधू।खोळ बुंथी घेऊनी ।खुणाची पालवी । आळविल्या न दे सादू?’ याचे विवेचन करताना डॉ. द. भि. कुलकर्णी म्हणतात, खोळ ही अंगाला चिकटून असते. सत्व, रज, तम यांची खोळ निघताना निघत नाही. बुंथी म्हणजे आवरण. वस्त्रालंकार. सगुण विठ्ठलाने खोळबुंथी धारण केलेली आहे, त्यामुळे त्याचे खरे स्वरूप कळत नाही. त्याचा पुरेसा बोध होत नसला तरी माणसाला विठ्ठलाचे चैतन्यरूप खुणावतच असते, म्हणून तो गूढ आहे.
माऊली विठोबाकडे पाहून म्हणतात, ‘अगणित लावण्य । तेज पुंजाळले..’ माऊलींना ती विठोबाची काळी पाषाणाची मूर्ती दिसत नाही, तर संख्येत न मोजता येणारे प्रकाशाचे लोटचे लोट माऊलींच्या दृष्टीला दिसतात. संत तुकाराम महाराजांना विठ्ठलाची मूर्ती म्हणजे ‘सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी, कर कटावरी ठेवोनिया’ अशी दिसते. ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’ असलेल्या या विठोबापुढे रवि, चंद्र सुद्धा लोप पावले आहेत असे संत तुकाराम महाराज म्हणतात. ते आपल्या डोळ्यांना म्हणतात, ‘तुम्ही घ्या रे डोळे सुख । पहा विठोबाचे मुख’.. तर संत गोरा कुंभार म्हणतात, ‘देह हा प्रपंचाचा दास आहे. व्यवहारात त्याला व्यवसाय, काम हे करावे लागणार. त्या प्रपंचात विठ्ठलाला आठवणे हेच देहाचे सार्थक आहे. ते म्हणतात, ‘तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम.’ त्यामुळे दृष्टी एकाग्र होते.
दृष्टीमध्ये सामर्थ्य असते. ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव अनसूया मातेकडे अतिथीरूपाने आले तेव्हा ही माझी बाळे आहेत असे अनसूया माता म्हणाली. तिने असे म्हणताच हे त्रैलोक्यपालक तिन्ही देव तान्ही बाळं झाली. दोघांना दूध पाजताना तिसरा रडू लागला तेव्हा काय झाले? परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी म्हणतात, ‘जे त्रैलोक्याचे पालक। त्यांना लागली भूक । अनसूयेपुढे करिती शोक। भावाची भूक असी असे? दोघा लावी दोन स्तनी । तिसरा रडे आक्रंदोनी । तया कृपादृष्यामृतपानी । थोरवी साजणी अनसूया?’ आपल्या दृष्टीने तिने देवांची भूक भागवली. डोळ्यांच्या आहाराकडे लक्ष पुरवले की उपासना दृढ होते.
ओशो रजनीश असे म्हणतात की प्रत्येक इंद्रियाला एक उदर असते. त्याचा आहार वेगळा असतो. दृष्टीचा आहार समजून घेतला की परमेश्वर साक्षात समोर उभाच आहे.
स्नेहा शिनखेडे