सराईत मोटर सायकल चोरटा जेरबंद
सातारा :
मोटरसायकल चोरी प्रकरणी सराईत चोरट्याला सातारा शहर पोलीस व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पाटखळ माथा (ता. सातारा) येथून जेरबंद केले. त्याच्याकडून ३ लाख २० हजारांच्या ४ मोटर सायकल पोलिसांनी जप्त केल्या आहेत. रोहित सदानंद शेळके (वय २०, रा. निंबोडी ता. खंडाळा) असे त्याचे आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी सातारा शहरातून चोरीस जाणाऱ्या मोटारसायकल चोरट्याचा शोध घेण्याच्या डी. बी. पथकास सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे डी.बी. पथक रेकॉर्डवरील मोटरसायकल चोरट्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. एका युवकाने सिव्हील हॉस्पीटल येथून एक मोटारसायकल चोरी केल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्याचे वर्णन पोलिसांना मिळालेले होते. या वर्णनाचा एक युवक ट्राफिकचे पोलीस अंमलदार अमर काशीद व तानाजी भोंडवे यांना पोवई नाक्यावर दिसून आला. त्यांनी त्याला थांबवण्याच्या प्रयत्न केला परंतु तो भरधाव वेगाने पोवई नाका ते एस.टी. स्टॅन्ड परिसरातून गर्दीच्या ठिकाणातून पळून गेला होता. त्यानंतर ट्राफिक अंमलदार यांनी सातारा शहर डी.बी. पथकाशी संपर्क करून त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर ट्राफिकचे अंमलदार व डी.बी. पथकातील स्टाफ मिळालेल्या माहितीवरून त्या संशयित युवकाचा सातारा एस.टी. स्टॅन्ड, सिव्हील हॉस्पीटल, वाढे फाटा असे शोध घेत होते. हा युवक लोणंद रोडच्या दिशेने गेला असल्याची माहिती प्राप्त झाल्यावर पोलीस पथकाने लोणंद रोडवर शोधमोहिम राबविली. युवक हा पाटखळमाथा याठिकाणी दिसून आल्यावर पोलीस पथकाने त्यास पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सातारा शहर परिसरातून चार मोटारसायकल चोरी करून एका ठिकाणी विक्री करण्याचे उद्देशाने लपवून ठेवल्याचे सांगितले. तसेच त्याने सदरच्या मोटारसायकल ठेवलेले ठिकाण स्वतः दाखविले. या ठिकाणी एकूण ४ मोटारसायकल मिळून आल्या. त्या पोलीसांनी जप्त केलेल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागिय अधिकारी सातारा विभाग सातारा राजीव नवले, वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मरके, मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्याम काळे, अभिजीत यादव, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश यादव, अमर काशीद, सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी भोंडवे, इरफान मुलाणी, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम यांनी केलेली आहे.