तब्बल 21 गुन्हे दाखल असलेला सराईत चोरटा जेरबंद
सातारा :
सातारा शहरातील विलासपूर, शाहूपुरी, कृष्णानगर, एम.आय.डी.सी येथे घरफोडी व दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डे.बी. पथकाने जिल्हा रूग्णालयाच्या परिसरात अटक केली आहे. त्याच्याकडून दोन घरफोडीचे व दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून 2 लाख 30 हजार रूपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. महेश शिवाजी बाबर (वय 48, रा. किकली, ता. वाई) असे त्याचे नाव आहे.
सातारा शहर डी.बी. पथकातील पथक हे घरफोडीतील सराईत आरोपीची माहिती घेत असताना एक सराईत आरोपीने सातारा शहर परिसरामध्ये चोरी केली असल्याची माहिती प्राप्त झाली होती. जिल्हा रूग्णालय सातारा याठिकाणी चोरीचे साहित्य विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार डी.बी. पथकातील पोलीस पथक या ठिकाणी पेट्रोलिंग करत होते. सायंकाळच्या सुमारास हा चोरटा संशयितरित्या फिरत असताना दिसून आल्यावर डी. बी. पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असताना त्याने सातारा शहरामध्ये दोन ठिकाणी घरफोडी व दोन ठिकाणाहून मोटारसायकल चोरी केली असल्याचे सांगितले.
त्याच्याकडून चोरीबाबत अधिक माहिती घेतली असता त्याने पहाटेच्या सुमारास सातारा येथील विलासपूर येथील अॅग्रोनिर अॅग्रो मशीनरी ऑफिसच्या गाळाचे कुलूप तोडून तेथील लॅपटॉप, आयफोन, पॉवर बैंक व इतर साहित्य चोरी केले होते. तसेच शाहुपुरी हद्दीतील एक बंद बंगल्याचे कुलूप तोडून तेथून मोटारसायकल, फार्ड कंपनीचे चारचाकी वाहनाची चावी असे चोरी केली असल्याची कबुली दिली असून सातारा शहर परिसरातील कृष्णानगर येथून स्पेन्डर मोटारसायकल व एम.आय.डी.सी. सातारा येथून बजाज बॉक्सर मोटारसायकल चोरी केली असल्याचे सांगितले. या गुह्याची पोलीसांनी खात्री करून चोरीस गेलेला 2 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत केलेला आहे. या आरोपीवर यापुर्वी 21 गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागिय अधिकारी सातारा विभाग सातारा राजीव नवले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक (क्राईम) दादाभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्याम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार सुजीत भोसले, निलेश जाधव, मोधा मेचकर, निलेश यादव, विक्रम माने, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले, सुहास कदम, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, यांनी केलेली आहे.